अब्दुल सत्तारांचे दाऊदशी संबंध ? 'सामना'तील बातमी व्हायरल

    दिनांक  02-Jan-2020 13:33:37
|


saf_1  H x W: 0

 'याकूब मेमन'च्या फाशीवर दया करण्याच्या

विनंती करणार्‍या आमदारांमध्येही सत्तार होते

 

मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेकडून यांना मंत्रिपद देण्यात आले होते. परंतु, २५ वर्षांपूर्वी शिवसेनेच्याच 'सामना' या वर्तमानपत्रातून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या गँगचे 'निकटवर्तीय' म्हणून अब्दुल सत्तार यांचे नाव जोडण्यात आले होते. 'एकेकाळी मुंबई महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे निकटचे मानले जाणारे अब्दुल सत्तार यांच्यावर चौकशी सुरू झाली आहे.' ११ जून, १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात अब्दुल सत्तार यांना दाऊदच्या जवळचे असल्याचे वर्णन केले होते. सामनाचा हा २५ वर्षांपूर्वीची बातमी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

११ जून १९९४ रोजी सामनाने 'शेख सत्तार यांचे दाऊद टोळीशी जवळचे संबंध' या नावाने एक बातमी प्रकाशित केली. अब्दुल सत्तार त्यावेळी कॉंग्रेसमध्ये होते आणि निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या नगरसेवकाचा पराभव केला. सत्तार औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड भागातील आमदार आहेत. इतकेच नव्हे तर १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेल्या याकूब मेमन यांच्यावर दया करण्याची विनंती करणार्‍या आमदारांमध्येही सत्तार होते. सत्तेसाठी आधी हिंदुत्वाला तिलांजली आणि आता गंभीर गुन्ह्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नेत्यांना मंत्रिपद यामुळे शिवसेनेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

 
 

कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश घेतला

 

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून तिकीट न मिळाल्याबद्दल संतप्त झालेल्या सत्तार यांनी गेल्या वर्षी पक्ष सोडला होता. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला आणि ते आमदार झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अब्दुल सत्तार यांना कॅबिनेट मंत्री पद दिले. शिवसेनेचे नेते व कार्यकर्त्यांकडून याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

 

शिवसेना काय म्हणते?

 

शिवसेनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ठाकरे यांच्या निर्णयाचा बचाव करत असे सांगितले आहे की, जेव्हा ही बातमी सामनामध्ये छापून आली होती, तेव्हा सत्तार यांनी दाऊदशी संपर्क साधला असता तर त्यांच्यावर कारवाई केली गेली असती. परंतु, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही यामुळे त्यांचा काही संबंध नव्हता असे मत मांडले. तरीही अजूनही यावर अनेक प्रश्न निर्माण होतात. तसेच, अब्दुल सत्तारांनी यावर काहीही बोलण्यास टाळले आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.