सेवा घेणारा उद्या करणारा व्हावा : सुहासराव हिरेमठ

    दिनांक  20-Jan-2020 10:31:21
|

RSS_1  H x W: 0


मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध उद्योजिका रितु छाबरिया यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांचा रविवारी पुण्यातील सेवा संगमया प्रदर्शन सोहळ्यादरम्यान जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शेजारी सोमदत्त पटवर्धन, अनिल व्यास, सुहास हिरेमठ आणि मनीषा जोशी छायाचित्रात दिसत आहेत.

 

पुणे :समाजातील पीडित, वंचितांसाठी सेवाकार्य चालवली पाहिजेत. संपूर्ण समाज सुखी, संपन्न होण्यासाठी सेवाकार्यांची नितांत आवश्यकता आहे, पण आपण आज ज्यांची सेवा करत आहोत, तो उद्या सेवा करणारा कसा होईल याकडेही लक्ष देण्याची नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी रविवारी केले.

 

रा. स्व. संघातर्फे आयोजित सेवा संगमया प्रदर्शनाचा समारोप रविवारी झाला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून हिरेमठ बोलत होते. मुकुल माधव फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि प्रसिद्ध उद्योजिका रितु छाबरिया यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. छाबरिया यांचे स्वागत संघाचे प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी, तर हिरेमठ यांचे स्वागत जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी केले.

 

त्याग आणि सेवा हे भारतीयांचे सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत. त्यामुळे भारतीयांना सेवेची शिकवण देण्याची गरज नाही,” या स्वामी विवेकानंद यांच्या वचनाची आठवण देत हिरेमठ म्हणाले की, “संघाच्या माध्यमातून देशात दीड लाख सेवा कार्य सुरू आहेत. त्या बरोबरच सेवा भावनेने, कर्तव्यभावनेने अशाच प्रकारची आणखी सुमारे 20 ते 25 लाख सेवाकार्य विविध व्यक्ती आणि संस्थांतर्फे चालवली जात आहेत. विविध प्रकारची आवश्यक सेवा कार्य करणे त्याबरोबरच ज्याची सेवा करत आहोत तो स्वावलंबी बनेल हे पाहणे हे सेवा कार्यकर्त्यांचे काम आहे. त्याहून महत्त्वाचे काम म्हणजे ज्याची आपण सेवा करत आहोत, तो उद्या सेवा करणारा बनेल, असे काम केले पाहिजे,” अशीही अपेक्षा हिरेमठ यांनी व्यक्त केली.

 

तर समर्पण, समाजाप्रती भक्ती आणि अनुशासन ही संघ कार्याची तीन महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत, ”असे रितु छाबरिया यांनी सांगितले. सेवाकार्ये मनापासून, त्यागमय भावनेतून आणि सेवावृत्तीने केली गेली पाहिजेत,” असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलेंद्र बोरकर यांनी तर सूत्रसंचालन, सुवर्णा उपलप यांनी केले. यावेळी अनिल व्यास, मंगेश घाटपांडे, सोमदत्त पटवर्धन, मनीषा जोशी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

 

सेवा संगम प्रदर्शनाला दोन दिवसांमध्ये हजारो पुणेकरांनी भेट देऊन १२५ सेवा कार्यांची माहिती घेतली. तसेच विविध संस्थांच्या कार्यामध्ये सहभागी होण्याचीही इच्छा व्यक्त केली. वारली चित्रकला पारंपरिक कला, कुंभारकाम यांसह विविध विषयांवरील कार्यशाळांनाही नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.