युधिष्ठिरास दु:ख व संभ्रम!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |

Mahabharat_1  H



खरे धार्मिक विधी पुरे होईपर्यंत बराच कालावधी निघून गेला. पांडव एक महिनाभर गंगातीरी तात्पुरती घरं बांधून राहिले. युधिष्ठिर तर खूपच शोकमग्न अवस्थेत होता. नारदमुनींनी त्याला आठवण करून दिली की, "युधिष्ठिर, तू आता या जगाचा सार्वभौम राजा झाला आहेस! तुझे अभिनंदन करण्याची आम्हाला संधी दे." परंतु, युधिष्ठिर पुन्हा पुन्हा दु:खात बुडत होता.

 

तो म्हणाला, "मुनिवर्य, आमच्या मातेने जर राधेय आमचा मोठा व सख्खा भाऊ आहे, हे युद्ध होण्यापूर्वी सांगितलं असतं, तर हे युद्धच झालं नसतं! तिने राधेयला सांगितलं खरं की, तू तुझ्या भावांकडे ये, पण त्याने आपल्या मित्राला, दुर्योधनालादिलेले वचन पाळले! तो थोर होता. आपल्या कर्तव्यापासून ढळला नाही. त्याने मातेलाही शब्द दिला की, अर्जुन सोडून तो कोणत्याही बंधूवर वार करणार नाही आणि आम्ही त्याचा शत्रू म्हणून किती तिरस्कार केला, अपमान केला, वधही केला, केवढी दुष्ट आहे ही नियती?

 

हस्तिनापूरच्या दरबारातला द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग अजून मला आठवतो. त्या दिवशी मी खिन्न होऊन खाली मान घातली, तेव्हा मला राधेयचे चरण दिसले, ते हुबेहूब माता कुंतीसारखे होते. आज मला ते कोडे उलगडले. खरंतर राधेय आम्हा सर्वांचा वध करू शकत होता, पण मातेला दिलेल्या शब्दाला तो जागला! या अर्जुनाने राधेय युद्धाला तयार नसताना, त्याच्या रथाचे चाक भूमीत रुतले असताना त्याचा वध केला! किती अमानुषता? केवढा अधर्म? मला तर वाटते मी या पृथ्वीचा अधिपती होण्याच्या लायकीचाच नाही!" यावर नारदमुनींनी युधिष्ठिराला राधेयचा सारा जीवनपट समजावून सांगितला, त्याचे सांत्वन केले.

 

सर्व पांडव ते ऐकत होते. त्याच्या जीवनाची शोकांतिका ऐकून ते खूप विनम्र झाले. युधिष्ठिराला तर सगळ्या स्त्री जातीची घृणा व तिरस्कार वाटू लागला, त्याला चीड आली. म्हणून त्याने अखिल स्त्री जातीला शाप दिला की, कोणतीही स्त्री यापुढे कुठलीच गोष्ट गुप्त ठेवू शकणार नाही! त्याला राज्यात रस वाटे ना. इतका नरसंहार आपण उगीच केला असे त्याला वाटू लागले. या सर्वाचा त्याग करून पुन्हा वनवास स्वीकारावा, असे त्याला वाटत होते. द्रौपदी, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, नारद मुनी सर्वांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. व्यास मुनींनीही समजावून पाहिले. हळूहळू तो भानावर आला. त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली.

 

तो व्यासांना म्हणाला, "ऋषीवर राज्य कसे करावे, कसे चालवावे हे मला शिकवा, मी नि:पक्षपाती व न्यायी राजा कसा होईन हे मला सांगा." व्यासांना आनंद झाला. ते म्हणाले, "या बाबतीत तुला चांगले मार्गदर्शन फक्त एकच व्यक्ती करू शकते, ती म्हणजे पितामह भीष्म! तू त्यांना विनंती कर. ते तुला नीट समजावून सांगतील. आता ते अजून उत्तरायणाची वाट पाहत शरपंजरी पडून आहेत. अजून वेळ आहे तेव्हा तू त्यांचे पाय धर व त्यांचा शिष्य हो." तरी पण युधिष्ठिराला लाज वाटू लागली.

 

तो म्हणाला," माझ्या सर्व बंधूच्याच विनाशाला मी कारणीभूत झालो. मी महापापी आहे. त्या आदर्श व महान भीष्मांसमोर मी कसा उभा राहू!" श्रीकृष्णाने त्याला समजावले, "राजा, जे घडून गेले आहे त्याचा आता शोक करू नकोस! त्यासाठी तू एकटाच जबाबदार नव्हता! चूक तुझी मुळीच नव्हती, तर ती सर्वांच्या प्राक्तनाची होती. त्यासाठी तू स्वत:ला मुळीच दोषी ठरवू नकोस. आता यात मनाने गुंतून पडू नकोस. यापुढे अनेक वर्षे तुला हे राज्य सांभाळायचे आहे तेव्हा या राज्याच्या हितासाठी तरी तू व्यासऋषींच्या सल्ला मानून पितामह भीष्मांकडे जा आणि सर्व शिकून घे." शेवटी कर्तव्यभावना श्रेष्ठ असते हे युधिष्ठिराला पटले व त्याने पितामह भीष्मांची भेट घ्यायचे ठरवले.


(क्रमश:)

- सुरेश कुळकर्णी

[email protected]

9821964014

@@AUTHORINFO_V1@@