सूर्यासम चमकू या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |
paf_1  H x W: 0



यथा सूर्यो मुच्यते तमसस्परि,

रात्रिं जहात्युषसश्च केतून्।

एवाहं सर्वं दुर्भूतं कृत्रं कृत्याकृता,

कृतं हस्तीव रजो दुरितं जहामि॥

(अथर्ववेद-१०.१.३२)

अन्वयार्थ

(यथा) ज्याप्रमाणे (सूर्य:) सूर्य (तमस:) अंधारापासून (परिमुच्यते) मुक्त होतो, दूर जातो. तसेच तो (रात्रिम्) रात्रीला (च) आणि (उषस: केतून्) उष:कालीन अवरोधक अंधकारचिन्हांना, किरणांना (जहाति) सोडून देतो, दूर सारतो व उदित होऊन चमकून दिसतो (एवा) त्याचप्रमाणे (अहम्) मी (सर्वं दुर्भूतम्) सर्व दुर्गुणांना (कृत्याकृता) हिंसा करणार्‍यांद्वारे (कृतं) केल्या गेलेल्या (कृत्रम्) हिंसेला (जहामि) सोडून देतो. तसेच (हस्ती इव रज:) ज्याप्रमाणे हत्ती धुळीला फेकून उधळून लावतो, त्याचप्रमाणे मी पण (दुरितम्) दुुर्गुण, दुराचार, पापकृत्यांना सोडून देतो, त्यागतो.

 

विवेचन

जीवन म्हणजे आशा व निराशेचा खेळ’ असे आपण अनेकदा ऐकतो. जीवनात कधी सुखाचे तर कधी दु:खाचे प्रसंग येतात. अशा दोन्ही प्रसंगी समदृष्टी ठेवणारे लोक फारच तुरळक सापडतात. बहुतांश लोक हे विपरीत व प्रतिकूल परिस्थिती उद्भवली की लगेच निराश होतात. त्यांना जगणे नकोसे वाटते. त्यांना सर्वत्र अंधार दिसू लागतो. प्रसंगी मनात आमहत्येचाही विचार डोकावतो. अशा वेळी त्यांना गरज असते ती त्यांचे मनोबल वाढविणार्‍या व प्रखर धैर्य प्रदान करणार्‍या उच्चतम अशा विश्वसनीय सकारात्मक विचारांची! वेदांनी आपल्या सशक्त व समृद्ध मंत्ररूप दिव्य संदेशाने अशा नैराश्याने पछाडलेल्या जनसमूहाला संजीवनी देण्याचे कार्य केले आहे. पतनोन्मुख माणसाला उत्साही बनवत उभारी दिली आहे. आत्मघाताकडे प्रवृत्त होणार्‍यांना जगण्याचे नवे बळ प्रदान केले. वरील मंत्र असाच उत्साहवर्धक आणि आत्मकल्याण साधणारा आहे. सांसारिक क्लेशसागरात गलितगात्र झालेल्या माणसाला नवचैतन्याचा लाभ या मंत्राशयामुळे होतो.

 

हताश व निराश झालेला वैफल्यग्रस्त माणूस एकलकोंडा बनतो. तो आपल्याच दु:खपूर्ण विचारविश्वात वावरतो. इतरांकडे किंवा परिसरातील उत्साहवर्धक तत्त्वांकडे तो पाहायला तयार होत नाही. स्वत:च्या समस्यांनी तो इतका वेढलेला असतो की, आत्मदु:खापुढे दुसरे काहीच सुचत नाही. अशावेळी निसर्गातील काही स्थूल व सूक्ष्म तत्त्वे मानवाकरिता प्रेरणेचे दीपस्तंभ बनतात. फक्त त्यांकडे बघण्याची दिव्यदृष्टी हवी! सदरील मंत्रात दोन उदाहरणे आली आहेत. एक आहे सूर्याचे आणि दुसरे आहे हत्तीचे! उपमान व उपमेय शैलीतून सामान्य लोकांनाही कळेल व उमजेल अशा अलंकारिक भाषेतून जगण्याचे तत्त्वज्ञान वेदांच्या ऋषींनी इथे मांडले आहे.

 

‘सूर्य’ हा नभोमंडळातील तेजस्वी विशाल तारा! स्वयंप्रकाशित हा दिनकर इतर ग्रह, नक्षत्र, तार्‍यांना प्रकाश, ऊर्जा व प्रेरकशक्ती प्रदान करतो. स्वत:च्या उत्पादक शक्तीमुळे तो आपल्या सान्निध्यातील विश्वसमूहाला निर्मिण्याचे व संवर्धनाचे बळ प्रदान करतो. हा सूर्यदेव सतत कार्यदक्ष आहे. निरंतर गतिमान होत इतरांना ही गती प्रदान करतो. थांबणे त्याला रूचत नाही. आकाशात उच्चस्थानी विराजमान होऊन सतत चमकत राहतो. तेजस्विता हा त्याचा स्थायी स्वभाव! आम्हा पृथ्वीवासीयांना वाटते की तो उगवतो आणि मावळतो. पण हा तर आमचा दृष्टिभ्रम आहे. फिरणार्‍या या वसुंधरेचा अर्धा भाग सूर्यासमोर आला की दिवस आणि राहिलेला दुसरा अर्धा भाग आपोआपच रात्र ठरतो. म्हणजेच अंधारात झाकला जातो. यात सूर्याचा कांहीच दोष नाही... पण याच कल्पकतेला अलंकारिक रूप देत सूर्याचे ‘उदयास्त’ होणे असे आम्ही मानतो. वेदमंत्रात हाच लौकिक धागा पकडत म्हटले आहे-

 

यथा सूर्यो तमस: परि मुच्यते...”

