देवदत्त नागेचे मालिका विश्वात पुनरागमन!

25 Jan 2020 15:17:13

devdatt_1  H x



‘डॉक्टर डॉन’मध्ये साकारणार विनोदी भूमिका

मुंबई : झी मराठीवरील 'जय मल्हार' मालिकेतून प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळवलेला अभिनेता देवदत्त नागे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तान्हाजी’ चित्रपटातून त्याने आपल्या अभिनयाने मोठ्या पडद्यावरील प्रेक्षकांचेही मनोरंजन केले, आता तो पुन्हा मालिका विश्वात पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. झी युवा वाहिनीच्या नव्या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


'झी युवा' वाहिनी 'डॉक्टर डॉन' नावाची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहे. ही मालिका हलकीफुलकी आणि विनोदी धाटणीची असणार आहे. या मालिकेतून, अभिनेता देवदत्त नागे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तो एका निराळ्या भूमिकेत आणि खास लुकमध्ये दिसणार आहे. नुकताच पहिला टिझर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांना याची झलक पाहायला मिळालेली आहे.




देवदत्त नागे एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याच्या पुनरागमनाविषयी असलेली उत्सुकता अधिक वाढलेली आहे. प्रोमोमध्ये देवदत्त नागे एका गुंडाच्या मागे धावताना दिसतो आहे. त्याच्या हातात एक पिस्तुल आहे. त्याच्या हातातील पिस्तुल अचानक अदृश्य होते व त्या जागी स्टेथस्कोप दिसू लागतो. त्याचप्रमाणे त्याच्या अंगावरील कोट पांढऱ्या लॅबकोटमध्ये परावर्तित होतो, असे या प्रोमोमध्ये दिसते.


देवदत्तने जपलेल्या पोनीटेलमुळे, त्याचा लुक एकदमच झकास दिसतोय! हा डॉक्टर डॉन कशाप्रकारे हास्यउपचार आणि विनोदाचे फायरिंग करतो, ते पाहण्याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिलेली आहे.

Powered By Sangraha 9.0