संवेदनशीलता भाग-९

    दिनांक  13-Jan-2020 21:28:33
|

page _1  H x W:


माणसाची संवेदनशीलता ही प्रत्येक माणसाची शारीरिक व मानसिक जडणघडण व प्रकृती यावर अवलंबून असते. एकाच वातावरणात राहणार्‍या दोन लोकांची संवेदनशीलता वेगळी असू शकते. या वेगळ्या संवेदनशीलतेमागे असते, ती प्रत्येक माणसाची मूलभूत प्रकृती व पद्धती. त्यालाच 'Constitution of man' असेही म्हणतात.

 

ही मूलभूत प्रकृती काही अनुवांशिकतेतूनहीयेत असते. अनुवांशिकतेतून येणारी प्रकृती आणि त्या माणसाची वैयक्तिक जडणघडण ही माणसाची मूलभूत प्रकृती ठरते. या मूलभूत प्रकृतीवर सतत आघात होत असतातउदा. आजूबाजूच्या वातावरणात होणारे बदल ऊन-वारा, पाऊस-थंडी या बदलत्या ऋतूंमुळे होणारा परिणाम उष्ण-शीत वातावरण, दमट वातावरण याचबरोबर मानसिक जडणघडणसुद्धा महत्त्वाची असते. ज्या कौटुंबिक व सामाजिक वातावरणात माणूस वाढतो, त्या वातावरणाचा माणसाच्या मानसिकतेवर सतत परिणाम होत असतो. ज्या गोष्टी तो रोज बघत असतो, त्याअनुसारच त्याची मानसिक स्थिती बनत असते.
 

या सर्व गोष्टींमुळे जरी व्यक्तिगत मूलभूत प्रकृती तयार होत असली तरी मुख्य बाब ही प्रत्येकाच्या संवेदनशीलतेमध्येच असते. माणसावर सततच्या होणार्‍या या वातावरणातील घटकांच्या परिणामाला अनुसरूनच मग प्रत्येक माणसाची संवेदनशीलता बनते. या बदलाच्या अनुसार जेव्हा शरीर व मन अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिक्रिया देते, ती केवळ संवेदनशीलतेमुळेच. माणसाच्या या मूलभूत प्रकृतीला जर कुठूनही धक्का लागला, तर मात्र माणसाची आजारी पडण्याची प्रक्रिया चालू होते व आजाराचीच प्रकृती बनत जातेउदा. हल्ली आपण टीव्हीवर अनेक जाहिराती पाहत असतो. या जाहिरातींमध्ये अनेक कलाकार आपल्याला अनेक उत्पादने घ्यावयास सांगत असतात.

 

कित्येकदा त्याची गरजही नसते, पण सतत ती जाहिरात दाखवून हे लोक आपला धंदा करत असतात. पूर्वी एक जाहिरात यायची की, वयाच्या पन्नाशीनंतर शरीराला कॅल्शियमची गरज असते तेव्हा तुम्ही कॅल्शियम घ्या. १० वर्षांपूर्वी नवीन जाहिरात आली की, चाळीशीनंतर स्त्री-पुरुषांना कॅल्शियमची गरज असते. आता हल्ली नवीन जाहिरात सांगते की, तिशीनंतर कॅल्शियमची गरज असते, जी कथा कॅल्शियमची तीच प्रोटीन किंवा अन्य उत्पादनांची असते. लाखो कोट्यवधी लोकांना आपल्या जाहिरातीच्या जाळ्यात फसवून कंपन्या स्वत:चा नफा तर कमवतात. परंतु, त्याचवेळी शारीरिकदृष्ट्या माणसाच्या मूलभूत प्रकृतीशी व संवेदनशीलतेशीच खेळत असतात.

 

अशी औषधे विनाकारण घेत राहिल्याने किंवा विनाकारण लसीकरण करत राहिल्याने या बनविणार्‍या कंपन्यांचा उद्देश सफल होतो व माणूस अजून कमकुवत होऊन या औषधांच्या विळख्यात अलगदपणे अडकला जातो. माणसाची संवेदनशीलता न अभ्यासताच फक्त सकरसकट विचार करून या तथाकथित आरोग्याच्या सवयी लोकांच्या माथी मारल्या जातात. सारांश असा की, प्रत्येक माणसाचे मूलभूत 'Constitution' हे वेगळे असते व त्याची संवेदनशीलतासुद्धा वेगळी असते. तिला जर योग्य महत्त्व दिले नाही, तर माणसाला रोगमुक्तता कधीही मिळत नाही.

- डॉ. मंदार पाटकर

९८६९०६२२७६

(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.