बाबांचा प्रकोपही होऊ शकतो!

    दिनांक  23-Jan-2020 19:44:12   


saf_1  H x W: 0


श्रद्धा-अंधश्रद्धेवरून धुमाकूळ घालणारे प्रसिद्धी महंत खूप आहेत. शिर्डीचे साईबाबा अशा धर्मद्रोही कारवायांवरचा दैवी अंकुश आहे. राजकारण जरूर करा, पण त्यात साईबाबांना ओढू नका. कुणी सांगावे, बाबांचा प्रकोपही होऊ शकतो.


आजच्या महाराष्ट्राचे वर्णन करायचे तर ते एका वाक्यात करता येईल, "ज्या प्रदेशात रोज काही ना काही नवीन वाद उत्पन्न केले जातात, त्या प्रदेशाला 'महाराष्ट्र' म्हणायचे." 'महा' हा शब्द असल्यामुळे वादही 'महान' असतात. हे महान वाद उत्पन्न करणारे नेतेदेखील 'महान' असतात. शरद पवार हे अनेक वादांचे जनक असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा क्रमांक नंतर, त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि नंतर जी लाईन लागते, त्यातील सर्वच नावे घेतली, तर सहस्त्र नामावलीचा एक अध्याय तयार होईल. शिर्डीचे साईबाबा हे तसे वादातीत व्यक्तिमत्त्व. पण, जे महान लोक छत्रपती शिवाजी महाराज, रामदास स्वामी यांच्यावरदेखील वाद निर्माण करू शकतात, ते शिर्डीच्या साईबाबांना कसे सोडणार? साईबाबा शिर्डीत प्रकटले. एका मुस्लीम बांधवाच्या वरातीबरोबर ते शिर्डीत आले आणि नंतर तिथेच ते मरेपर्यंत राहिले. शिर्डीतील त्यांची जीवनकहाणी सामान्यपणे सर्वांना माहीत आहे. त्यावर मराठी, हिंदी आणि अन्य भाषेत चांगले चित्रपट निघाले आहेत. त्यांचा परिचयदेखील 'शिर्डीचे साईबाबा' असाच करून दिला जातो. हळूहळू शिर्डीचे महत्त्व तीर्थक्षेत्रासारखे होत गेले. दरवर्षी लाखो भाविक शिर्डीला येऊ लागले. त्यांच्या येण्यामुळे दळणवळणाच्या सुविधा शिर्डीत उभ्या करण्यात आल्या. रस्ते, रेल्वे, विमानतळही आले. शिर्डीत आर्थिक उलाढाल प्रचंड होऊ लागली. हजारो लोकांना रोजगार मिळाले. हजारो जणांच्या जीवनात समृद्धी आली. देवस्थानाचे उत्पन्न वर्षाला दोन हजार सहाशे कोटींच्या आसपास झाले. एखाद्या बहुद्देशीय कंपनीची उलाढाल याच्या आसपास असते. हे अर्थकारण डोळे दिपवून टाकणारे आहे.

 

