डोंबिवलीत बनतोय प्लास्टीकचा रस्ता

16 Jan 2020 20:41:19

Plastic Road _1 &nbs


डोंबिवली : कडोंमपा क्षेत्रात खड्ड्यांच्या समस्येबाबत होणार्‍या तक्रारीवर उपाय म्हणून केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कडोंमपाने समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्लास्टिकयुक्त डांबरी रस्त्याचा मार्ग अवलंबला आहे. दरम्यान, महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर एमआयडीसीमधील डीएनसी बँक ते आईस फॅक्टरी रस्त्याचा शुभारंभ केला.

सदर रस्त्यासाठी रिसायकलिंग केलेल्या वेस्ट प्लास्टिकचा वापर करण्यात आला. या रस्त्यासाठी वापरण्यात आलेले प्लास्टिक रुद्र एनव्हायर्नमेंट सोल्युशन या संस्थेमार्फत पुरविण्यात आले होते. प्लास्टिकचा वापर करून बनविण्यात आलेले रस्ते अधिक टिकाऊ राहतील आणि प्रायोगिक तत्त्वावर प्लास्टिक वापरून डांबरमिश्रीत रस्ता तयार करण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाल्यास भविष्यातही यापुढे रस्ते बनविण्यासाठी वेस्ट प्लास्टिकचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे प्लास्टिकची विल्हेवाट लावणे सोपे होईल.

यात रस्त्याचे डांबरीकरण करताना डांबरात विशिष्ट प्रमाणानुसार टाकाऊ प्लास्टिक मिसळले जाते. त्यानंतर प्लास्टिक डांबरीकरणासाठी वापरले जाते. डांबर व प्लास्टिक व खडी-डांबर एकत्र केल्यास रस्ता टिकण्याची क्षमता वाढते. याआधी ठाणे, वसई, अहमदनगर, बंगळुरू अशा अनेक ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर सुमारे १५० मीटर लांबीच्या रस्त्यावर हा प्रयोग केला. तसेच हा प्रयोग यशस्वी झाल्यास येत्या वर्षात महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर तो लागू केला जाणर आहे. तसेच या माध्यमातून खड्डे दुरुस्तीवर होणार्‍या खर्चाचा ताण कमी होणार आहे.

"दरम्यान, प्लास्टिक वापरून केलेल्या रस्त्यामुळे रस्त्याचे आयुर्मान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येते. त्यामुळे भविष्यात महापालिकेमार्फत प्रमुख रस्त्यांवरदेखील ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या कामासाठी लागणारे प्लास्टिक महापालिकेच्या बारावे प्रकल्प तसेच कल्याण-डोंबिवलीतील विविध संस्थांमार्फत गोळा करण्यात येणार्‍या प्लास्टिकमधून होऊ शकतो,” अशी माहिती महापालिका शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनी दिली.

Powered By Sangraha 9.0