एक बंगला वाटे प्यारा !

    दिनांक  16-Jan-2020 21:09:18

MCGm _1  H x W:


प्रवीण दराडेंच्या बदलीमागे महापालिका बंगल्याचे राज‘कारण’


मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात येताच सनदी अधिकार्‍यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. नियमानुसार होणार्‍या बदल्या वगळता काही बदल्या खास कारणास्तव केल्या असल्याचे बोलले जात आहेगुरुवारी काही अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जाणारे मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांचाही समावेश आहे. मात्र, दराडेंच्या बदलीमागे महापालिका बंगल्याच्या वादाचे कारण असल्याचे बोलले जात आहे. दराडे यांनी तो बंगला रिकामा करण्यास नकार दिला होता. परंतु, आता त्यांची बदली झाल्याने बंगला प्रशानाच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मलबार हिल येथे महापालिकेचे दोन बंगले आहेत. त्यापैकी एका बंगल्यात तत्कालीन महापालिका अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील सचिव प्रविण दराडे हे दाम्पत्य वास्तव्य करत होते. दरम्यान, दादर येथील शिवाजी पार्कवरील महापौर बंगल्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महापौरांना पर्यायी जागेसाठी मलबार हिल येथील पालिका जलविभागाचा ‘तो’बंगला उपलब्ध करून द्यावा, अशी शिवसेनेची मागणी होती.

पल्लवी दराडे यांची महापालिकेतून इतरत्र बदली झाल्यानंतर बंगला रिकामा करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या. त्यासाठी पत्रव्यवहार, नोटीस देखील बजावण्यात आल्या. मात्र, सामान्य प्रशासन विभागाच्या शिफारसीशिवाय बंगला रिकाम करू नये, असे पत्र तत्कालीन महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जलअभियंता विभागाला पाठवले. प्रवीण दराडे हे पालिकेच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर आलेले अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांना देण्यात आलेला तो बंगला ते सेवेत असेपर्यंत त्यांच्याकडून काढून घेऊ नये, तसेच बंगल्याच्या भाड्यासाठी दुप्पट रक्कम आकारू नये, असे निर्देश या पत्राद्वारे दिले होते. याप्रकरणी ३१ डिसेंबर २०१४ मध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या पूर्वपरवानगीशिवाय जल अभियंत्यांचा बंगला रिकामा करण्याबाबत नोटीस पाठवू नये, असे निर्देश पालिकेला दिले होते. २०१४ मध्ये पाठवलेल्या त्या पत्रावरुन महासभेत जोरदार पडसाद उमटले होते.

मलबार हिलच्या बंगल्यातील दराडे यांचे वास्तव्य कायम राहावे यासाठी माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी २० फेब्रुवारी २०१९ रोजी प्रवीण दराडे यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तीपदी नियुक्ती केली. कोस्टल रोड, पाणी प्रकल्पासहित काही महत्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जात आहेत. त्यात प्रवीण दराडे यांचीही बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतून पुणे येथील समाज कल्याण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदी त्यांची बदली करण्यात आली आहे. तर पल्लवी दराडे या अन्न व औषध प्रशासनात नियुक्तीवर आहेत. त्यामुळे महापालिकेच्या जलविभागाचा बंगला रिकामा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

प्रवीण दराडे पालिकेत आल्याला एक वर्षही पूर्ण झालेले नाही. शिवाय त्यांच्याकडे कोस्टल रोड आणि गारगाई-पिंजाळ यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी होती. मात्र प्रकल्प रखडले तरी चालतील, पण मोक्याचा बंगला महापालिकेच्या ताब्यात आला पाहिजे, म्हणून एकेकाळी शिवसेनेला आव्हान दिलेल्या दराडे यांची अवघ्या वर्षभरातच बदली केल्याची चर्चा पालिका गोटात सुरू आहे.