आर्थिक नियोजन – भाग १ : सल्लागाराची भूमिका काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Jan-2020
Total Views |

fm_1  H x W: 0



मानसशास्त्रात FOBO(Fear Of Better Option) नावाची एक संकल्पना आहे. याचा अर्थ मला अजून काही चांगला पर्याय मिळेल का? या शोधात सर्वजण असतात. प्रत्येकाच्या बाबतीत लागू पडेल असं उदाहरण म्हणजे मोबाईल फोन, साऊंड, कॅमेरा, टच, वजन, बॅटरी बॅकअप अशा कितीतरी गोष्टींची तुलना नवीन फोन घेण्यापूर्वी करून पाहत असतो. शेवटी ब्रँड आणि किंमत याच्यापाशी घेणारा अडखळतो आणि निर्णय लांबणीवर पडतो. अशीच गत कपडे, लग्नाचा जोडीदार, मुलांची शाळा, जेवणासाठी हॉटेल आणि आर्थिक आघाडीवर देखील घडत असते.

 

प्रत्येकाला Financial Plan हा शब्द मोहित करत असतो. हा Financial Plan म्हणजेच आर्थिक नियोजन पत्रक बनवून घेण्यासाठी भरमसाठ फी आकारणारे आणि देणारे सुद्धा आहेत. मग ज्यांनी बनवून घेतला ते त्याप्रमाणे अनुकरण करतात का? आजकाल Financial Plan ऑनलाईन सुद्धा बनवून मिळतात. मग सल्लागाराची गरज काय? तुमच्या आर्थिकच नव्हे तर वैयक्तिक, कौटुंबिक, व्यावसायिक, सामाजिक जबाबदारींची माहिती असणारा कुणीतरी तटस्थ मित्र म्हणून आर्थिक सल्लागार त्याची भूमिका पार पाडत असतो.

 

आर्थिक पत्रकाची सुरुवात सल्लागाराने उत्पन्न व खर्च (Income – Expense) तसेच मालमत्ता व दायित्व (Assets – Liabilities) तपासून बचत (Savings), अंदाजपत्रक (Budget), सुरक्षिततेसाठी पुरेसे विमाकवच (Insurances), कर नियोजन (Tax Planning) आणि शेवटी गुंतवणूक नियोजन (Goal Based Investment Planning) अशा क्रमाने गेले पाहिजे. यासाठी इतर सल्लागारांच्या मदतीची आवश्यकता असल्यास ग्राहकाला तसे सुचविणे, हा सुद्धा सल्ल्याचा एक भाग असतो. अन्यथा आपले अज्ञान लपविण्यासाठी ग्राहकाचे नुकसान होऊ शकते याचे सल्लागाराने भान ठेवले पाहिजे.

 

सल्लागार हा तुमचा अलिखित भागीदार असतो. तुमच्या आर्थिक सवयी त्याला माहित असल्या तरच तुमच्या आर्थिक जबाबदारींची जाणीव तुमचा सल्लागार करून देऊ शकतो. तुम्ही २० वर्षांनी निवृत्त होणार किंवा १० वर्षांनी मुलाच्या उच्च शिक्षणासाठी ठराविक रक्कम लागणार हे परिस्थितीनुरूप ध्येय असू शकते परंतु परदेशगमन हि इच्छा असू शकते. याची देखील नोंद तुमचा सल्लागार नियोजनाच्यावेळी ठेवणार. सल्लागाराने निरंतर शिक्षकाच्या भूमिकेतून ग्राहकाच्या आर्थिक साक्षरतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत. सुरुवात बचतीपासून करून गरजेनुसार इतर समजायला अवघड गोष्टींची माहिती तुम्हाला करून दिली पाहिजे.

 

तुमचे सध्याचे आर्थिक आरोग्य तपासणे, हि सल्लागाराची पहिली पायरी असली पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती प्रश्नावली सल्लागाराने तयार केली असल्यास भरून देणे किंवा तुम्ही तयार केलेले उत्पन्न व खर्च तसेच मालमत्ता व दायित्व पत्रक त्याला देणे. त्या पत्रकांमधे भविष्यातील उत्पन्नाचे तसेच निवृत्तीवेतन मिळण्याचे (असल्यास) स्त्रोत नमूद केल्यास नियोजन करणे अजून सोपे होऊ शकते. म्हणजेच आता हाती असलेल्या बचतीतून नाहक काटकसर करून भविष्यातील नियोजनावर भर दयावा लागणार नाही.

