"हुजरे आणि मुजरे करण्याची संस्कृती शिवसेनेची"

    दिनांक  14-Jan-2020 17:32:01
|
Patil _1  H x Wढोंगीपणा, दुषणं देणे थांबवा : नगरसेवक सुरज पाटील

 


नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील राजकारण तापले आहे. "मातोश्रीवर जान हुजरे आणि मुजरे करण्याची संस्कृती आमच्याकडे नसून ती शिवसेनेची आहे शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांचा ढोंगीपणा आणि दुसर्‍यांना दुषण देण्याचे उद्योग बंद करावेत," असा सज्जड इशारा नगरसेवक सुरज पाटील यांनी दिला. 'लोकनेते गणेश नाईक यांच्याकडे सर्वांना प्रेमाची, सन्मानाची आणि आपुलकीचीच वागणूक मिळत असते. हे सर्वज्ञात आहे,' असेही सुरज पाटील म्हणाले.

 

नवी मुंबई महापालिकेत समानकाम समान वेतनापोटी कंत्राटी कामगारांना वेतनातील फरकाची थकबाकी देण्याचा विषय गेल्या आठवडयात झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आला होता. हा ठराव लवकरच मंजूर करुन त्या संबधी विशेष बैठक घेण्यात येईल, असे स्थायी समितीचे सभापती नविन गवते यांनी स्पष्ट करुन देखील या विषयाचे शिवसेनेच्या नगरसेवकांनी राजकारण केले. स्थायी समितीच्या बैठकीत विषयपत्रिका फाडून हे नगरसेवक महिला असलेल्या सचिवांविरोधात आक्रमक झाले होते.

 

लोकनेते गणेश नाईक यांना 'सॅल्युट' केला नाही म्हणून कंत्राटींचे पैसे थकविल्याचा जावईशोध या नगरसेवकांनी लावला, असा आरोप पाटील यांनी केला आहे. वास्तवित सत्ताधारी पक्षाचे सल्लागार म्हणून लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी सुचना केल्यानुसारच कंत्राटी कामगारांसाठी २०१७ मध्ये समान कामास समान वेतन देण्याचा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेने घेतला होता.

 

'एकुण १४० कोटी रुपयांची थकबाकी दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. २०१८ मध्ये थकबाकीचा पहिला हफता चुकता करण्यात आला असून आता दुसरा हप्ताही नाईक यांच्याच सुचनेनुसार देण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. परंतु पालिका निवडणुक डोळयासमोर ठेवून पराभवाच्या भितीने आताच धास्तावलेल्या विरोधक शिवसेनेच्या नगरसेवकांनी कंत्राटी कामगारांच्या विषयातही खालच्या दर्जाचे राजकारण केले. प्रत्येक वेळी दुसर्‍यांना दोष देवून आपली अकार्यक्षमता लपवू नका. तुमचे डोळे मिटून दुध पिण्याचे धंदे सर्वांना माहित आहेत,' असा पलटवार नगरसेवक सुरज पाटील यांनी शिवसेना नगरसेवकांवर केला आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.