यशाचा 'विष्णू'मंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2020
Total Views |
Dhuri _1  H x W


सहज-सोप्या शिक्षण पद्धतीतून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावणारे, स्पर्धा परीक्षेत मराठी मुलांना यश मिळावे यासाठी दिवसरात्र झटणारे विष्णू धुरी यांच्याविषयी...


माणसाला अपयश बरेच काही शिकवून जाते
, असं म्हणतात. अपयश पत्करुन काही जण कोमेजतात, तर काही खुलतात. मुंबईच्या मुलुंडमधील विष्णू धुरी यांच्याबाबतही असेच काहीसे घडले. ते अपयशाने खचून गेले नाहीत, तर अपयशातूनच प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्या भावी यशाचा मार्ग चोखाळला. विष्णू टीवायबीकॉमच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यावर त्यांना खूप धक्का बसला. आपल्या हातून जणू एखादा खूप मोठा गुन्हाच घडला आहे, ही जाणीव त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे डोक्यावर 'नापास' म्हणून शिक्का मिरविणे काय असते, याची विष्णू यांना पुरेपूर कल्पना होती.


अर्थात
, ते ऑक्टोबरच्या परीक्षेत उत्तीर्णही झाले. कालांतराने एका सरकारी उच्च पदस्थ नोकरीदेखील मिळाली. मात्र, कुठे तरी तो 'नापास'चा नकारात्मक शिक्का त्यांच्या मनातून काही केल्या पुसट होत नव्हता. म्हणून मग आपण अनुत्तीर्ण झाल्यानंतर जे अनुभव त्यांना, त्यांच्या पालकांना आले, त्यातून धडा घेत, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी काही तरी करायचे त्यांनी ठरवले. कारण, बरेचदा परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांकडून, मित्रांकडून, शेजारी, नातेवाईकांकडून अक्षरशः वाळीत टाकल्यासारखी वागणूक कळत-नकळत दिली जाते. याचा मुलांच्या मनावर इतका खोलवर परिणाम होतो की, ते आपला आत्मविश्वास गमावून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात.


परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होणे
, हा काही गुन्हा नाही. अपयशातूनही मेहनतीने मार्ग काढला जाऊ शकतो, यासाठी त्यांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना सर्वांगीण मार्गदर्शनाला सुरुवात केली. ठाणे शहरातील महाविद्यालये आणि शाळांमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वर्गात अनुभवी शिक्षकांकरवी शिकविण्यास आणि मार्गदर्शनाचा प्रारंभ केला. त्यानंतर अनेक विद्यार्थी पुढील परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. यामुळे, अर्थातच सगळ्या मुलांचा, पालकांचा आणि विष्णू सरांचाही आत्मविश्वास चांगलाच दुणावला.


'जर मुले अनुत्तीर्णच झाली झाली नाही तर?' या विचाराने झपाटून विष्णू सर कामाला लागले. सर्वप्रथम त्यांनी एक नवीन फॉर्म्युला तयार केला. 'अभ्यास फक्त दोन तास, ८० टक्के हमखास!' असा तो फॉर्म्युला. हल्ली शाळा-महाविद्यालयातील शिक्षण पद्धतीत मुलांकडून फक्त घोकंपट्टी करून घेतली जाते. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर दररोज दोन तास वाचन-लेखन करायचे, ज्यामुळे अभ्यासाचा पाया मजबूत होईलच, शिवाय परीक्षेसाठी अगोदरच तयारी होईल.


यासाठी विष्णू सरांनी मुलांना अनेक सोप्या पद्धती समजावून सांगितल्या
. मात्र, काही पालकांना हे अजूनही पटले नव्हते. फक्त दोन तास अभ्यास करून कसे मिळणार चांगले गुण? असा स्वाभाविक प्रश्न पालकांना पडायचा. मात्र, विष्णू सरांनी पालकांच्या मनातल्या शंकांचेही रीतसर निरसन केले. आणि काय आश्चर्य, हा फॉर्म्युुला कामीसुद्धा आला! फक्त दोन तास अगदी मन लावून अभ्यास करून विद्यार्थ्यांना चांगले गुण तर मिळालेच, शिवाय त्यांना अभ्यासाची गोडी लागली. विद्यार्थ्यांच्या यशाने पालकांनाही या 'विष्णू पॅटर्न'चे महत्त्व पटले.


विष्णू धुरी यांचे बालपण मुंबईतील वडाळ्यात गेले
. त्यांचे वडील गोदीमध्ये कामाला होते. घरची परिस्थिती सामान्य असूनही त्यांच्या घरी अभ्यासू वातावरण असे. त्यांची आई सर्व कामे आटोपून मुलांना वर्तमानपत्र वाचायला लावायची. त्यामुळे घरात सगळ्यांना आपसुकच वाचनाची गोडी लागली. शिवाय बाहेरच्या जगात काय सुरू आहे, याविषयीही माहिती मिळत असे. याच लहानपणीच्या सवयीचा विष्णू यांना पुढे खूप फायदा झाला.


काही वर्षांपूर्वी विष्णू यांना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दूरदर्शनकडून बोलावणे आले
. या मार्गदर्शन कार्यक्रमानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक पालकांनी त्यांच्याशी संपर्क केला. यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी मार्गदर्शन वर्ग घेतले. यात त्यांनी 'यशोमंत्र अभ्यासाचा' या फॉर्म्युल्याअंतर्गत अभ्यासाची भीती, हस्ताक्षरासाठी मेहनत, करिअरची निवड आदी महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले. विष्णू स्वतः सरकारी नोकरीत कार्यरत असल्याने मराठी मुलांनीही सरकारी नोकरीत यावे, यावर त्यांचा भर आहे.


महाराष्ट्रात अनेक सरकारी पदांवर अगदी कमी वयातील तरुण
-तरुणी काम करतात, मात्र त्यात महाराष्ट्रातील युवांची संख्या फारच कमी असते. त्यामुळे आपल्या मराठी मुलांना सरकारी नोकरी कशी मिळेल, त्यासाठीही मार्गदर्शन वर्ग त्यांनी सुरू केले. आज त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक मुले-मुली सरकारी नोकरीत उच्च पदावर कार्यरत आहेत आणि अनेकजण स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. आजपर्यंत विष्णू धुरींनी हजारो मार्गदर्शन शिबिरे, वर्ग घेतले आणि तेही अगदी विनामूल्य. विष्णू धुरी यांच्या या शैक्षणिक कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची स्वप्ने पूर्ण झाली आहेत. त्यांना पुढील प्रवासासाठी दै. 'मुंबई तरुण भारत' परिवाराकडून अनेकानेक शुभेच्छा!


- कविता भोसले 
@@AUTHORINFO_V1@@