 

पूर्वतयारी झाल्यानंतर दुसरी पायरी म्हणजे तुमची जोखीमांक चाचणी करून घेणे. हि चाचणी म्हणजे तुमची अर्थमानसिकता जोखण्याची पारदर्शक पद्धत असते. भारतात अजून या पद्धतीला फारसे महत्व दिले जात नाही. आणि चाचणी करून घ्यायची म्हटली तरी स्कोअर जास्त यावा म्हणून खोटी उत्तरं दिली जातात. या चाचणीतून गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता समजते. त्यानुसार मत्ता विभाजन करणे सल्लागाराला सुलभ होते. त्यानंतर आर्थिक पत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरु होते.

 

आर्थिक पत्रक तयार झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे मार्गक्रमण सुरु आहे किंवा नाही याकरिता आढावा भेट दरवर्षी घ्यायला हवी, हि तिसरी पायरी. बऱ्याचदा परतावा मिळत आहे म्हणून किंवा मिळत नाही म्हणून गुंतवणूक प्रकारांत बदल करण्याची आवश्यकता भासू शकते. सल्लागाराचे तुमच्याशी नाते कसे प्रस्थापित झाले आहे, यांवर ते अवलंबून असते. क्लायंट नाराज होईल किंवा सोडून जाईल या भितीने सल्लागार बदल करण्यास धजावत नाही. मग दिर्घावधीत अपेक्षित परतावा न मिळाल्यास मुद्दल सुरक्षित राहिले ना? या भावनेत क्लायंट समाधान मानून घेतो.

 

सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे खूप मोठी पुंजी असली पाहिजे, अशी अजिबात आवश्यकता नसते. एका महिला क्लायंटने तिच्या येणाऱ्या बाळासाठी १,००० रुपयांची SIP भारतीय आयुर्विमा मंडळाच्या योजनेत शिशू मंदिरात प्रवेश घेण्यासाठी सुरु केली होती. ३६ महिन्यानंतर सरासरी १२.८०% चक्रवाढ पद्धतीने दोन वर्षांची फी भरली जाईल एवढे पैसे जमा झाले होते. सल्लागाराकडून शुल्क देऊन सल्ला घेण्याचे पुढील ढोबळ फायदे असू शकतात.
 

अनुभव – वेळोवेळी होणाऱ्या बदलांचा अभ्यास करून अनुभवी सल्ला मिळण्याची दाट शक्यता असते.

 

जबाबदारी – कुठलाही आर्थिक निर्णय घेतांना जबाबदारीपूर्वक गुंतवणूक साधन सुचविणे.

 

सल्ला – हा दोन प्रकारचा असतो. पहिला काय करायचे आहे? ते सांगणे. आणि दुसरा हिताचा उपदेश देणे. यापैकी तुमचा सल्लागार काय देतो? ते तपासून पहा.

 

बदलांवर लक्ष ठेवणे – तुमच्या आर्थिक स्थितीत होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवून आवश्यक तिथे गुंतवणुकीतील बदल सुचविणे.

 

कृती – सल्लागार तुमच्यासाठी उत्तम तेच करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने सांगितलेल्या कृती करण्याऐवजी बहुतांश वेळा FOBO मानसिकतेतून गुंतवणूकदार निर्णय घेण्यास कच खातो.

 

अशा मानसिकतेला निर्णयपंगुत्व मानसिकता असे संबोधले जाते. यातूनच मग FODA आणि FOMO हे मनोविकार निर्णयप्रक्रियेत अडथळे आणतात आणि मग माणसं Finding Of Better Option च्या मागे पुन्हा नवी धाव घेतात. परंतु कमी शक्यता आणि कमी पर्याय असलेली माणसं जास्त प्रभावीपणे निर्णय घेऊ शकतात आणि आनंदीही असतात, हे सिद्ध झाले आहे. झालेला उशीर हि नवी संधी आहे, निर्णयपंगुत्व दूर करण्यासाठी...

 
(क्रमशः) 

- अतुल प्रकाश कोतकर

9423187598

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@