कोणाकोणाला फसवाल?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


फसवाफसवी करताना उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेनेला आनंदाचे भरतेही येत असेलच, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, जनादेशाचा अपमान करून, फसवून, बेईमानी करून असंगाशी संग केल्याचा पंचनामा एक ना एक दिवस होईल आणि त्यावेळी शिवसेनेच्या ओहोटीला सुरुवात होईल.


"शिवसेनेने २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापण्याचा प्रस्ताव दिला होता," असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. चव्हाणांच्या या रहस्योद्घाटनाने खरे म्हणजे शिवसेनेचा सत्तापिपासू चेहरा ढळढळीतपणे उघड झाल्याचे दिसते. तसेच आताच्या निवडणूक प्रचारावेळी भाजपसोबत राहून कधीही काँग्रेससोबत जाणार नाही, वेडेवाकडे कृत्य करणार नाही, असे पालुपद लावणाऱ्या शिवसेनेने पाच वर्षांपूर्वीच काँग्रेसशी सूत जुळवण्याचे नक्की केल्याचे स्पष्ट होते. परंतु, तेव्हा काँग्रेसच्या दावणीला जुंपता न आल्याने शिवसेनेने भाजपबरोबर २०१४ ते २०१९ पर्यंत सत्तासुख अनुभवण्याचे ठरवले. तथापि, शिवसेनेच्या अशा वागण्यातून त्या पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर मतदार, हितचिंतकांनाही फसवल्याचे दिसते. उल्लेखनीय म्हणजे, शिवसेनेने हा फसवाफसवीचा धंदा सुमारे पाच वर्षे बिनबोभाट चालवला. एकीकडे भाजपबरोबर सत्तेत असताना मनाजोगी खाती न मिळाल्याने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तेव्हाचे भाजपाध्यक्ष अमित शाहंवर टीका करायचे आणि भाजपला रोखण्यासाठी हातपाय हलवण्याचे काम शिवसेनेने केले. त्याचवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तेच्या मधुचंद्राची स्वप्ने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने पाहिली. अखेर त्याची पूर्तता यंदाच्या निवडणुकीनंतर झाली आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडेवरून शिकाऊ शिवसैनिक मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसला. अर्थातच, या सगळ्या घडामोडीमागे बारामतीच्या काकासाहेबांचा वरदहस्त होताच. कोणत्याही दोन पक्षांतली घडी विस्कटून स्वतःच्या स्वार्थाची घडी बसवण्यात शरद पवार पक्के वस्ताद! त्यांनी शिवसेनेच्या संजय राऊतांचे गुरुत्व पत्करले आणि राज्यात तीन विरुद्ध विचारांच्या पक्षांची अभद्र आघाडी साकारली. पण, शिवसेना आणि त्याच्या म्होरक्यांनी जनहितासाठी नव्हे, तर केवळ भाजपला रोखण्यासाठी केलेल्या बेईमानीची परतफेड हा महाराष्ट्र केल्यावाचून राहणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

 

