दिल्लीत निश्चितच भाजपची सत्ता!भाजप नेते शाम जाजू यांचा विश्वास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020   
Total Views |

bjp_1  H x W: 0



दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. दिल्ली हा पारंपरिकरित्या भाजपचा बालेकिल्ला असला तरीही राज्यात १९९८ पासून भाजप सत्तेत नाही. मात्र, यावेळी दिल्लीकर भाजपलाच सत्ता बहाल करतील, हा विश्वास भाजपनेते व्यक्त करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे प्रभारी आणि निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी असलेले भाजपचे वरिष्ठ नेते शाम जाजू यांच्यासोबत दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी पार्थ कपोले यांनी साधलेला विशेष संवाद.



  • दिल्लीसाठी भाजपचे नेमके व्हिजन काय ?

 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला आंतरराष्ट्रीय शहर बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यादृष्टीने भाजप काम करीत आहे. दिल्लीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या पाच वर्षांत कोणतेही प्रयत्न केलेले नाही. त्यांचा सर्व वेळ केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्याविरोधात टीकाटिप्पणी करण्यात वाया गेला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करण्याची केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाची मनोवृत्ती नाही. त्यामुळे दिल्लीकरांचे आणि दिल्लीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाकडे सत्ता आल्यास पायाभूत सुविधांच्या विकासाकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. दिल्लीत प्रदूषणाचा मुद्दा कळीचा आहे, केजरीवाल यांनी त्याबाबतीत काहीही काम केलेले नाही. वाहतुकीचा प्रश्न सुटलेला नाही, उलट दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याची परवानगी देण्यास केजरीवाल यांनी जाणीवपूर्वक विलंब केला. रुग्णालयांची दुरवस्था आहे, पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. एकूणच वाहतूक, पाणी, आरोग्य आणि शिक्षण यामध्ये केजरीवाल यांनी शून्य योगदान दिले आहे. भाजप हा सर्व बॅकलॉग भरून काढण्यावर भर देईल.



  • आपतर्फे अरविंद केजरीवाल, तर भाजपतर्फे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ?

 

भारतीय जनता पक्षाकडे चेहर्‍यांची उणीव नाही. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून एकाच व्यक्तीची एकाधिकारशाही ही आमच्या पक्षाची संस्कृती नाही. भाजप म्हणजे विकास आणि तोच आमचा चेहरा आहे. त्याच चेहर्‍याने आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत आणि जनता आमच्यावर भरभरून विश्वास टाकत आहे. आम आदमी पक्षात केवळ केजरीवाल यांचा चेहरा आहे, तर काँग्रेसमध्ये एका कुटुंबाशिवाय कोणाचेही महत्त्व नाही. त्यामुळे चेहर्‍याची चिंता भाजप कधीच करीत नाही. योग्यवेळी योग्य तो निर्णय पक्षाचे संसदीय मंडळ घेईलच.



  • भाजप १९९८ पासून दिल्लीत सत्तेत नाही. यावेळी जनता भाजपला कौल देईल असे वाटते का?

 

दिल्ली हा पारंपरिकरित्या भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. दिल्लीत भाजपची संघटनात्मक बांधणी अगदी मजबूत आहे. आम्ही १९९८ पासून सत्तेत नाही, ही गोष्ट खरी असली तरी लोकसभा आणि महापालिका निवडणुकीत दिल्लीकरांनी नेहमीच भाजपवर विश्वास टाकला आहे. दिल्लीतील तिन्ही महापालिकांमध्ये आज भाजपचे महापौर आहेत, तर लोकसभेतील सातही खासदार भाजपचे आहेत. त्याचप्रमाणे १९९८ पासून आम्ही अपयशी ठरलो, असेही घडलेले नाही. आमची सदस्यसंख्या नेहमीच ३२ ते ३३ च्या दरम्यान राहिली आहे आणि दिल्ली विधानसभेचा बहुमताचा आकडा हा ३६ आहे. त्यामुळे जनतेने आमच्यावर नेहमीच विश्वास दाखविला आहे. दिल्ली विधानसभेची २०१५ सालची निवडणूक एक अपवाद होती. जनतेने केजरीवाल यांना निवडून दिले, मात्र पाच वर्षांत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.



