गायक सुरेश वाडकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

    दिनांक  25-Jan-2020 16:38:13

suresh_1  H x W

देशातील इतका मोठा पुरस्कार मिळाल्याचा आनंद : सुरेश वाडकर


मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली. भावगीतांसह मराठी व हिंदी चित्रपट संगीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे गायक सुरेश वाडकर यांना यंदाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील इतका मोठा पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद झाला असून, या वेळी मला लतादीदी, गुरुजी, आई-वडील, तसेच संगीतकार रवींद्र जैन यांची आठवण येत असल्याचे, वाडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.


सुरेश वाडकर यांनी मराठी आणि हिंदीसह इतर अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांनी कोंकणी आणि भोजपुरी भाषेतही हजारो गाणी गायली आहेत. त्यांची ओमकार स्वरूपा, सुरमयी अखियों में, ऐ जिंदगी गले लगा ले, चप्पा चप्पा चरखा चले अशी अनेक सुमधूर गाणी खूप गाजली. त्यांची अनेक गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.


सुरेश वाडकरांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली. पंडित जियालाल वसंत यांच्याकडे ते संगीत शिकले. २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्याच प्रमाणे त्यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कारही मिळाला आहे.