बेस्ट कामगारांच्या मृत्युदरात वाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2020
Total Views |

best_1  H x W:




मृत्यूचे प्रमाण वर्षाला १०० वरून १६५ वर; चालकाच्या आकस्मिक मृत्यूमुळे ५० वर्षात प्रथमच सभा तहकूब



मुंबई : बेस्टच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितीचा कामगारांच्या जीवनावर परिणाम असून विविध कारणांमुळे त्यांच्या मृत्यूच्या घटनात वाढ झाली आहे. सुमारे ३३ हजार कर्मचाऱ्यांत वर्षाला १०० कामगारांच्या मृत्यूच्या घटना घडत असत. मात्र आता हेच प्रमाण १६५ वर पोहोचले असून, त्याबाबत बेस्ट समितीत चिंता व्यक्त करण्यात आली.

बेस्टचे दिंडोशी आगाराचे बसचालक बाबारामू आलदर हे ऑनड्यूटी असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. मात्र संबंधित आगाराच्या व्यवस्थापनाने त्यांना तातडीने नजीकच्या कोणत्याही रुग्णालयात दाखल न करता आगारापासून दूर असलेल्या जोगेश्वरी येथील ट्रामा केअर रुग्णालयात दाखल करण्यास हलविले. मात्र वाहतूक कोंडीमुळे तेथे दाखल होईपर्यंत रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेमुळे प्रशासनाच्या निषेधार्थ शुक्रवारी बेस्ट समितीत सदस्य भूषण पाटील यांनी मांडलेल्या सूचनेनुसार सभा झटपट तहकूब करण्यात आली. त्यावेळी बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी वाढत्या मृत्यूदराचे भयाण सत्य मांडले.


भूषण पाटील म्हणाले की
, बेस्ट आर्थिक परिस्थितीचा आणि प्रशासनाच्या त्रासदायक धोरणांचा कामगारांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होत आहे. करारावर सही केली नाही म्हणून ५० टक्के कामगारांना वाढीव पगार मिळालेला नाही. दरवर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी भरती केलेली नाही. ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्याची शक्यता नाही. २०१९ चे जाचक ड्यूटी शेड्युल अजूनही बदललेले नाही. त्याचा कामगारांच्या जीवनावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे कोणी विचारांनी आजारी पडत आहे, तर कोणाला हृदयविकाराचा झटका येत आहे. अशा वेळी त्या कामगाराला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याऐवजी, उपचाराचे पैसे कोण देणार याचा प्रशासनाकडून जाब विचारला जातो म्हणून सहकर्मचारी किंवा अधिकारी त्या आजारी कामगाराला महापालिकेच्या किंवा शासनाच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सोईस्कर मार्ग निवडतात. अशा वेळी उपचाराआधीच तो कर्मचारी दगावतो, असे भूषण पाटील म्हणाले.


एकाच दिवसात दोघांना हृदयविकाराचा झटका
भाजपचे कवठणकर यांनी सांगितले की, १४ जानोवारी २०२० रोजी दिंडोशी आगाराचे बाबारामू आलदर आणि कुर्ला आगाराचे अशोक देवकर यांना हृदयविकाराचा झटका आला. सुदैवाने देवकर यांच्यावर तातडीने उपचार झाले म्हणून ते बचावले.



अधिकारीही तणावाचे शिकार
बेस्टमध्ये कामगारांची भरतीच होत नसल्याने कामगारांप्रमाणे अधिकारीही तणावाखाली काम करत आहेत. त्याचा त्यांचा आयुष्यावर परिणाम होत आहे. सतीश आव्हाडे, बाबू परब, काद्री असे चार ते पाच अधिकारी कामाच्या तणावाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे काही अधिकारी काम सोडून जाण्याच्या तयारीत आहेत.



कंडक्टरची दमछाक
बेस्ट बसचे तिकीट दर कमीतकमी पाच रुपये केल्याने पॅसेंजर वाढले, पण त्या मानाने बसेस वाढलेल्या नाहीत. त्यामुळे एका बसची ५२ प्रवाशांची मर्यादा असताना भरगच्च ९० प्रवासी प्रवास करत आहेत. दोन्ही बाजूंनी प्रवासी प्रवेश करत असताना तिकीट देताना कंडक्टरची दमछाक होत आहे. शिवाय खांद्यावर (बॅगेत) नाण्यांचे ओझे वाहताना हैराण होत आहेत. यावर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे कवठणकर यांनी सांगितले.



डॉक्टर बिनकामाचे
प्रत्येक आगारात डॉक्टर असतात. पण ते कामगाराला हातही न लावता औषध देतात किंवा औषधे लिहून देतात. त्यांच्याकडे स्टेथोस्कोपही नसतो. बेस्टचे डॉक्टर म्हणजे फक्त आजारपणाची रजा मंजूर करण्यापुरतेच असतात, अशी टीका कवठणकर यांनी केली.



ज्येष्ठांना त्रासदायक धोरण
जेष्ठ वाहक-चालकांचा सन्मान म्हणून त्यांना कमी अंतराच्या आणि सलग ड्यूट्या देण्यात येत असत. परंतु आता कनिष्ठ वाहक-चालकांबरोबर जेष्ठ कर्मचाऱ्यांचीही पिळवणूक करण्यात येत आहे. त्यांना सलग ड्यूटी न देता १२-१२ तासांच्या ड्यूट्या देण्यात येत आहेत. त्रासदायक असलेले ड्यूटी शेड्यूल बदलण्याची मागणीही कवठणकर यांनी लावून धरली.



चालकांना मूळव्याध
सध्या बेस्ट उपक्रमात गॅसवर चालणाऱ्या गाड्या आणल्या आहेत. त्या गाड्यांमध्ये ड्रायव्हरची सीट फारच गरम होते. त्यामुळे बेस्टमध्ये कार्यरत असलेल्या ८० टक्के चालकांना मूळव्याधीचा त्रास होत आहे. वाहक-चालक आणि कर्मचाऱ्यांची ठराविक कालावधीने तपासणी करून त्यांना उपचार द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे सुहास सामंत यांनी केली.
यावेळी राम सावंत, सुषम सावंत, आशीष चेंबूरकर यांनीही चर्चेत सहभाग घेतला



भीतीपोटी सर्क्युलरकडे दुर्लक्ष
कामगारांचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी बेस्ट प्रशासन कटिबद्ध आहे. प्रत्येक आगाराला भेट देऊन कामगारांनी स्वास्थ्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येते. कामगारांची आकस्मिक तब्येत बिघडल्यास त्यांना जवळच्या कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यात यावे, असे परिपत्रक २०१४ मध्येच सर्व आगारांना वितरीत करण्यात आले आहे. मात्र आलदर यांना जवळच्या रुग्णलयात दाखल का करण्यात आले नाही याची चौकशी करण्यात येईल.
-- सुरेंद्रकुमार बागडे, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम



कामगाराच्या मृत्यूमुळे ५० वर्षात प्रथमच सभा तहकूब
सभा तहकुबीचे अनेक प्रसंग येतात. मात्र कामगाराच्या आकस्मिक मृत्यूप्रकरणी बेस्ट समितीची सभा तहकूब होण्याची पन्नास वर्षातील ही पहिलीच वेळ होती. या सभा तहकुबीमुळे बेस्ट प्रशासनाला आपल्या कार्यपद्धतीत बदल करण्याची वेळ आली असल्याचे मत सर्व सदस्यांनी नोंदवले.

@@AUTHORINFO_V1@@