सरकारस्थापनेच्या काळात ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2020
Total Views |
We Are 162 _1  


तुमचा खेळ होतो साहेब पण आमचं मरण



मुंबई : भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसणाऱ्या शिवसेनेने युती तोडत महाविकास आघाडी स्थापन केली. यासाठी निकालानंतर संपूर्ण नोव्हेंबर महिना सरला तरीही सरकार स्थापन झाले नव्हते. मात्र, याच काळात कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला वेळीच मदत न मिळाल्याने राज्यातील तिनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती उघड झाली आहे. 'हे शेतकऱ्यांचे सरकार आहे,' असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या कार्यकाळातील हा सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा आहे.

 

शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसल्याने नोव्हेंबर महिन्यात राज्यात राजकीय उलथापालथ सुरू झाली. मात्र, जगाचा पोशिंदा बळीराजा मात्र या काळात जगण्यासाठी संघर्ष करत होता. महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात तब्बल तिनशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. एका महिन्यात इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची गेल्या चार वर्षातील ही पहिली वेळ आहे. २०१५ मध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं होतं. मात्र, हा आकडा सर्वाधिक ठरला आहे.

 

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री बसणे गरजेचे होते. भाजपसोबत जाणार नाही, असे सांगणाऱ्या शिवसेनेने त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी सुरू केली होती. या काळात देवेंद्र फडणवीस काळजीवाहू मुख्यमंत्री होते. त्यामुळे मदत करण्यासाठीही मर्यादा होत्या. त्यामुळे पूर्ण मदत पोहोचू शकत नव्हती.

 

याच काळात राज्यात सरकार स्थापन करायचे सोडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, संजय राऊत माध्यमांसमोर मुख्यमंत्री आपलाच होईल, हे सांगण्यात व्यस्त होते. मुख्यमंत्री ठरण्यासाठी किमान समान कार्यक्रम ठरण्यासाठी तब्बल दीड ते दोन महिने उलटून गेले होते. याच काळात सरकारी मदत न मिळाल्याने तिनशे शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे, अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

 

अवकाळी पावसामुळे राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांना फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे जवळपास ७० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. गतवर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत ६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात १८६ तर नोव्हेंबर महिन्यात ११४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सर्वात जास्त आत्महत्या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात झाल्या आहेत. मराठवाड्यात नोव्हेंबर महिन्यात १२० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. तर विदर्भात ११२ शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवले आहे.
 

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सर्वाधिक आत्महत्यांमुळे २०१९ मधील शेतकरी आत्महत्येचा आकडा २०१८ पेक्षाही अधिक आहे. आत्महत्येच्या आकडेवारीत जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंतचा समावेश असतो. २०१९ मध्ये एकूण २५३२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून २०१८ मध्ये हा आकडा २५१८ इतका होता.

 

आतातरी खातेवाटप करणार का ?

 राज्यात अजूनही पडणाऱ्या गारपीठ आणि अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसत आहे. नव्या वर्षातही अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, अजूनही खातेवाटप न झाल्याने शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळू शकलेली नाही. उद्धव ठाकरे सरकारने केलेली पिक कर्जमाफी असल्याने इतर गोष्टींवरील कर्जांची परतफेड करणे शेतकऱ्यांना कठीण होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, असे सांगणारे सरकार शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा नाकारू शकत नाही.



 
@@AUTHORINFO_V1@@