कांदळवन - एक समृद्ध परिसंस्था

    20-Jan-2020
Total Views |

tiger_1  H x W:गेल्या काही वर्षांमध्ये समाजात कांदळवनांविषयी जनजागृती झाली आहे. कांदळवनांची कुठे तोड होत असल्यास किंवा त्यावर भराव टाकला जात असल्यास नागरिकांकडून त्याविषयी आवाज उठवला जातो. ही कांदळवने एवढी का महत्त्वाची आहेत, त्याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...

 
 

मुंबई (डाॅ.शीतल पाचपांडे) -  आपण पृथ्वीवर अनेक जंगले पाहिली असतील, पण एक असेही जंगल या पृथ्वीवर आहे जे दूरवर असलेल्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असते. त्यामध्ये राहणार्‍या प्रत्येक जीवावर चंद्राचा प्रभाव तीव्र असतो. समुद्र आणि जमिनीच्या संगमस्थळी ही जंगले दिसून येतात. या जंगलांमध्ये समुद्राचे पाणी भरती बरोबर आत येते, तर ओहटी झाली की पुन्हा समुद्राकडे निघून जाते. या सगळ्या प्रक्रियेतूनच अशा निराळ्या जंगलाची निर्मिती झाली आहे. अशा जंगलांना ‘कांदळवन’ किंवा ‘खारफुटी जंगल’ (कारण, ही जंगले खार्‍या पाण्यात वाढतात) म्हणून संबोधले जाते. ही जंगले खाड्या, नद्यांच्या काठी किंवा समुद्राच्या नजीकच्या भागांमध्ये दिसून येतात.

तसे पाहायला गेले, तर कांदळवन हे नाव हल्ली फारच चर्चेत आले आहे. वृत्तपत्र, न्यूज चॅनेल, मासिके सगळीकडे आपल्याला कांदळवनांबद्दल बातम्या ऐकायला मिळतात. परंतु, महाराष्ट्रामध्ये कांदळवनांना त्यांचे हे मानाचे स्थान सहजासहजी मिळाले नाही. या प्रक्रियेला साधारण दहा एक वर्ष लागली आहेत. आज अनेकांना ठाऊक असेल की ही कांदळवने, २००८ मध्ये संरक्षित वने म्हणून घोषित झाली आणि त्या नंतर २०१३ मध्ये त्यांना राखीव वनांचा दर्जा मिळाला. त्याबरोबरच एका नव्या संशोधनाचे दालन खुले झाले. अभ्यासू मंडळींकडून कांदळवने जाणण्याच्या आणि जोपासण्याच्या कलेला सुरुवात झाली.

 
 

tiger_1  H x W: 

ही कांदळवने का जोपासली पाहिजेत ? याचे उत्तर आपल्याला तामिळनाडूला बसलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात किंवा गेल्या काही वर्षांमध्ये भारतात जागोजागी झालेल्या अतिवृष्टीमुळे मिळाली आहेत. महाराष्ट्राने तर गेल्या वर्षी कोल्हापूर, मुंबई, पुणे, अशा अनेक भागांमध्ये अतिवृष्टी अनुभवली. निसर्गाचा प्रकोप दरवर्षी आपल्याला वेगवेगळ्या रुपात दर्शन देत आहे आणि आपण याला सामोरे जायला किती असक्षम आहोत, हेही आपल्याला अवगत झाले आहे. जोरदार पाऊस, अतिवृष्टी असो वा चक्रीवादळ किंवा त्सुनामी या सगळ्यांवर एकच जालीम उपाय आज आपल्याकडे उपलब्ध आहे, तो म्हणजे कांदळवन. कारण, जेव्हा २००४ मध्ये तामिळनाडूत चक्रीवादळ आले तेव्हा तिथल्या किनारपट्टीवरील फक्त मुथुपेठ आणि जावपास गाव अबाधित राहिले. याचे कारण शोधले असता असे दिसून आले की, या गावांना कांदळवनांचे आवरण होते. असे असले, तरी आज कांदळवनांना अनेक धोके आहेत. जागतिक पातळीवर झपाट्याने त्यांचा र्‍हासच होत आहे. वाढते शहरीकरण, त्यामधील घन कचरा, सांडपाणी, कारखान्यांमधून येणारे सांडपाणी या सगळ्याला जागो जागी असलेल्या खाड्या किंवा कांदळवन परिसंस्थेला सामोरे जावे लागते. त्यामुळे कांदळवनांना वाचवणे गरजेचे असले तरी या सगळ्या समस्यांमुळे ते कठीण झाले आहे.

