मोहून टाकणारा 'वाईल्ड कर्नाटका!'

    दिनांक  16-Jan-2020 18:43:56   
|

tiger_1  H x W:मुंबई (अक्षय मांडवकर) - भारतीय वन्यजीवांच्या अचंबित करणाऱ्या सूक्ष्म हालचालींचे अचूक चित्रण, इंडो-वेस्टर्न संगीताचा मिलाप, आंतरराष्ट्रीय दर्जाची दृश्यमानता आणि जागतिक कीर्तीचे वन्यजीव संवर्धक सर डेविड अ‍ॅटनबरो यांचे कथन म्हणजेच 'वाईल्ड कर्नाटका'. नावाप्रमाणेच कर्नाटक राज्यातील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवून थिएटर मध्ये प्रदर्शित होणारा भारतातील पहिला वन्यजीव माहितीपट. 'वाईल्ड कर्नाटका'मधील प्रत्येक दृश्य प्रेक्षकांना मोहित करून टाकते आणि अॅटनबरो यांचे कथन क्षणाक्षणाने उत्कंठा वाढवते. माहितीपट पू्र्ण पाहून झाल्यावर चित्रीकरणामध्ये सामील असणाऱ्या टीमची मेहनत आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. वन्यजीवप्रेमी नसणाऱ्या प्रेक्षकालादेखील भुरळ पाडण्याची ताकद या माहितीपटात आहे.   

 


 

 

वन्यजीवांच्या चित्रिकरणासाठी प्रचंड संयम आणि चिकाटीची आवश्यकता असते. 'वाईल्ड कर्नाटका' पाहताना या संयमाचे परिणाम आपल्याला पडद्यावर दिसून येतात. कर्नाटक वनविभागाअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या या माहितीपटाची निर्मिती 'आयकाॅन फिल्म्स्' आणि 'मडस्किपर'ने केली आहे. सर्वप्रथम निर्मात्यांचे अभिनंदन करावे लागेल. कारण, वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणासंदर्भात देशातील मोठा वर्ग संवेदनशील नसताना अशा स्वरुपाच्या माहितीच्या निर्मितीमध्ये पैसे गुंतवण्याचे साहस त्यांनी दाखवले. त्यापलीकडे जाऊन माहितीपटाला व्यावसायिक चित्रपटांप्रमाणे प्रदर्शित करण्याचे धाडस केले. निर्मात्यांच्या या प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल. गेल्या चार वर्षांपासून माहितीपटात दाखवलेल्या कर्नाटकातील वन्यजीवांच्या सूक्ष्म हालचाली कॅमेऱ्यात कैद करण्याचे काम सुरू होते. वन्य आणि सागरी जीवांच्या विविध अधिवासक्षेत्रात अमोघवर्षा, कल्याण वर्मा, सारथ चम्पाती आणि विजय मोहन राज यांच्या मार्गदर्शनाखाली १५ जणांची टीम छायाचित्रणाचे काम करीत होती. चार वर्षात टीमच्या हाती ४०० तासांचे चित्रीकरण लागले.

 
  

माहितीपटामध्ये प्रामु्ख्याने वन्यजीवांचा अधिवास, प्रजनन, नवजात पिल्लांचे पालनपोषण आणि त्यांच्या जडणघडणीची प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यामधील वन्यजीवांच्या बदलणाऱ्या अधिवासाचे चित्रण टिपण्यात टीमला यश मिळाले आहे. कर्नाटकचे जंगल हे खासकरून वाघ, हत्ती आणि किंग क्रोबा सापासाठी ओळखले जाते. माहितीपटाची सुरुवातच व्याघ्र दर्शनाने होते. वाघिण तिच्या पिल्लांची जडणघडण कशी करते, याचे संवेदनशील चित्रण आपल्याला पाहावयास मिळते. मादी अस्वल व रानमांजराची आपल्या पिल्लांना जगवण्याची धडपड आणि त्यावेळी पिल्लांवर येणाऱ्या संकटांच्या घटनांमुळे माहितीपटाची रंजकता अधिक वाढते. किंग क्रोबा सापाची वीण, त्याचे घरटे आणि पिल्लांचा अंड्यामधून बाहेर पडण्याचा प्रवास आश्चर्यकारक ठरतो. चाणाक्ष बिबट्याचा शिकारीचा फसलेला प्रयत्न आपल्याला एखाद्या अॅक्शनपटाची आठवण करून देतो. कर्नाटकला लाभलेल्या सागरी संपत्तींच्या दर्शनानेही आपण भारावून जातो. 

 
 
 
 
 

'वाईल्ड कर्नाटका'चा मूळ गाभा हा सकारात्मकतेचा आहे. वन्यजीवांना दैनंदिन जीवनात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. अशा आव्हानात्मक प्रसंगांमधील सकारात्मकतेची नस पकडूनच माहितीपट पुढे सरकत राहतो. याचे कारण म्हणजे निर्मात्यांनी कटाक्षाने टाळलेले शिकारीचे प्रसंग. सांबराच्या पिल्लाची रानकुत्र्यांच्या टोळींमधून झालेली सुटका असो, वा सर्पदंशापासून वाचलेले रानमांजराचे पिल्लू, या घटनांमुळे संपूर्ण माहितीपटात एक रोचकता निर्माण होते. मात्र, त्याचवेळी प्रेक्षकांच्या मनात वन्यजीवांप्रतीची सकारात्मकता निर्माण होण्यासही मदत होते. प्रत्येक वन्यजीवांची स्वभावैशिष्ट्ये लक्षात ठेवून रचलेले इंडो-वेस्टर्न पद्धतीचे संगीत प्रसंगांमध्ये जीव फुंकते. ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार रिकी केज यांनी या माहितीपटाला संगीत दिले आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील आलाप, सरगम यांना पश्चिमी संगीताची जोड देऊन माहितीपटाचे पार्श्वसंगीत तयार करण्यात आले आहे. एकणूच कर्नाटकातील समृद्ध जैवविविधतेचे विलक्षण चित्रण साकारण्यात या माहितीपटाला यश मिळाले आहे. 4K दृश्यमानता असणाऱा हा माहितीपट येत्या १७ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.