स्वा. सावरकर केवळ चळवळ नसून एक विचार : अनिता करंजकर

    दिनांक  27-Jan-2020 17:28:29
Veer-savarkar_1 &nbs
 
नाशिक : 'स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात भगूरवासी सावरकर बंधूंनी केली याचा आम्हाला अभिमान आहे. सावरकरांमुळे या देशाला स्वातंत्र्य मिळाले. परंतु त्यांना नेहमीच उपेक्षित ठेवले गेले. स्वा. सावरकर ही केवळ चळवळ नसून हा एक विचार आहे. या विचारांनी प्रेरित होऊन तरुणांनी पुढे काम करावे', असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक (सावरकर वाडा) भगूर येथे भगूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांनी ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले.
 
 
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांची विशेष उपस्थिती होती. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने हा वाडा दत्तक घेतल्यानंतर यंदा प्रथमच येथे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. वंदे मातरम, भारतमाता की जय, राष्ट्रभक्ती तुझे नाम, सावरकर, सावरकर, देशभक्ती तुझे नाव, सावरकर, सावरकर अशा घोषणांनी सावरकर वाडा दुमदुमून गेला.
 
 
सावरकरी विचारांवर चालल्यास देशाला उज्ज्वल भवितव्य : मंजिरी मराठे
 
 
भगूरच्या सावरकर वाड्यात प्रजासत्ताक दिन साजरा होणे हा माझ्यासाठी सर्वांत मोठा क्षण आहे. सावरकर स्मारकाच्या माध्यमातून सुरू असलेल्या अशा विविध उपक्रमातून युवा पिढीला जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. सावरकरांचे विचार युवा पिढीपर्यंत पोचले, तर देश नक्कीच सुजलाम-सुफलाम आणि समृद्ध होईल. तसेच देश सावरकर विचारांवरच चालला, तरच देशाला उज्ज्वल भवितव्य आहे, असा विश्वास स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी व्यक्त केला.
 
सोहळ्याला उपनगराध्यक्ष सुदेश वालझाडे, नगरसेवक भाऊसाहेब गायकवाड, दिपक बलकवडे, प्रतिभा घुमरे, उत्तमराव आहेर, फरीदभाई शेख, आर.डी. साळवे, स्मारक सदस्य सुनील वालावलकर, विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, भगूर येथील सावरकर स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुवर, सहव्यवस्थापक भूषण कापसे, यादव, श्रीमती साळवे, योगेश बुरके, प्रशांत लोया, केतन कुवर, आकाश नेहेरे, सौरभ कुलकर्णी, दिगंबर देवरे, खंडु रामगडे, विजय घोडेकर, पवन कुवर, समाधान धात्रक, आकाश कुवर, सार्थक मरकड आदि उपस्थित होते.