ज्याप्रमाणे सूर्य अंधाराला दूर सारत, तसेच रात्रीने निर्माण केलेल्या उष:कालीन अवरोधकअंधारचिन्हांना मागे करीत पुढे येतो, तद्वतच माणसाने देखील आपल्या वाईट दोषांना किंवा दुर्गुणांना दूर सारावे... जे अनिष्ट विचार आहेत, त्यांना मागे सारत पुढे यावे... जसा की सूर्य! अतिशय समर्पक व प्रेरक उपमा अलंकार आला आहे इथे! थोडक्यात म्हणजे माणसाला सूर्यसम जगण्याचे व वागण्याचे संकेत यातून मिळतात. अंधार कितीही दाटला... तरी तो कायमस्वरूपी नसतो... कधी ना कधी तरी तो भेदला जाणारच! हे अंधाराचे साम्राज्य नाहीसे करण्याकरिता कोणी साधासुधा नव्हे तर प्रचंड बलशाली तेजोनिधी हवा! सूर्याशिवाय कोण हे तमांचे आवरण दूर करणार! कारण ‘सूर्या’मध्येच ते सामर्थ्य आहे... म्हणूनच मानवाने देखील सूर्यनारायणाचा आदर्श समोर ठेवावा. कितीही संकटे व दु:खे आली तरी न घाबरता त्यांचा निकराने प्रतिकार करावा. आपल्यात दाटलेल्या आळस, अज्ञान, अविद्या यांबरोबरच विविध दुर्गुणांच्या व वाईट सवयींच्या अंधाररूपी अनिष्ट वृत्तींना (तमोवृत्तींना) मागे सारत प्रकाशित व्हावे व इतरांना प्रकाश देत राहावे.

 

दुसरे उदाहरण आले आहे ते हत्तीचे! हत्ती हा मदमस्त प्राणी! तो तितकाच स्वाभिमानी व बलवान! शुद्ध शाकाहारी... पण सर्वाधिक बलिष्ट! हत्ती चालताना कसा धैर्याने, अभिमानाने व स्वच्छंदपणे चालतो. तो कोणासही घाबरत नाही की कुणाची निंदावचने ऐकत नाही. तो मोठ्या उत्साहाने व अगाध सामर्थ्याने आपल्यासमोर असलेल्या धुळीचे ढीग उधळून लावतो. माणसानेदेखील ज्ञान-विद्येने व विवेकाने परिपूर्ण होत स्वत:मधील अविचारांना व दोषांना उधळून लावावे आणि आपल्या परिसरात वाढलेले अज्ञानाचे स्तोम नाहीसे करण्याकरिता प्रयत्न करावेत.

 

मानव हा अल्पज्ञ प्राणी होय. जीवनात त्याच्याकडून काही चुका घडू शकतात. कळत-नकळत पापकृत्ये होऊ शकतात. इंद्रिये व मनाच्या अधीन होऊन तो दुष्कृत्ये करण्यास प्रवृत्त होतो, पण त्याने ज्ञानपूर्वक शुभ कर्मे करीत आपला पुण्यसंचय वाढवावा. सूर्याला कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तर तो काय आपली प्रकाश किरणे थांबविणार? तसेच हत्तीला कितीही रोखण्याचा प्रयत्न करा, तो थांबणार काय? कदापि नाही. तसेच मानवानेदेखील प्रबळ पुरुषार्थ करावा. आपापल्या क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठताना असंख्य अडचणी आल्या तरी त्यावर मात करून पुढे जावे. ‘चरैवेति... चरैवेति।’ प्रमाणे सतत चालत अन् चालतच राहावे!

 

भगवतांने मानवाला इतके मोठे आत्मबळ दिले आहे की, तो शून्यातून विश्व निर्माण करू शकतो. सूर्यासम तेजस्विता व गतिशीलता आणि हत्तीसारखी शक्ती व स्वाभिमान या गोष्टी असतील तर या जगात माणसाला अशक्य असे काहीच नाही. पण एकच अट आहे की त्याने स्वत:मधील अज्ञान, अविद्या, अविचार, आळस, प्रमाद किंवा काम क्रोधादी दोषांचे मेघमंडळ उध्वस्त करावे आणि धुळीच्या ढिगांना नाहीसे करावे, मग पाहा, जीवनरूपी अंगणात सद्विचारांचे व सद्व्यवहारांचे टिपूर चांदणे कसे शोभून दिसते...! वेदांची ही दिव्य व प्रेरक वाणी खरोखरच आजच्या आधुनिक युगात तितकीच अत्युपयुक्त आहे.



- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

 
 
@@AUTHORINFO_V1@@