"छत्रपती शिवरायांच्या गड-किल्ल्यांचे पावित्र्य जपलेच पाहिजे !"

    दिनांक  14-Jan-2020 16:44:40
|
Peter _1  H x W


गिर्यारोहक पीटर वॅन गिट यांचे मत 
 

अहमदनगर : "महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रांगांचे अनमोल देणे लाभले असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे सह्याद्रीच्या कुशीतील दोनशे गड दोन महिन्यांत सर करण्याची प्रेरणा मिळाली. प्रत्येक किल्ल्याचा एक वेगळा जाज्वल्य इतिहास आहे. प्रत्येकाने या किल्ल्यांचा इतिहास जाणून घेऊन त्याचे पावित्र्य जपावे. पर्यटनाची आवड निर्माण करणारा ट्रेकॅम्प संस्थेचा उपक्रम देशात मार्गदर्शक ठरेल," असे मत बेल्जिअमचे गिर्यारोहक पीटर व्हॅन गिट यांनी केले आहे.

नगरच्या 'ट्रेक्कॅम्प डिस्कव्हर अननोन' या संस्थेच्या वतीने आम्रपाली गार्डन येथे आयोजित केलेल्या संवाद कार्यक्रमात पीटर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, ऊर्जा गुरुकुल स्कूलच्या संस्थापिका कल्याणी फिरोदिया, ट्रेकॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी आदी उपस्थित होते.

साद शिवसह्याद्रीलाया अनोख्या पर्यटनविषयक संकल्पनेचे उद्घाटन जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या हस्ते रिमोटचे बटन दाबून करण्यात आले. शहराजवळील छोट्या गावांत रानमाळावर मुक्काम करून पर्यटनाची अनुभूती मिळावी, यासाठी नवी योजना साकारण्यात आली आहे.

पीटर यांनी 'स्लाईड शो'द्वारे ट्रान्स सह्याद्री मोहिमेची सचित्र माहिती दिली. ते म्हणाले, 'नगरमधील लोकांना भेटल्यानंतर मला माझ्या घरी आल्यासारखे वाटले. महाराष्ट्राची संस्कृती आणि पाहुणचाराने मी अक्षरशः भारावून गेलो आहे. नगर जिल्ह्यासह महाराष्ट्राला भौगोलिक आणि ऐतिहासिक परंपरेचे सौंदर्य लाभले आहे. शिवाजीमहाराजांच्या स्वराज्यातील गडकिल्ल्यांना भेटी देऊन स्फूर्ती आणि सकारात्मकतेची जाणीव होते. व्यायाम व योग्य आहार घेऊन आरोग्य जपा. असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी म्हणाले की, 'दैनंदिन व्यस्ततेतून ताण कमी करण्यासाठी पर्यटनाचा पर्याय निवडा. विशाल लाहोटी यांनी ट्रेकॅम्प संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेल्या पर्यटन संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. त्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य टिकून राहण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले. नगर जिल्हा हा राज्याला-देशाला पॅटर्न देणारा जिल्हा आहे. ट्रेकॅम्पची साद शिवसह्याद्रीलाही संकल्पनाही महाराष्ट्राला दिशादर्शक ठरणार असल्याचे उद्योगपती नरेंद्र फिरोदिया म्हणाले.

कल्याणी फिरोदिया म्हणाल्या की, 'मुलांना नाविन्याची कायम ओढ असते. पालकांनी त्यांच्यात निसर्गाची आवड निर्माण करावी. मुलांना मोबाईल-टीव्हीपासून परावृत्त करण्याची ताकद पर्यटना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात विशाल लाहोटी म्हणाले की, ‘साद गर्भगिरीलाया विनामूल्य असलेल्या उपक्रमातून आतापर्यंत हजार सदस्य ट्रेकॅम्पला जोडले आहेत. साद शिवसह्याद्रीलाच्या माध्यमातून गड किल्ल्यांना भेटी देऊन माहितीही घेतली जाणार आहे. तसेच कॅम्पिंगया संकल्पनेतून शहरालगत पर्यटनाच्या संधीसोबतच स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.

पीटर यांचे नगरमध्ये सकाळी आगमन झाल्यानंतर त्यांनी मांजरसुंबा, चाँदबीबी महाल आदी ठिकाणी भेटी दिल्या. कार्यक्रमासाठी ट्रेकॅम्पच्या सदस्यांनी खूप मेहनत घेतली. सुदर्शन कुलकर्णी यांनी म्हटलेल्या शिवगारदने संपूर्ण परिसर दणाणून सोडला. शर्वरी मुळे यांनी सूत्रसंचलन केले तर तर विशाल लाहोटी यांनी आभार मानले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.