दरम्यान, शिवसेनेने नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्याला आपल्या विस्तारासाठी वापरून घेतले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच शिवसेना फोफावली आणि तिने पालिका, महापालिकेपासून राज्याची सत्ताही हस्तगत केली. त्यावेळी शिवसेनेच्या चाव्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात होत्या. पण, त्यांच्यानंतर आलेल्या बुणग्यांनी शिवसेनेच्या तत्त्व, विचार आणि मूल्यांचीच लक्तरे टांगण्याची कामे केली. २०१४ सालीदेखील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अवतार तोच होता-हिंदू व हिंदुत्वविरोधी. मुस्लिमांच्या लांगूलचालनासाठी हिंदू दहशतवादाचे भूत या दोन पक्षांनीच उभे केले होते. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानातील काव्यपंक्ती उखडून टाकणारे मणिशंकर अय्यरही काँग्रेसमध्येच होते. ९३च्या मुंबई बॉम्बस्फोटावेळी अधिकचा एक स्फोट झाल्याची थाप मारणारे शरद पवारच त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते, पण शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बहुसंख्य हिंदूंची मानहानी करणाऱ्या कुकृत्यांची अजिबात पर्वा नव्हती. आपल्या कार्यकर्त्यांनी आजपर्यंत हिंदुत्वाचे नाव घेत पक्षाचा प्रचार-प्रसार केला, त्यांचीही आठवण शिवसेनेला राहिली नाही. ज्या मतदारांनी आपल्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवत मतदान केले, त्यांनाही शिवसेना विसरली. सत्तेच्या सोनेरी ताटासाठी शिवसेनेने आतापर्यंत ज्यांच्याविरोधात आपण लढलो, त्यांच्याच अंगणात नाचण्याचे ठरवले. आपल्या कार्यकर्त्यांची, मतदारांची अशाप्रकारे फसवणूक करणारा शिवसेनेसारखा दुसरा कोणता पक्ष असेल? काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपली लाज वाचावी म्हणून विचार जुळत नसल्याच्या कारणावरून शिवसेनेचा प्रस्ताव फेटाळला. नंतर मात्र तोंडावर आपटलेल्या उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला आणि नंतरची पाच वर्षे आपल्या दगाबाजीची अजिबात लाज न बाळगता सत्तेला चिकटून राहणे पसंत केले. कशाला? तर पाच वर्षांनंतर भाजपला व कार्यकर्ते-मतदारांना कसे फसवावे याचे षड्यंत्र रचण्यासाठीच ना? आम्ही भाजपसोबत आहोत, असे दाखवून नंतर भाजपशी बेईमानी करण्यासाठीच ना? आणि त्यांनी ती तशी केलीही. कार्यकर्ते-मतदारांना फसवण्याचा जो मनसुबा पाच वर्षांपूर्वी केला होता, तो आताच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने पुरा केला. म्हणूनच शिवसेनेने आधी आपले नामकरण करून घ्यावे आणि सरळ 'फशिवसेना' असे नाव धारण करावे, जेणेकरून बेईमानी करणाऱ्यांची अधिकृत संघटना म्हणून शिवसेनेची कीर्ती त्रिखंडात गाजेल.

 

शिवसेनेने पाच वर्षांपूर्वी भाजपला अंधारात ठेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर पाट लावण्याचा प्रयत्न केला, तो कारनामा यावेळी प्रत्यक्षात आणून दाखवला. पण पुढे काय? कारण, शिवसेनेने २०१४ ला आधी कार्यकर्ते व मतदारांना फसवले आणि नंतर भाजपलाही फसवले. पाच वर्षे हा पक्ष सगळ्यांनाच फसवत आला. विरोधी पक्षांनी जे शब्द कधी वापरले नाही, ते शिवसेनेने भाजपविरोधात वापरले. झटका आल्यासारखे शिवसेनेचे प्रवक्ते आणि मुखपत्र आपल्याच सरकारच्या नावाने शिमगा करताना दिसले. अर्थातच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्यानेच सेना नेतृत्वाच्या तोंडातून ही गांजा लावलेली भाषा निघत असेल. आता तर सत्तेच्या मस्तवालपणातून त्या पक्षाच्या म्होरक्यांचा साराच तोल ढासळल्याचे दिसते. मात्र, फसवाफसवी करून तुम्हाला क्षण दोन क्षण गाजवल्याचे समाधान मिळू शकते, पण सदासर्वकाळ तसे कधी होऊ शकत नाही. कार्यकर्ते वा मतदारांना तुम्ही एकदा फसवू शकता, पण त्यांच्याशी पुन्हा पुन्हा बेईमानी करू धजावलात तर ते तुम्हाला सत्तेच्या तख्तावरून जमिनीवरही आणायला अजिबात कमी करणार नाहीत. पण, त्यातून सुधारणा घडेल ती शिवसेना कसली? उलट अजूनही कोणाकोणाला फसवायचे, याची यादी शिवसेनेकडे तयार असेल, काल भाजप आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि सदासर्वकाळ कार्यकर्ते, मतदार व जनता! ही फसवाफसवी करताना उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेनेला आनंदाचे भरतेही येत असेलच, पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, जनादेशाचा अपमान करून, फसवून, बेईमानी करून असंगाशी संग केल्याचा पंचनामा एक ना एक दिवस होईल आणि त्यावेळी शिवसेनेच्या ओहोटीला सुरुवात होईल. तेव्हा मात्र शिवसेनेला काळाशी फसवाफसवी करता येणार नाही.

 
@@AUTHORINFO_V1@@