आणखी एका टीव्ही कलाकाराची आत्महत्या

    दिनांक  25-Jan-2020 10:04:22

sejal_1  H x W:काम मिळत नसल्याच्या नैराश्यातून अभिनेत्री सेजल शर्माची आत्महत्या

मुंबई : काहीच दिवसांपूर्वी अभिनेता कुशल पंजाबीच्या आत्महत्येमुळे मालिका विश्वात खळबळ माजली होती. या घटनेला अवघे काहीच दिवस झाले आणि शनिवारी सकाळी आणखी एका टीव्ही कलाकाराच्या आत्महत्येची घटना समोर आली. 'दिल तो हैपी है जी' या मालिकेतील भूमिकेमुळे प्रकाशझोतात आलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सेजल शर्माने मिरा रोड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काम मिळत नसल्याने आलेल्या नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे सुसाइड नोटमधून स्पष्ट झाले आहे.

मिरा रोडमधील शिवार गार्डन भागात रॉयल नेस्ट इमारतीत
सेजल शर्मा आपल्या मैत्रिणीसह राहत होती. याच फ्लॅटमध्ये शुक्रवारी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सेजल ही मूळची राजस्थानमधील उदयपूर येथील असून शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. अंत्यसंस्कारासाठी तिचे पार्थिव उदयपूर येथे नेण्यात आले आहे.

'स्टार प्लस'वरील 'दिल तो हैपी है जी' या मालिकेत सेजल मध्यवर्ती भूमिका साकारत होती. १४८ भागांनंतर ही मालिका ९ ऑगस्ट २०१९ रोजी बंद झाली. त्यानंतर सेजल अन्यत्र काम शोधत होती. मात्र, काम मिळू न शकल्याने तिला नैराश्य आले होते. 'गेल्या दीड महिन्यापासून मी नैराश्येत असून त्यामुळेच मी आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये'
, अशी सुसाइड नोट सेजलने लिहून ठेवली असून त्याआधारे मिरा रोड पोलीस पुढील तपास करत आहेत.