नाईट लाईफमुळे 'निर्भया' सारख्या घटना वाढतील : राज पुरोहित

21 Jan 2020 12:24:02


aditya thackeray_1 &



मुंबई : मुंबईत नाईट लाईफ सुरु करण्याचा प्रस्ताव पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारसमोर ठेवला होता, त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. परंतु मुंबईत नाईट लाईफ सुरु झाल्यास महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ होईल तसेच निर्भयासारख्या शेकडो घटना घडतील, असे मत भाजपाचे आमदार राज पुरोहित यांनी व्यक्त केले आहे. भाजपचा नाईट लाइफला सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यातच भाजप आमदार राज पुरोहित यांनी नाईट लाईफवरून महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला.



पुरोहित म्हणतात
, “मुंबईमधील मॉल्स, हॉटेल्स आणि पब २४ तास खुले ठेवण्याचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी मांडला आहे. जर मद्यपानाची ही संस्कृती प्रसिद्ध पावली तर मुंबईत महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढेल आणि शेकडो निर्भयासारख्या घटनाही घडतील. त्यामुळे आदित्य ठाकरेंनी ही संस्कृती भारतासाठी योग्य आहे का ? याचा विचार करावा.



भाजप आमदार ऍड. आशिष शेलार यांनीही या निर्णयाचा विरोध केला होता. ते म्हणतात
,"मुंबईत हॉटेल्स, बार, पब चोवीस तास सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे समजले. त्याबाबत नियम, नियमावली काय आहे ही प्रसिद्ध व्हायची आहे. ती झाल्यावर सविस्तर बोलूच. पण निवासी भागात हॉटेल्स, पब चोवीस तास सुरु ठेवून सामान्य नागरिकांची शांतता भंग होणार असेल तर आमचा याला कडाडून विरोध राहिल", अशी भुमिका त्यांनी मांडली होती.



२६ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु होणार आहे. यासंदर्भात एक बैठक नुकतीच मंत्रालयात पार पडली. या बैठकीत प्रायोगिक तत्त्वावर नाईट लाईफ सुरु करण्याला संमती देण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स
, मॉल्स २४ तास सुरु राहू शकतात.मुंबईत नाईट लाईफ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजपा आणि शिवसेना युती सरकारच्या काळातच ही संकल्पना मांडली गेली होती. मात्र, त्यावेळी याबाबत काही निर्णय झाला नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार येताच या संदर्भातला निर्णय प्रायोगिक तत्त्वावर मजूर करण्यात आला आहे.

Powered By Sangraha 9.0