डॉ.अरुणा ढेरे व प्रमिलताई मेढे यांचा 'डी.लिट ' पदवीने सन्मान

    दिनांक  18-Jan-2020 17:03:56
|
ss _1  H x W: 0
 


राज्यपालांच्या उपस्थितीत 'एसएनडीटी' विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ संपन्न


मुंबई : ज्येष्ठ साहित्यिक डॉ अरुणा ढेरे यांना राज्यपाल कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लेटर्स (डी.लिट.) देऊन सन्मानित करण्यात आले. एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या ६९ व्या पदवीदान समारंभात ही मानद पदवी देण्यात आली. तसेच राष्ट्र सेविका समितीच्या प्रमिलताई मेढे यांचाही हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. यावेळी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींना पदवी, पदव्युत्तर पदवी, आचार्य पदवी तसेच सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. चित्रकूट येथील उद्यमिता विद्यापीठाच्या संचालिका डॉ. नंदिता पाठक, कुलगुरू डॉ शशिकला वंजारी, प्र-कुलगुरू विष्णु मगरे, सुधीर ठाकरसी यावेळी उपस्थित होते.




 

महिलांनी कुटुंबप्रमुख म्हणून अधिक सक्षम राहण्याची गरज : राज्यपाल

महिलांमध्ये असणारा आत्मविश्वास, धाडस हे तिला नेहमीच पाठबळ देत असते. महिला ही सहनशक्तीचा मोठा खजिना आहे. महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबव्यवस्थेच्या प्रमुख या भूमिकेतून अधिक सक्षम असले पाहिजे. सामाजिक,धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रात सुवर्णपदक मिळवले तरी कुटुंबात प्रमुख भूमिकेतून सुवर्णपदकापेक्षा मोठी जबाबदारी महिलांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

 

चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा ६९ वा वार्षिक दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शशिकला वंजारी, संबंधित प्राध्यापक उपस्थित होते.

 

राज्यपाल म्हणाले, "समाजव्यवस्थेमध्ये भविष्याचा विचार करुन वर्तमानामध्ये वावरले पाहिजे. त्याचबरोबर आपला इतिहास आपण विसरु नये. आजची तरुण पिढी मोबाईलचा अतिवापर करत असल्याने त्यांचे पर्यटन, शिक्षण मोबाईलवरच सुरु असते. त्यामुळे मुलांचे फिरणे, अभ्यास करणे, गडकिल्ले यांची पाहणी करणे हे कमी झालेले आहे. मोबाईलचा योग्य वापर करावा. पण आपला जास्तीचा वेळ मोबाईलवर वाया घालवू नये." महिलांनी उच्च ध्येय ठेवून आपली वाटचाल करावी, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.







आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.