राजकारणी माणसांनी विचार केला, साईबाबांचे स्थान शिर्डीच कशाला असायला पाहिजे, आपण त्यांचे जन्मस्थान शोधूया. परभणी जिल्ह्यातील पाथरी हे त्यांचे जन्मस्थान असल्याचे सांगायला अनेकांनी सुरुवात केली. खुद्द साईबाबांनी कधीही 'मी कोण?' 'माझे आई-बाप कोण?' 'मी कोठून आलो?' 'माझे गुरू कोण?' हे सांगितले नाही. त्याबाबतीत त्यांनी मौन धारण केले होते. साधु आणि सिद्ध पुरुषांची जात विचारायची नसते, त्यांचा जन्म आणि कुळ विचारायचे नसते, अशी आपली परंपरा आहे. या वादात मुख्यमंत्रिपदाचा कोणताही अनुभव नसलेले उद्धव ठाकरे पडले. साईबाबांचे जन्मस्थान पाथरी असल्याचे त्यांनी ठरवून टाकले आणि तिच्या विकासासाठी शंभर कोटी देण्याची घोषणा केली. 'प्रतिशिर्डी' निर्माण करण्याचा हा सगळा खटाटोप. पण, हा विषय वाटतो तितका सरळ नाही. साईंचे भक्त सर्व ठिकाणच्या साई मंदिरात श्रद्धेने जातात. पाथरीलाही जातात. तीर्थस्थाने भक्त निर्माण करतात. राजसत्ता तीर्थस्थान निर्माण करू शकत नाही. पाथरीचा विषय भक्तांवर सोडून द्यावा. एक शिर्डी वर्षाला दोन हजार सहाशे कोटी रुपयांची उलाढाल करते आणि तीही फक्त देवस्थानाची. जे यात्रेकरू येतात, ते जो खर्च करतात, तो जर मिळविला तर सर्व आर्थिक उलाढाल पंचवीस हजार कोटींचा आकडाही पार करील. 'प्रतिशिर्डी' निर्माण झाली तर तिथेही या आर्थिक उलाढाली होतील. कदाचित शिर्डीचा ओघ कमी होईल, असाही वाद निर्माण करणाऱ्या राजकारण्यांचा कयास असावा. देवस्थान झाले की, देवस्थानाचा ट्रस्ट तयार होतो. ट्रस्टी होता येते. अध्यक्ष होता येते. अनेक जणांची राजकीय सोय लावता येते. ही मंडळी पुढे काय काय करतात... चांगलंच करतात, असे आपण मानूया.

 

मध्यंतरी द्वारकापीठाच्या शंकराचार्यांनी साईबाबांवर वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. साईबाबा देव नाहीत. त्यांची पूजा करू नये, त्यांची मंदिरे बंद करून टाकावीत, असे आदेश त्यांनी दिले. हे शंकराचार्य कोण, हे सामान्य माणसाला माहीत नसल्यामुळे (इतकं त्यांचं काम अफाट आहे) सामान्य भक्तांनी त्याकडे काहीही लक्ष दिले नाही आणि ते गात बसले, 'साईराम साईराम... साईनाथ तेरे हजारो हाथ... शिर्डीचे साईबाबा स्वप्नात माझ्या आले...' वगैरे. परंतु, हा वाद मात्र पेटत राहिला आहे. तो पेटत राहिला आहे, कारण तो पेटण्यासाठीच निर्माण केला आणि पेटविण्यामागे सर्व राजकारणी लोक आहेत. या सर्व लोकांना साईबाबांचे मौलिक कार्य किती समजले, असा प्रश्न आपण विचारायचा नसतो. राजकारणातील नेत्यांना असा प्रश्न विचारलेला आवडत नाही. पण, सामान्य माणसांसाठी म्हणून आपण विचार करूया. साईबाबांची दोन वाक्ये प्रसिद्ध आहेत. 'श्रद्धा, सबुरी' आणि 'सबका मालिक एक.' साईबाबा शिर्डीत प्रकटले. प्रश्न मनात असा निर्माण होतो की, ते परभणीत का नाही प्रकटले? औरंगाबाद जिल्ह्यात का नाही प्रकटले? मुंबईत का नाही प्रकटले? सिद्धपुरुषाच्या अवतार कार्याची चिकित्सा करणे, अतिशय कठीण काम असते. साईबाबांच्या काळचा नगर जिल्हा ख्रिश्चन मिशनऱ्यांचा धर्मांतराचा अड्डा झाला होता. आजही फार मोठ्या मिशनरी संस्था, रुग्णालये, सेमिनरी, शाळा, महाविद्यालये, नगर जिल्ह्यात आहेत. हिंदू समाजात अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात ब्राह्मण समाजाचे स्थान गुरूचे असे. यातील पंडिता रमाबाई ज्या वेदशास्त्रसंपन्न होत्या, त्या ख्रिश्चन झाल्या. त्यांचा आश्रम तिथे उघडला गेला. मराठीतील पहिल्या पाच कवींत ज्यांची गणना केली जाते, असे कविवर्य वामन टिळक हे ख्रिश्चन झाले. नंतर त्यांनी 'ख्रिस्त पुराण' लिहिले. 'रेडियो सिलोन'वरून अनेक वर्षे टिळक आणि ख्रिस्त असे प्रवचन ऐकविले जायचे. सामान्य माणसांना टिळक म्हणजे लोकमान्य टिळकच आठवतात. मराठीतील महान अभिनेते शाहू मोडक हेदेखील ख्रिश्चनच होते.

