महाराष्ट्रधर्म

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2020
Total Views |
Shivaji _1  H x
 
 

तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त झाली, धर्म नाश पावत आहे आणि हे सांभाळणारा कोणी दिसत नाही, ही खंत रामदासांच्या मनात होती. हे राष्ट्रीय कार्य शिवाजी महाराजांनी करावे, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून हा ‘महाराष्ट्रधर्म’ तुमची वाट पाहतोय असे रामदास म्हणाले.


रामदासांना तीर्थाटनात हिंदुस्थानभर उद्ध्वस्त समाजजीवन व धार्मिक अवनती पाहायला मिळाली. या काळात परंपरागत चालत आलेल्या भक्तिमार्गाच्या मर्यादा रामदासांनी जाणल्या होत्या. या संघर्षकाळात राजकीय व सांस्कृतिक आक्रमण एवढे जबरदस्त होते की, परंपरागत भक्तिमार्ग लोकांना त्यापासून वाचवू शकत नव्हता. नीती, न्याय, चारित्र्य यांची चाड नसलेले यवनी राज्यकर्ते आणि सुलतानशाहीचे नोकरवर्ग या सार्यांचा छळ तत्कालीन महाराष्ट्र सोसत होता. याचे साधे उदाहरण सोळाव्या शतकात एकनाथांच्या चरित्रात पाहायला मिळते. एकनाथांना ‘शांतिब्रह्म’ म्हणतात. एकनाथ हे समन्वयबुद्धीचे आदर्श सुधारक होते. महाराष्ट्रातील उदारमतवादाचे ते जनक होते.

सर्वधर्मसमभावाचा उपदेश करून त्यांनी यवनांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. कोणाचे कधीही वाईट न चिंतणारे एकनाथ महाराज पैठणला गंगास्नानावरून परत येत असताना एक यवन १०८ वेळा त्यांच्या अंगावर थुंकल्याची कथा सांगण्यात येते. एवढे होऊनही एकनाथांची शांती ढळली नाही. यवनाच्या थुंकण्यामुळे आपल्याला १०८ वेळा गंगास्नान घडले, असा सकारात्मक विचार करून नाथांनी त्याचे आभार मानले. तेव्हा खजिल होऊन तो नाथांना शरण गेला. या कथेच्या संदर्भात एका व्याख्यानात पु. भा. भावे म्हणाले होते की, “नाथांचे मी एकवेळ समजू शकतो, पण त्या काळचा त्यांच्या आजूबाजूचा समाज काय हात बांधून ही मज्जा बघत होता? त्यांच्यापैकी कोणाचे रक्त कसे उसळले नाही? भ्याड समाजातील एकाने तरी त्या यवनाला चोप द्यायला हवा होता.” सार्‍या देशासमोर हे धर्मनाशाचे संकट उभे होते. प्रत्यक्ष बोलण्याची सोय राहिली नव्हती. म्लेंच्छांच्या दहशतीपुढे लोक भ्याड, स्वाभिमाशून्य झाले होते. हे नाथांच्या लक्षात आले होते. त्यांनी ‘भावार्थ रामायणा’द्वारे लोकांना योग्य दिशा दाखण्याचे धाडस केले.

 

देवद्रोही देवकंटक । भूतद्रोही जीवघातक ।

धर्मद्रोही दुःखदायक । यांसी अवश्य मारावे ॥

 

यातून नाथांनी एक प्रकारे सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केला. पुढे शिवकाळात रामदासांनी ही भूमिका मांडली.

भगवान श्रीकृष्णाने गीतेत जो कर्मयोग सांगितला, त्यावर समर्थांनी चिंतन केले. गीतेतील उपदेश असा होता-

परित्राणाय साधुनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ (४.८)

 

साधुसज्जनांचे संरक्षण व दुष्टांचा नाश करून धर्माची स्थापना करायची आहे. परंपरागत भक्तिमार्गात साधुसज्जनांचे रक्षण होत असले तरी दुष्टांचा नायनाट होत नव्हता. गीतेच्या तत्त्वज्ञानातील ‘विनाशाय च दुष्कृताम्’ हा भाग कार्यान्वित होत नव्हता. तो प्रत्यक्षात आणण्याची मनीषा बाळगून रामदास कामाला लागले होते. महंतांचे जाळे हिंदुस्थानभर पसरवून रामदासांना धर्मजागृती व जुलमी यवनी सत्तेचा विरोध त्यासाठी वातावरण तयार करायचे होते. याचा अर्थ असा नव्हे की, पूर्वापार चालत आलेला भक्तिमार्ग त्यांना संपवायचा होता.

 

रामदासांना त्या भक्तिमार्गातील त्रुटी दूर करून भक्तीचा आनंद घेत दुष्टांच्या नाशाची योजना करायची होती. हाच रामदासांचा ‘महाराष्ट्रधर्म’ होय. रामदासांनी सांगितलेला हा महाराष्ट्र धर्माचे प्रतिपादन करून गीतेतील ‘प्रवृत्तिप्रधान’ तत्त्वाला रामदासांनी प्राधान्य दिले. वस्तुतः ‘प्रवृत्तिप्रधान’ तत्त्व भारतीयांस पूर्वीपासून होते. परंतु, मध्यंतरीच्या काळात ‘निवृत्तिमार्ग’ व ‘प्रपंच पराङ्गमुखता’ यांचा पगडा समाजावर बसल्याने तो दुर्बल होऊन पारतंत्र्यात गेला. त्या प्रवृत्तिमार्गावरील काजळी दूर करून त्याला प्रज्वलित करून लोकांना प्रपंच विज्ञान व राजकारणाकडे वळवावे, यासाठी रामदासांनी ‘महाराष्ट्रधर्म’ सांगितला. लोकांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण केली.

