नाईट लाईफ होणारच... राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब

    दिनांक  22-Jan-2020 15:00:57


saf_1  H x W: 0


पोलिसांवर ताण येणार नाही असे आश्वासन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी दिले

 

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या नाईट लाईफच्या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. येत्या २६ जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारपरिषदेत दिली. तसेच, आदित्य ठाकरे यांनी पोलिसांवर कोणताही ताण येणार नाही असे आश्वासन दिले आहे. परंतु, महिला सुरक्षेचा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.

 

राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईत २७ जानेवारीपासून नाईट लाईफ सुरू करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, “रोजगार निर्मिती आणि महसूल वाढवण्याबरोबर लोकांना २४ तास सेवा मिळावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. नाईट लाईफ म्हणजे केवळ पब आणि बार इतकेच नसेल. बार आणि पबसाठी महसूलचे निर्णय आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पब आणि बार पूर्वीप्रमाणेच रात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, इतर हॉटेल्स, दुकाने आणि मॉल्स २४ तास सुरू राहतील. यात २४ तास दुकाने सुरू ठेवणे बंधनकारक नाही. हे प्रत्येकावर अवलंबून असेल.

 

पोलिसांवर ताण नाही : आदित्य ठाकरे

 

पोलिसांवर येणाऱ्या ताणाबद्दल आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, "मॉल किंवा मिल कपाउंड अशा ठिकाणी कुणीही राहत नाही. केवळ तेथील दुकाने, हॉटेल्स आणि थिएटर २४ तास सुरु राहतील. त्यामुळे निवासी भागातील लोकांना याचा त्रास होणार नाही. तसेच रात्रीच्यावेळी पोलिसांनाही दुकाने बंद झाली आहेत किंवा नाहीत, यासाठी गस्त घालण्याचा त्रास होणार नाही. यामुळे पोलिसांवरील ताण कमी होणार आहे."