 
 

कांदळवनांचे संवर्धन

महाराष्ट्राने या सगळ्यातून लवकरच बोध घेऊन कांदळवनांचा पाया दिवसेंदिवस घट्ट करण्याचा निर्धार केला, असे म्हणायला हरकत नाही. उपलब्ध कांदळवनांना राखीव वनांचा दर्जा मिळाला, नंतर राज्य सरकारने वनखात्यांतर्गत स्वतःचा स्वतंत्र ’कांदळवन कक्ष’ स्थापित केला. ‘अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक, कांदळवन कक्ष’ यांना हा कक्ष सांभाळणे व वृद्धिंगत करण्याची कामगिरी सोपविली. पुढे ’कांदळवन कक्षा’अंतर्गत ’कांदळवन प्रतिष्ठाना’ची स्थापना झाली आणि कांदळवन अभ्यास, संशोधन आणि त्यांच्या बद्दलची जागरूकतेला नव्याने पंख फुटले. ’कांदळवन प्रतिष्ठान’अंतर्गत ’कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजनें’तर्गत साधारण १२० गावे सहभागी झाली आहेत. एवढेच नाही राज्य सरकारच्या ५० कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत कांदळवनांनादेखील सामावून घेण्यात आले. या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये ६० लाखांच्या वर कांदळवनांची रोपे लावण्यात आली. अनेक कॉर्पोरेट, एनजीओ, शाळा व महाविद्यालयांनीदेखील वनमहोत्सवांतर्गत कांदळवनाची रोपे लावण्यासाठी पुढाकार घेतला. या सगळ्याचा परिणाम आपल्याला दर दोन वर्षांनी प्रकाशित झालेल्या वन सर्वेक्षणअहवालाच्या माध्यमातून दिसून आला आहे. २००५ ते २०१३ मध्ये महाराष्ट्रातील कांदळवनांचे क्षेत्र १८५ चौ.कि.मी. क्षेत्रात विस्तारलेले होते. आज ते ३२० चौ. कि. मी. इतके झाले आहे. गेल्या सहा वर्षांत कांदळवनांमध्ये तब्बल ७२ टक्के वाढ दिसून आली आहे. महाराष्ट्रातसुद्धा कांदळवनांची भिंत भक्कम होऊ लागली आहे. कदाचित भविष्यात समुद्राकडून येणार्‍या विनाशकारी लाटांना सामोरे जाण्यास देखील आपण सज्ज होऊ लागलो आहोत.

 

tiger_1  H x W: 
 

