प्रशांत किशोर यांची जेडीयूमधून हकालपट्टी

29 Jan 2020 17:38:25

prashant kishor_1 &n



पाटणा
: जनता दल (युनायटेड) पक्षातून प्रशांत किशोर यांची अखेर हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रशांत किशोर यांच्यासह पवन वर्मा यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. जनता दल (युनायटेड) पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी याबाबत माहिती दिली. पक्ष शिस्त मोडणे आणि पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल ही कारवाई केली असल्याने हकालपट्टी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही महिन्यांपासून प्रशांत किशोर यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्यांची ही वक्तव्ये पक्षाच्या निर्णयाविरोधात असल्याचे त्यागी यांनी सांगितले. प्रशांत किशोर यांनी पक्ष अध्यक्ष नितीश कुमार यांच्याविरोधातही अपमानास्पद वक्तव्य केली होती असेही त्यांनी सांगितले.



काही वर्षापूर्वीच प्रशांत किशोर यांनी जनता दल युनायटेड पक्षात प्रवेश केला होता. प्रशांत किशोर यांनी एनआरसी व सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात भूमिका मांडली होती. त्यानंतर या दोन मुद्यांवर प्रशांत किशोर यांनी वारंवार केंद्र सरकार व भाजपवर हल्लाबोल केला होता. त्याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि प्रशांत किशोर यांच्यात ट्विटर वॉरही चांगलेच रंगले होते. प्रशांत किशोर हे पक्षात कायम राहिले तरी आम्हाला काही त्रास नाही आणि पक्ष सोडून गेले तरी काही विशेष त्रास होणार नसल्याचे सूचक वक्तव्य नितीश कुमार यांनी केले होते. त्यानंतरच जेडीयूने ही कारवाई केली.
Powered By Sangraha 9.0