ससून बंदरात आढळला दुर्मीळ आॅक्टोपस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2020   
Total Views |

tiger_1  H x W:

सागरी जीवशास्त्रज्ञ शोधनिबंध लिहणार


मुंबई (अक्षय मांडवकर) - सागरी परिसंस्थेत अत्यंत दुर्मीळ मानला जाणारा 'पेपर नौटिल्युसिस' आॅक्टोपसचे दर्शन आज सकाळी मुंबईतील ससून बंदरामध्ये घडले. मच्छीमारांना आढळलेले हे दोन आॅक्टोपस संशोधनासाठी सागरी जीवशास्त्रज्ञांनी ताब्यात घेतले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील मच्छीमार व सागरी संशोधकांमधील संपर्क वाढला आहे. त्यामुळे सागरी परिसंस्थेतील अनेक गुपिते उलगडण्यात मदत होत आहे.

 
 

सागरी परिसंस्थेत अधिवास करणाऱ्या जीवांबाबत आजही फार कमी माहिती उपलब्ध आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये सागरी जीव संशोधनाला चालना मिळाली आहे. सागरी जीवशास्त्रज्ञांनी मच्छीमारांसोबत निर्माण केलेल्या समन्वयामुळे सागरी परिसंस्थेतील काही दुर्मीळ जीवांचे दर्शन घडू लागले आहे. आज सकाळी आॅक्टोपसची एक दुर्मीळ प्रजात ससून बंदरात मच्छीमार करण कोळी यांना आढळून आली. मुंबईपासून साधारण २०० किमी खोल समुद्रात मच्छीमारांच्या जाळ्यात आॅक्टोपस ही प्रजात सापडल्याची माहिती कोळी यांनी दिली. मासेमारीच्या माध्यमातून बंदरावर नेहमी येणाऱ्या आॅक्टोपसच्या प्रजातींपेक्षा ही प्रजात वेगळी दिसल्याने कोळी यांनी याबद्दलची माहिती सागरी जीवशास्त्रज्ञ स्वप्निल तांडेल यांना दिली.

 

tiger_1  H x W: 
 

आॅक्टोपसची ही प्रजात 'पेलाजिक आॅक्टोपस'च्या 'अर्गोनौट' या ग्रुपमधील असून ती अत्यंत दुर्मीळ असल्याची माहिती 'वाईल्ड लाईफ ट्रस्ट आॅफ इंडिया'चे सागरी जीवशास्त्रज्ञ स्वप्निल तांडेल यांनी दिली. या प्रजातीच्या माद्या अंडी उबवण्याबरोबच त्यांचे रक्षण करण्यासाठी आपल्या शरीराभोवती कागदासारख्या पातळ जाडीचे कॅलशियमचे कवच तयार करतात. हे कवच साधारण ३० सेंटीमीटर पर्यत वाढते. म्हणूनच त्यांना 'पेपर नौटिल्युसिस' आॅक्टोपस म्हटले जाते. या कवचामध्येच अंडी परिपक्व होऊन पिल्लांचा जन्म होत असल्याचे तांडेल यांनी सांगितले. आॅक्टोपसमधील प्रजाती या प्रामुख्याने समुद्राच्या तळाशी आढळतात. मात्र, 'पेपर नौटिल्युसिस'मधील मादी ही तिच्या कवचामुळे पाण्यावर तंरगत राहते. ससून बंदरात 'पेलाजिक आॅक्टोपस'च्या दोन माद्यांचे नमुने सापडले आहेत. या प्रजातीमधील नर हे २ सेंटीमीटर आणि मादी १० सेंटिमीटरपर्यत वाढते. छोटे कर्स्टेशियन्स, जेलीफिश, मोलस्क या आॅक्टोपसचे खाद्य आहे.

 

 

आॅक्टोपसचे नमुने मच्छीमारांकडून ताब्यात घेताना सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे

tiger_1  H x W: 
 
 
शोधनिबंध लिहणार...

 

'पेपर नौटिल्युसिस' आॅक्टोपस हा सामान्यत: दिसत नसल्याने त्यावर स्वप्निल तांडेल आणि मॅंग्रोव्ह फाऊंडेशनचे सागरी जीवशास्त्रज्ञ हर्षल कर्वे शोधनिबंध लिहणार आहेत. कर्वे यांनी मच्छीमारांकडून या दोन्ही आॅक्टोपसना ताब्यात घेतले आहे. ही प्रजात दुर्मीळ असल्याने आम्ही यावर शोधनिबंध लिहणार असल्याचे तांडेल यांनी सांगितले.

@@AUTHORINFO_V1@@