नुसत्या 'स्टिकी' नको, आयुष्यात सकारात्मकता 'स्टिक' करा!

    दिनांक  13-Jan-2020 21:42:25
|

Health _1  H xआपल्याला सकारात्मकता खूप आवडते. ती सकारात्मकता आपण खर्‍या अर्थाने विधायकपणे हाताळली तर खरंच आपले भले होऊ शकते. आपण सकारात्मक प्रवृत्तीबद्दल जेव्हा आज इतका बोलबाला करतो, तेव्हा त्यातील काही तणावात्मक आणि नकारात्मक बाजूंबद्दल जाणून घ्यायलाच हवे.

 

आज कुठलाही पेपर उघडा. आपण कुठल्या बातम्या नियमितपणे वाचतो. भ्रष्टाचार शिक्षण क्षेत्रात, धर्मात, आर्थिक व्यवहारात, राजकीय क्षेत्रात आणि माणुसकीतसुद्धा. आज आपण 'अ‍ॅमेझॉन' जंगल जळताना किंवा 'न्यू साऊथ वेल्स' धगधगताना पाहतो. तसेच आजचे जग जणू कायम धगधगत आहे. आपल्या आजूबाजूला मुलंबाळं भुकेने मरताना दिसतात. जागतिक तापमान वाढीने वातावरण अस्थिर झाले आहे. हे सगळे प्रश्न असे आहेत की, त्यांच्यावर सहज सोपे उपाय सापडू शकत नाहीत. अशावेळी आपली सकारात्मकता खोटी वाटायला लागते.

 

हे सगळे न सुटणारे प्रश्न आपल्यासमोर 'आ' वासून ठाकलेले असताना चांगल्या सुखद भावनेत आपण जगणार तरी कसे? या सगळ्यात आपण असंदिग्ध आहोत. हे सांगणे म्हणजे आपण खर्‍या अर्थाने मूर्ख आहोत, हे जगासमोर कबूल करण्यासारखे आहे. आपण लोकांना हे गोंधळलेले जग बदलू शकतो, जगातून दुःखाचेनिराकरण करू शकतो, जगाला संतमय करू शकतो, अशासारखे काही सकारात्मक करू शकतो, असे सांगायचा छोटासा प्रयत्न जरी केला, तरी आपण जगातल्या खास वेड्यांमध्ये गणले जातो. कोणी सर्वसामान्य शहाणा आपल्याबरोबर येण्यास तयार नसतो. इतकेच कशाला आपल्यापासून आपल्या अशा वैचारिक आदर्शवादापासून इतर माणसं दूर राहणे पसंत करतात. आपण चक्क एकटे पडतो बरे. हा अनुभव आपण घरात घेऊन जरी पाहिला तरी याची प्रचिती नक्की येईल.

 

आज थोडंस बारकाईने आणि हुषारीने पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येईल ती म्हणजे, लोक ज्या गोष्टी आवडतात त्यापेक्षा ज्या गोष्टी आवडत नाहीत किंवा त्या गोष्टी संताप देतात, त्या गोष्टींबाबत एकत्र जुळले जातात. मग त्यात निषेध आला वा विरोध आला. अहिंसेत आपल्याला जगात इतकी एकी कधी दिसली नाही, जितकी ती हिसेंत दिसली. दुर्दैवी बाब आहे ही, पण तरीही हेच सत्य आहे. खरी सकारात्मकता लोकांची नाही आणि लोकप्रियही नाही. खर्‍या अर्थाने सकारात्मकतेचे प्रचारक एकटे पडलेले दिसतात. आपल्याला एकटे पडण्याची भीती वाटते की काय, म्हणून आपण तक्रार करणार्‍यांच्या सुरात सूर मिळवतो. कारण, ते जास्त सोपे आहे, त्याला धैर्याची गरज लागत नाही.
 

आपण कधी मोगर्‍याचा सुवास घेतो. एखादा सुंदर चित्रपट पाहतो. एखादा छान पदार्थ चाखतो. त्या क्षणापुरते आनंदाचे क्षण आपण अनुभवतो, पण पुन्हा आपल्याला तसेच कंटाळवाणे वाटत राहते. खर्‍या अर्थाने सकारात्मक दृष्टिकोनासाठी गरज असते, ती आपल्या आयुष्यातील नकारात्मक दृष्टिकोनाला आणि विचारांना पुन्हा नव्याने लिहिण्याची. आपल्या जुन्या नकारार्थी विचारप्रक्रियेत आपण होकारार्थी चिंतनशीलता बिंबवू शकत नाही. असे केल्यास त्यातून अधिक गोंधळच निर्माण होईल. शिवाय आपल्याला त्यातून होकारार्थी दिशा नक्कीच मिळणार नाही. होकारार्थी आयुष्याची आव्हाने अनेक आहेत, पण त्यात आनंददायी फायदेही आहेत. म्हणून तर त्या दिशेने जायचे.

 

होकारार्थी आयुष्य जगण्याचे फुसके प्रयत्न करणार्‍या मित्रमैत्रिणींच्या टेबलावर, भिंतीवर 'आनंदी राहा, हसतमुख राहा, आजूबाजूच्या गोष्टींवर प्रेम करा किंवा मी यशस्वी आहे, लोकांना मी खूप आवडतो,' अशा पिवळ्या, निळ्या, हिरव्या, गुलाबी 'स्टिकी' लावलेल्या दिसतात. खूप आश्चर्य वाटते की, लोकांना या रंगीबेरंगी 'स्टिकी' खरेच सकारात्मकता देतात का? आनंदी होण्यासाठी आपल्याला जिथे पाहू तिथे अशा 'स्टिकी' लावण्याची खरंच गरज आहे का? वरून वरून असे वाटते की, वाहवा! या मंडळींना सकारात्मक राहण्याचा किती आवेग आहे. ते खरे नाही. तो शुद्ध वेडेपणा आहे. स्वत:च्या भावनांना स्वत:च फसवण्याचा प्रकार आहे. खरे तर ते खूप लाजीरवाणेच आहे.
 

होकारार्थी जीवनासाठी स्टिकींची गरज नसते, तर होकारार्थी जगण्याची 'फिलॉसॉफी' लागते. तसे पाहिले तर सध्या आपण ज्या जगात राहतो, ते 'बिझी' जग आहे. 'बिझी' हा या युगाचा झोकदार शब्द आहे. आपण कुणीतरी खास आहोत, हे दर्शविणारा शब्द आहे. हा शब्द आपल्या आयुष्यात इतर गोष्टींना काही स्थान नाही, असे दाखवितो. त्यामुळे 'मन:शांती', 'आनंद' आणि 'सकारात्मकता' हे शब्द मागच्या परसात जाऊन बसले आहेत. आपल्याला 'वॉक' घ्यायचा असतो. 'मेडिटेशन' करायचे असते, पण त्यासाठी मनाच्या पडद्यावरचे 'बिझी' लिंपण तसेच ठेवून कसे जमणार आणि जुळून येणार हे सगळे? आपल्या 'बिझी' आयुष्यात सकारात्मकता आणखी एखादी आपले लक्ष विचलित करणारी बाब आपल्याला वाटायला लागते. त्यासाठी वेळ काढायचा म्हटले तर आपल्याच स्टोअर रुममध्ये आपण किती शोधाशोध करणार! कठीणच वाटते बरे?

 

- डॉ. शुभांगी पारकर

(क्रमश:)
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.