स्वच्छतेच्या दानाचे निर्मल कार्य...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020   
Total Views |


godakath_1  H x



नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ यांच्या यात्रेनिमित्त वैष्णवांचा मेळा जमतो. या मेळ्यामध्ये वारीला आलेले वारकरी आणि परिसर, पर्यावरण यांच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला निर्मलवारी उपक्रम वनवासी कल्याण आश्रमातर्फे राबवला जातो.



दि
. २० जानेवारी रोजी त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ यांच्या यात्रेनिमित्त लाखोच्या संख्येने विविध दिंडींच्या माध्यमातून वारकरी एकत्र येतात. तुलनेने भौगोलिकदृष्ट्या कमी असणारे क्षेत्रफळ आणि बहुतांश डोंगराळ जमीन अशा त्र्यंबकेश्वराच्या भूमीत या वारीच्या निमित्ताने स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन यांचे प्रश्न प्रतिवर्षी निर्माण होत असत. त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने पुण्य कमविणारे वारकरी घरी जाताना मात्र आपल्यासमवेत रोग घेऊन जात असल्याचे चित्र नेहमीच पाहावयास मिळत असे. एका पावन सोहळ्याच्या माध्यमातून असे भीषण वास्तव उभे राहू नये आणि मनी निर्मळ भाव ठेवून येणारे वारकरीदेखील निर्मळ आरोग्य घेऊनच आपल्या घरी रवाना व्हावे, यासाठी वनवासी कल्याण आश्रमच्या माध्यमातून २०१७ मध्ये निर्मलवारी हा उपक्रम हाती घेण्यात आला. २०१७ ते येणारी २०१९ ची वारी या तीन वर्षात निर्मलवारीची कार्य आणि कार्यप्रणाली इतकी उत्तम ठरली की, यंदाच्या वर्षी प्रशासनालादेखील या कार्याची दखल घ्यावी लागली, हे विशेष!



सन २०००मध्ये वनवासी कल्याण आश्रम आणि माणूस संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर वारीमध्ये वारकर्‍यांसाठी मोफत औषधांचे वाटप करण्यात येऊ लागले
. यासाठी वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत अध्यक्ष आणि नाशिक येथील ख्यातनाम वैद्यकीय व्यावसायिक डॉ. भरत केळकर व त्यांच्या पत्नी डॉ. मृणाल केळकर यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला. या सेवाकार्यादरम्यान डॉ. केळकर दाम्पत्यास जाणवले की, पंढरपूर वारीसाठी मोठी साहाय्यकारी व्यवस्था आहे. त्यामुळे अशा प्रकारची सुविधा आपण त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रेसाठीदेखील द्यावी, या विचाराने त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील वारीसाठी मोफत औषध वाटपास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या मदतीने त्र्यंबकेश्वर वारीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली.




godakath_1  H x


त्यातच त्यावेळी सरकारच्या वतीने घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय
, कुटुंबनियोजन, व्यसनमुक्ती असे विषय समोर ठेऊन या चमूने सर्वेक्षण केले. यासर्वेक्षणादरम्यान त्र्यंबकेश्वर वारीत शौचालयांची मोठी वानवा या चमूला जाणवू लागली. तसेच वारीत सामील होणार्‍या महिला वारकरी तीन ते चार दिवस केवळ शौचाला जावे लागेल आणि त्याची सोयच नसल्याने अन्नसेवनच करत नसल्याचे भीषण वास्तव समोर आले. या वारीदरम्यान सुमारे ५ ते ६ लाख लिटर मानवी मैला हा त्र्यंबकेश्वरच्या रस्त्यांवर पडून असतो जो की, पुढील ४२दिवस विघटित होत नाही, हेही या चमूच्या लक्षात आले. त्यामुळे पावन त्र्यंबकेश्वर नगरीत दुर्गंधी, रोगराई यांचे साम्राज्य निर्माण होण्यास चालना मिळते. या सर्व स्थितीमुळे त्र्यंबकेश्वर पुन्हा पूर्वपदावर येईपर्यंत येथील नागरिक बाहेर वास्तव्य करण्यास प्राधान्य देतात, हेही त्यांना जाणवले. त्यामुळे वारकर्‍यांच्या आरोग्यासाठी आणि त्र्यंबक नगरीच्या स्वच्छतेसाठी काय आणि कसे करता येईल, याची चाचपणी सुरू झाली. या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी या चमूने देहू-पंढरपूर यात्रामार्गावरील यवत हे ठिकाण गाठले. तेथे ४० कार्यकर्त्यांनी भेट देत अभ्यास केला. त्यातून त्र्यंबकनगरीतील वारीसाठी शौचालये उभारणी आणि कचरा व्यवस्थापन करावे, असा विचार समोर आला.



