सावधान ! महाराष्ट्रात वाढतोय चाईल्ड पोर्नोग्राफीचा आकडा

    दिनांक  29-Jan-2020 17:06:02

child pornography stats_1
 
मुंबई : भारतामध्ये चाईल्ड पोर्नोग्राफी हा अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. या संबंधित एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या पाच महिन्यांमध्ये भारतातून तब्बल २५ हजार चाईल्ड पॉर्न व्हिडियो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईट्सवर अपलोड झाले आहेत. यामध्ये देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून सर्वाधिक चाईल्ड पॉर्न व्हिडियो अपलोड करण्यात आले आहेत. अशी माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अन्वेषण आणि अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉईटेड चिल्ड्रन’ या संस्थांनी दिली आहे.
 
 
दिल्लीसोबतच पहिल्या पाचमध्ये महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांचादेखील समावेश होतो. त्यामुळे पुन्हा एकदा चाईल्ड पोर्नोग्राफीचा विळखा वाढत आहे. चाईल्ड पॉर्नविषयक राज्यनिहाय आकडी जारी करण्यात आलेली नाही. तरीही, महाराष्ट्रातून एकूण १७०० व्हिडीयो अपलोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. देशभरामध्ये आरोपींचे अटकसत्र सुरु झाल्याचेही गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मुंबई, ठाणे, पुणे या शहरांमध्ये चाईल्ड पॉर्नोग्राफीची सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली आहेत. फक्त मुंबईमध्येच ५०० प्रकरणे घडल्याची माहिती देण्यात आली आहे.