  • आप सरकारचे शिक्षणविषयक दिल्ली मॉडेल यशस्वी ठरल्याचा दावा करण्यात येतो, भाजपचे त्याविषयी काय मत आहे ?

 

शिक्षणक्षेत्रात क्रांती घडविल्याचा आपचा दावा धादांत खोटा आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षणक्षेत्राकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. दिल्ली सरकारच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण प्रचंड असून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. दिल्ली सरकारच्या शाळांपेक्षा भाजपची सत्ता असलेल्या दिल्ली महापालिकेच्या शाळा आणि केंद्रीय विद्यालये यांची गुणवत्ता, पायाभूत सुविधा अधिक चांगली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रचंड संख्येतील गळतीकडे केजरीवाल सोयीस्कर दुर्लक्ष करीत असतात. शाळांमध्ये शिक्षक अणि अन्य कर्मचार्‍यांच्या जागा रिक्त आहेत. ज्या जागा भरल्या आहेत, तेथे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आली आहे. शाळा डिजिटल केल्याचा दावाही पोकळ आहे, बोटावर मोजण्याएवढ्याच शाळा सुस्थितीत आहेत. त्याचप्रमाणे सन २०१५ पासून एकही नवी शाळा उघडली नाही. त्यामुळे केजरीवाल हे निव्वळ धूळफेक करीत आहेत.



  • भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी आप की काँग्रेस ?

 

भाजपची मुख्य लढत ही आम आदमी पक्षासोबत आहे. कारण, गेली पाच वर्षे केजरीवाल यांनी कोणतेही भरीव काम न करता श्रेय घेण्याचे काम केले आहे. काँग्रेसचे अस्तित्व दिल्लीत आहे की नाही, असा प्रश्न पडण्याएवढी काँग्रेसची दारुण स्थिती आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आता हयात नसल्यामुळे तर काँग्रेसची पुरतीच दमछाक झाली आहे. त्यामुळे काँग्रेस कुठेही स्पर्धेत नाही.



देशविघातक शक्तींना आपचा पाठिंबा

अरविंद केजरीवाल यांनी नेहमीच देशविघातक शक्तींना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दिल्लीत झालेल्या हिंसाचारातच आपचे नेते सहभागी होते. त्यांनी जाणीवपूर्वक लोकांना भडकविले. त्याचप्रमाणे तुकडे तुकडे गँगचे समर्थन करणे हा तर आपचा आवडता छंद आहे. एकूणच देशात अराजकता पसरवू पाहणार्‍यांना आप नेहमीच संरक्षण देण्याची भूमिका घेते.



अनधिकृत कॉलन्यांना भाजपने न्याय दिला

दिल्लीमध्ये अनधिकृत कॉलन्यांचा प्रश्न महत्त्वाचा होता. एवढी वर्षे काँग्रेस आणि गेली पाच वर्षे आपने त्याविषयी काहीही केले नाही. मात्र, केंद्र सरकारने सर्वच्या सर्व म्हणजे १७३१ कॉलन्या नियमित करून त्यांची नोंदणीही सुरू केली आहे. त्यामुळे जवळपास ४० लाख लोकांना आता हक्काचे घर मिळाले आहे.



अपयश झाकण्यासाठी सवलतींचे गाजर

केजरीवाल यांनी गेल्या साडेचार वर्षांत कोणतेही ठोस काम केलेले नाही. त्यांनी केवळ केंद्र सरकारच्या कामांचे श्रेय घेतले आहे. आपले साडेचार वर्षांचे अपयश झाकण्यासाठीच त्यांनी आता वीज आणि पाण्याच्या शुल्कात सूट देण्याचा निर्णय घेतला असला तरीही आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. जनतेला आता बदल हवा आहे आणि भारतीय जनता पक्षाचा पर्याय जनता स्वीकारणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@