यातूनच त्र्यंबकेश्वर वारीचा प्रवास सन २०१८ पासून निर्मलवारीच्या दिशेने सुरू झाला
. याबाबत माहिती देताना डॉ. भरत केळकर सांगतात की, “वारी स्वच्छतापूर्ण व्हावी यासाठी शासनाकडून निधी येत असतो. मात्र, त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होतोच, असे नाही. त्यामुळे निर्मळवारीच्या चमूने नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचार्‍यांना सोबत घेत त्र्यंबकेश्वरमधील विविध स्थळांचा अभ्यास करत कार्यस्थळ निश्चिती केली. किती वारकर्‍यांना किती शौचालये लागतील, याचाही अभ्यास यावेळी करण्यात आला. त्यानुसार २२ स्थळे निश्चित करून १२ ठिकाणी प्रत्यक्ष उभारणी करण्यात आली. आज ही संख्या वाढली आहे.” प्रबोधनाचे काम करणार्‍या निर्मळवारीचा प्रशासकीय स्तरावरील प्रवास सुखकर व्हावा व सर्व अडचणींचे निराकरण व्हावे, यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकामी मोलाची भूमिका बजावली, हे डॉ. केळकर आवर्जून नमूद करतात. येथे निर्मलवारीच्या पथकाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या प्रबोधनाचे फलित म्हणजे १०० टक्के महिला तर सुमारे ६० टक्के पुरुष हे या शौचालयांचा वापर करताना आढळतात. आम्हास वारीदरम्यान अन्नदान खूप होते, मात्र स्वच्छतेचे दान पहिल्यांदाच मिळत आहे, अशी येथील वारकर्‍यांची प्रतिक्रिया निर्मलवारीची महती विशद होण्याकरिता नक्कीच पुरेशी आहे. तीन वर्षांत वारीत सहभागी होणार्‍या दिंडीचा विस्तृत डेटा तयार करण्यात आला आहे. निर्मळवारीच्या पहिल्या वर्षी २८०० स्वयंसेवक, २०१९ मध्ये ८०० तर यावर्षी ३०० स्वयंसेवक आपला सहभाग नोंदविणार आहेत. ही घटणारी संख्या वारकरी प्रबोधित होत असल्याचेच द्योतक आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.




माऊली स्वच्छतेसाठी शौचालयाचा वापर करा
, उष्टे अन्न, पत्रावळी कचरापेटीतच टाका, पुरेसे पाणी उपलब्ध होत नसेल, पुरेसा प्रकाश नसेल तर ते तेथील कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आणून द्या, असे आवाहन प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही निर्मलवारीचे स्वयंसेवक करताना दिसणार आहे. सामाजिक जागरण करत प्रबोधन करण्याचे कार्य निर्मळवारीचे सर्वच स्वयंसेवक मोठ्या आत्मीयतेने करत आहेत. या कार्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक संस्था मोलाची मदत करत आहेत. हे डॉ. केळकर आवर्जून नमूद करतात. नागरिक जेव्हा स्वत:च्या घरीदेखील शौचालये वापरू लागतील आणि ४२ दिवस विघटित न होणारा मैला रस्त्यावर येणे बंद होईल, ते खर्‍या अर्थाने निर्मलवारीचे यश असणार आहे. देशाच्या लहानलहान गावात भरणार्‍या यात्रा असो किंवा इतर मोठे उत्सव, अशा सर्वच ठिकाणी स्वच्छतेची कास धरत निर्मळता निर्माण व्हावी, यासाठी हे कार्य कसे करावे, याचे प्रशिक्षण देण्यासदेखील हा चमू सज्ज आहे. त्र्यंबकनगरी महादेव यांच्या सान्निध्याने पावन झालेली पवित्र अशी नगरी आहे. संत निवृत्तीनाथ यांच्या यात्रेच्या निमित्ताने येथे दाखल होणार्‍या लाखो वारकर्‍यांनी आपली ही नगरी स्वच्छ ठेवण्यासाठी आणि घरी जाताना आजार न नेता पुण्यच वारकरी बंधूंना नेता यावे, यासाठी माऊलीची विनंती आहे, कृपया आपण शौचालयाचा वापर करा आणि कचरा कचरापेटीतच टाका.

@@AUTHORINFO_V1@@