सांगलीत शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाची 'नांदी'

    दिनांक  30-Jan-2020 11:58:02

saf_1  H x W: 0
 
 
मुंबई : १००व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला येत्या २६ मार्चपासून नाट्यदिंडीने सांगलीमध्ये सुरूवात होणार आहे. २७ मार्चला उद्घाटन समारंभ पार पडणार आहे. तर येत्या १४ जूनला नाट्य संमेलनाचा समारोप मुंबईत होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी ही माहिती दिली. २७ मार्च ते ७ जून या कालावधीत महाराष्ट्रात ठिकठिकाणी छोटी छोटी संमेलने होणार आहेत. ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल हे या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष आहेत.
 
२५ मार्च रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाट्य परिषदेचे सदस्य तामिळनाडूतील तंजावार येथे जाऊन महाराज व्यंकोजीराजे भोसले यांच्या समाधीवर नतमस्तक होऊन कार्यक्रमांना सुरवात करणार आहेत. त्यानंतर २६ मार्च रोजी सांगलीत नाट्यदिंडीचे आयोजन करून त्यानंतर तिथे संगीत नाटकाला सुरुवात करण्यात येईल.२७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनाचा मुहूर्त साधत प्रत्यक्ष नाट्य संमेलनाला सुरुवात होईल. त्यानंतर २९ मार्च पर्यंत सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
 
७ जूनपर्यंत राज्यव्यापी संमेलन पार पडल्यानंतर ८ जूनपासून मुंबईत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नाटकांचा खास महोत्सव पार पडणार आहे. यात पारंपरिक नाटक, लोककला, नाट्यविषयक चर्चा, परिसंवाद यांनाही खास स्थान देण्यात येणार. त्यासोबतच या काळात व्यावसायिक, प्रायोगिक, बालनाट्य, एकांकिका, एकपात्री यांचेही विशेष सादरीकरण करण्यात येणार आहे. १४ जून रोजी अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे दरवर्षी गो. ब. देवल स्मृती पुरस्कारांचे वितरण समारंभ होणार आहे. याच पुरस्कार वितरण सोहळ्यासह नाट्य संमेलनाची देखील सांगता करण्यात येईल.