 

आध्यात्मिक भुकेपोटी पंडिता रमाबाई, टिळक आणि मोडक परिवार यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल, पण ही तिन्ही नावे ब्राह्मण समाजातील आहेत. त्यांचे अनुकरण सामान्य हिंदू करीत असतो. आज करीत नसला तरी अठराव्या-एकोणिसाव्या शतकात ही स्थिती नव्हती. अहमदनगर जिल्ह्यात महार समाजात ख्रिस्तीकरणाचे प्रमाण फार मोठे झाले. त्यांना 'ख्रिस्ती-महार' म्हणतात. मातंग समाजातही ख्रिस्तीकरणाचे प्रमाण वाढले. कष्टकरी जनतेमध्ये ख्रिश्चन होण्याची फार मोठी लाट आली. याला भरीस भर म्हणून देव, धर्म नाकारणाऱ्या कम्युनिस्ट चळवळीचादेखील नगर जिल्हा गड झाला. परमेश्वराने साईबाबांना शिर्डीला प्रकट व्हायला लावून धर्मजागरण करण्याचे काम त्यांच्याकडून करवून घेतले. त्यांचे एक वाक्य, 'सबका मालिक एक' ऐकायला आणि बोलायलाही सोपे आहे. त्यामध्ये अर्थाचा दारूगोळा भरलेला आहे. ईश्वर एकच आहे. त्याची नावे अनेक असतील. त्या एका ईश्वराचीच पूजा करा. तो अनेक रूपात प्रकट होतो. आपला मार्ग सोडण्याची काही गरज नाही. त्याला शरण जा, तुमचे कल्याण होईल. साईबाबांनी याशिवाय काही सांगितले नाही. एका विशिष्ट देवाची पूजा करा, असेही सांगितले नाही. एका अक्षरानेदेखील ख्रिस्ती धर्मावर किंवा त्यांच्या धर्मसंस्थेवर टीका केली नाही. भारताचा जो सनातन आध्यात्मिक मार्ग आहे, तो त्यांनी काळाच्या संदर्भात आचरणात आणला.

 

ते मशिदीत राहिले, पण तिचे नाव 'द्वारकामाई' असे ठेवले. पोशाख फकिराचाच ठेवला, उपदेश मात्र सर्वांचे कल्याण करण्याचा केला. 'जो माझ्या फकिरी पंथाचा नाही, तो काफर' असे ते चुकूनही बोलले नाहीत. 'सबका मालिक एक' हेच ते सांगत राहिले. त्याचे भजन-चिंतन करा, हाच त्यांचा उपदेश. जे दीन-दुःखी आहेत, त्यांची सेवा करा, भुकेल्या माणसास अन्न द्या. आजारी असेल, त्याची सेवा करा. मानवी सेवेचा मार्ग त्यांनी स्वीकारला. स्वतःचा पंथ निर्माण केला नाही की मठ निर्माण केला नाही, आश्रम निर्माण केला नाही. आपला कुणी वारस निर्माण केला नाही. जे काम ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात केले, तुकोबारायांनी सतराव्या शतकात केले, तेच काम साईबाबांनी एकोणिसाव्या शतकात केले. हे काम म्हणजे तुकारामांच्या भाषेत सांगायचे तर, 'धर्माचे पालन करणे पाखंड खंडन। हे चि आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम॥' साईबाबांवर नको ते वाद करण्यापेक्षा त्यांचे हे धर्मकार्य समजून घेऊन ते जर पुढे नेले तर धर्माच्याच भाषेत सांगायचे तर फार मोठे पुण्य प्राप्त होईल. आजही आपला धर्म सोडून परधर्मात जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. असे समूह नंतर जीवघेणे प्रश्न निर्माण करतात. सर्वच करतात असे नाही, पण त्यांची डोकी फिरविणारे नेते असतात, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. श्रद्धा-अंधश्रद्धेवरून धुमाकूळ घालणारे प्रसिद्धी महंत खूप आहेत. शिर्डीचे साईबाबा अशा धर्मद्रोही कारवायांवरचा दैवी अंकुश आहे. राजकारण जरूर करा, पण त्यात साईबाबांना ओढू नका. कुणी सांगावे, बाबांचा प्रकोपही होऊ शकतो.