कांदळवनांमधील सजीव सृष्टी

कांदळवनांची जंगले ही सर्वात आश्चर्यजनक आणि अद्भुत जंगले आहेत. आपल्या माहितीत असेलल्या इतर जंगलांहून अगदी भिन्न दिसणारे. इथे सतत पाणी येते आणि जाते, माती मऊ व चिकट असते ज्याला ही कांदळवनांची मुळे घट्ट धरून ठेवतात. कांदळवनांची मुळे आपल्याला माहिती असलेल्या जमिनीत खोलवर वाढणारी नाहीत. तर ती उथळ पण दूरवर पसरलेली असतात. इथे सापडणार्‍या प्रजातींमध्ये विविध प्रकार व आकाराची मुळे दिसून येतात. काही मुळे पेन्सिलीसारखी किंवा कोनासारखी जमिनीवर झाडाच्या चारही दिशेने वाढतात. काही प्रजातींना आधार मुळे असतात तर काहींना गुडघ्याच्या आकारात पुढे सरकणारी, तर काही प्रजातींमध्ये रिंगसारखी दिसणारी मुळे जमिनीच्या वरच्या दिशेने वाढताना दिसतात. एवढेच नाही, ही मुळे भरती सोबत येणार्‍या जीवांना निवारा देतात. कांदळवनांची पाने जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा अनेक खेकडे त्या पानांचा भुगा करण्याचे काम करतात. हा भुगा खाण्यासाठी अनेक जीव येतात. अनेक मासे इथे अंडी घालायला येतात, त्यांची पिल्ले इथे मोठी होतात आणि थोडीशी मोठी झाली की पुन्हा समुद्रात झेप घेतात. अशा प्रकारे तिथे असलेल्या अन्नसाखळीचे संतुलन राखले जाते. ही अन्नसाखळी कांदळवनांपासून सुरू होते आणि अनेक छोटे जीव जसे खेकडे, किडे, अळ्या, शंख, शिंपले, मासे, पक्षी आणि माणसे या साखळीत गुंफलेले असतात. एकंदरीत इथे आढळण्यार्या जीवसृष्टीमुळे कांदळवन असलेले परिसर हे अनेक ठिकाणी निसर्गरम्य दिसतात.

 

tiger_1  H x W: 

 

कांदळवनांचे संवर्धन म्हणजे निसर्गाचा राखलेला समतोल, शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी. इतर जंगलांपेक्षा कांदळवने कितीतरी जास्त पटीने कार्बन डायऑक्साईड हा वायू शोषून घेतात आणि जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. जमिनीची धूप होण्यापासून वाचवतात आणि माणसाला समुद्राशी जोडतात. अनेक स्थलांतरित पक्षी जागतिक पातळीवर सहलीला बाहेर पडतात आणि विविध खाडी परिसरांना भेट देतात. त्याबरोबरच स्थानिक व स्थलांतर करून आलेल्या पक्ष्यांना बघण्यासाठी देश विदेशातून अभ्यासू पर्यटकदेखील गर्दी करू लागले आहेत. याचे उत्तम उदाहरण ठाणे खाडीत असलेल्या ’ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात’ दिसून येते. हजारो-लाखोंच्या संख्येने विविध पक्षी येथे आगमन करतात. थंडी सुरू होताच रोहित पक्षी, स्टॉर्क बदके, गॉडवीटसारखे पक्षी आपल्याला इथे सहज पाहायला मिळतात. एवढेच नाही, काही कांदळवन भागांमध्ये मगर, उदमांजर, पाणमांजर, कोल्हे, मुंगूस, दुगोंग आणि वाघदेखील बघायला मिळतात.
 

कांदळनांवर आधारित रोजगार

महाराष्ट्रात काळींजे, सोनगाव, वेंगुर्ला, आंजर्ले, तारामुंब्री, मिठमुंब्री अशा अनेक गावांमध्ये वनखात्याच्या ’कांदळवन कक्षा’अंतर्गत निसर्ग पर्यटनासाठी स्थानिक लोकांना प्रोत्साहन मिळाले आहे. प्रत्येक गावाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. या निसर्ग पर्यटनात कांदळवनांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक मच्छीमार आतुर आहेत. काही बोटी घेऊन सज्ज आहेत, काही ठिकाणी ’कयाकिंग’ सारखे वॉटर स्पोर्ट्सदेखील योजिले आहेत. याव्यतिरिक्त स्थानिक तुम्हाला मासेमारीच्या पारंपरिक पद्धतीदेखील शिकवतील. कधी न पाहिलेले रंगीबेरंगी समुद्री जीवांची ओळख करूनदेतील. आज शाळा, महाविद्यालये, संशोधन संस्था आणि स्थानिक सगळ्यांच्या एकत्रित कार्याने कांदळवनांचे नक्की सोने होईल आणि आपल्या सगळ्यांचेच आयुष्य सोन्यासारखे लखलखेल.

(लेखिका वन विभागाच्या ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’मध्ये साहाय्यक संचालक (प्रकल्प) पदावर कार्यरत आहेत.)

 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.