 

महाराष्ट्रातीलहिंदू धर्म’ व इतर प्रांतांतील हिंदू धर्म यांमध्ये फरक होता. वि. का. राजवाडे यांनी ‘महाराष्ट्रधर्म’ ही संकल्पना समजावून सांगताना म्हटले आहे की, इतर प्रांतांतील हिंदू धर्म + धर्मस्थापना + गोब्राह्मण प्रतिपालन + स्वराज्य स्थापना + एकीकरण + धुरीकरण म्हणजे महाराष्ट्रातील ‘हिंदू धर्म’अशी त्याकाळी समजूत होती. यालाच रामदासांनी ‘महाराष्ट्रधर्म’ असे नाव दिले आहे. ‘महाराष्ट्रधर्मा’ची संकल्पना सफल करण्याचे अवघड काम शिवाजी महाराजांनी केले आहे. राजवाडे यांनी पुढे असेही म्हटले आहे की, इतर प्रांतातील हिंदू धर्म हा ‘सहिष्णु हिंदू धर्म’ होता, तर महाराष्ट्रातील ‘हिंदू धर्म’ हा ‘जयिष्णु हिंदू धर्म’ होता. न्या. म. गो. रानडे यांनी समर्थांच्या ‘मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्रधर्म वाढवावा।’ या अर्धओवीचा उल्लेख करून म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रधर्म’ हा हिंदू धर्माहून भिन्न आहे. त्याच्या तोडीचा जेमतेम इंग्रजी शब्द म्हणजे, ‘पॅट्रिगेटिझम.’ न्या. रानडे यांनी ‘महाराष्ट्रधर्मा’ला ‘राष्ट्राभिमान’ किंवा ‘राष्ट्रभक्ती’ म्हटले आहे. थोडक्यात, रामदासांनी लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण केली. रामदासांनी शिवाजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात ‘महाराष्ट्रधर्मा’चा उल्लेख आहे-

 

तीर्थक्षेत्रे मोडिली । ब्राह्मणस्थाने भ्रष्ट जाली ।

सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ।

या भूमंडळाने ठायीं । धर्म रक्षी ऐसा नाही ।

महाराष्ट्रधर्म राहिला काही । तुम्हांकरिता ॥

 

तीर्थक्षेत्रे उद्ध्वस्त झाली, धर्म नाश पावत आहे आणि हे सांभाळणारा कोणी दिसत नाही, ही खंत रामदासांच्या मनात होती. हे राष्ट्रीय कार्य शिवाजी महाराजांनी करावे, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून हा ‘महाराष्ट्रधर्म’ तुमची वाट पाहतोय असे रामदास म्हणाले. मराठ्यांना ‘क्षात्रधर्म’ सांगतानाही त्या प्रकरणात रामदासांनी ‘महाराष्ट्रधर्मा’चा उल्लेख केला आहे.

 

मराठा तितुका मेळवावा ।

महाराष्ट्रधर्म वाढवावा ॥

 

हा राष्ट्रीय शिकवण देणारा ‘महाराष्ट्रधर्म’ रामदासांना हिंदुस्थानभर वाढवायचा होता. हिंदुस्थानभर त्याचे आचरण होऊन लोकांच्या मनातील भीती त्यांना नाहीशी करायची होती. महाराष्ट्र राज्याला तर ‘महाराष्ट्रधर्म’ शर्थीने आचरणारे शिवाजी महाराजांचे नेतृत्व लाभले होते. या नेतृत्वाखाली सर्व हिंदुस्थान यावा, ही रामदासांची इच्छा असणार. म्हणून शके १६०३ मध्ये रामदासांनी संभाजी राजांना जे पत्र लिहिले, त्यात ‘महाराष्ट्रधर्म’ आचरणारे महाराष्ट्र राज्य सगळीकडे वाढवण्याचा उपदेश आहे.

 

आहे तितुके जतन करावे।

पुढे आणिक मिळवावे।

महाराष्ट्रराज्य करावे। जिकडे तिकडे॥

 

रामदासांनी अशा रीतीने पूर्वापार चालत आलेल्या भक्तिमार्गाला प्रपंचविज्ञान आणि राष्ट्रभावना यांची जोड देऊन ‘महाराष्ट्रधर्म’ सांगितला. हा ‘महाराष्ट्रधर्म’ हिंदुस्थानभर नेऊन म्लेंच्छांची जुलमी सत्ता त्यांना नष्ट करायची होती व जिकडे तिकडे हिंदवी स्वातंत्र्याचा उद्घोष करून रामराज्य निर्माण करायचे होते.

- सुरेश जाखडी

[email protected]

@@AUTHORINFO_V1@@