कोल्हापुरात पोलीस आणि गुन्हेगारांमध्ये गोळीबार ; एकाचा मृत्यू

    दिनांक  29-Jan-2020 11:28:18
Kolhapur 
saf_1  H x W: 0
 
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारांचा हैदोस पाहायला मिळाला. पुणे-बंगळुरू महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये गोळीबार झाला. यावेळी झालेल्या बेछूट गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात येत आहे. मंगळवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. या घटनेने टोल नाका परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण होते.
 
शामलाल गोवरधन वैष्णोई हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तर, सरवनकुमार मनोहरलाल मान्जु वैष्णोई हा आरोपी जखमी झालेला आहे. श्रीराम पांचाराम वैष्णोई हा आरोपी देखील जखमी झालेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगारी टोळी राजस्थान येथील आहे. राजस्थानमधील २५ गुन्ह्यांमध्ये आवश्यक असलेले हे ३ आरोपी आहेत. पोलिसांना चकवा देत हे सराईत गुन्हेगार दोन दिवसापूर्वी धारवाडमध्ये आले होते. याबाबत कर्नाटक पोलिसांना माहिती मिळाली होती.
 
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांना पकडण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी तिथून पलायन केले. यावेळी कर्नाटक व कोल्हापूर पोलिसांनी मिळून या टोळीचा पाठलाग सुरू केला. कोल्हापूरातील किणी टोल नाक्याजवळ पोहोचल्यानंतर गुन्हेगारांच्या वाहनाला रोखण्याचा प्रयत्न करताच पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही गोळीबार केला. यामध्ये एकजण जखमी झाला असल्याची पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी माहिती दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून आहे घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली.