रेवदंड्यात भरला पक्षीमित्रांचा मेळा!

    दिनांक  13-Jan-2020 13:33:09   
|


saf_1  H x W: 0

 


३३ वे 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन' संपन्न


महाराष्ट्रातील पक्षीमित्रांकरिता उत्सवासमान असलेले ३३ वे 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन' अलिबागमधील रेवदंड्यात दि. ११ आणि १२ जानेवारी रोजी संपन्न झाले. या पक्षीउत्सवासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सुमारे पाचशे पक्षीमित्र आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी संमेलनातील पक्षीविषयक मार्गदर्शन सत्रांचा आणि पक्षीनिरीक्षण भ्रमंतीचा पुरेपूर आनंद लुटला.

 

हाराष्ट्रातील पक्षीनिरीक्षण चळवळीला चालना देण्यामध्ये 'महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलना'चा मोठा वाटा आहे. 'महाराष्ट्र पक्षीमित्र संघटने'तर्फे १९८१ पासून या संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. स्थलांतरित पाणपक्ष्यांचे माहेरघर मानले जाणाऱ्या रेवदंड्यात यंदाचे ३३ वे संमेलन रंगले. 'अमेझिंग नेचर'ने आयोजित केलेल्या या संमेलनाला 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट' आणि 'स्वराज्य प्रतिष्ठान'सह-आयोजक म्हणून लाभेल. 'मँग्रोव्ह फाऊंडेशन' आणि अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) मुंबई कार्यालयाचे प्रायोजन मिळाले. आक्षी किनाऱ्यावरील किनारी पक्षी कार्यशाळेने या संमेलनाची नांदी झाली आणि दि. ११ जानेवारी रोजी सकाळी संमेलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी रेवदंड्यातील भंडारी समाज सभागृह पक्षीमित्रांनी गजबजले होते. संमेलनाचे उद्घाटक म्हणून रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये उपस्थित होते. यावेळी संमेलनाचे माजी अध्यक्ष वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे, अध्यक्ष पक्षी अभ्यासक डॉ. राजू कसंबे आणि पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकरांची उपस्थितीही लाभली होती. या समारंभात संमेलनाचे मावळते अध्यक्ष किशोर रिठे यांनी संमलेनाच्या अध्यक्षपदाची धुरा डॉ. कसंबेंकडे सोपवली.

 

उद्घाटन कार्यक्रमापूर्वी पाहुण्यांनी वर्धा आणि नाशिकवरून आलेल्या सायकलस्वार पक्षीमित्रांचे स्वागत केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमामध्ये संघटनेतर्फे प्रथमच जाहीर केलेल्या पक्षीमित्र पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पक्षीनिरीक्षक बाळासाहेब कुलकर्णींना 'जीवनगौरव पुरस्कार' देण्यात आला. 'पक्षीसंवर्धन व शूश्रुषा पुरस्कार' मुकुंद धुर्वेंना आणि अश्विन पाटील व प्रशांत वाघ यांना 'पक्षीसंशोधन/जनजागृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी पक्षीमित्रांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये गजानन वाघ लिखित 'अमरावती जिल्ह्यातील पाणथळ व पाणपक्षी', किरण मोरे लिखित 'माळरानावरील चंडोल', सचिन मेण यांनी लिहिलेले 'रोजनिशी मोरपिशी आठवणींची' आणि निखिल भोपळे लिखित 'वेन इन डाऊट, ट्राय इट आऊट-प्लॉवर अ‍ॅण्ड सॅण्डपायपर' या पुस्तकांचा समावेश होता. त्यानंतर 'ग्रीन वर्क्स ट्रस्ट'कडून आयोजित केलेल्या छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना गौरवित करण्यात आले.

 

संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात अध्यक्ष डॉ. राजू कसंबे यांनी पक्षीनिरीक्षण आणि लिखाणमधील संवदेनशील विषयांवर भाष्य केले. पक्षीनिरीक्षकांनी नेहमीच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन जपणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. पक्ष्यांसंबंधी केलेल्या नोंदी आणि लिखाण लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता समाज माध्यमांचा वापर करणे गरजेचे असल्याचे कसंबेंनी नमूद केले. पक्षीनिरीक्षण करताना कॅमेऱ्याऐवजी दुर्बिणीचा वापर करा, छायाचित्रणावेळी पक्ष्यांना धोका पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याचा मौलिक सल्लाही त्यांनी पक्षीमित्रांना दिला. सरतेशेवटी त्यांनी महाराष्ट्रातील 'रामसर स्थळां'चा मुद्दा अधोरेखित करून लवकरच महाराष्ट्राला पहिले 'रामसर स्थळ' मिळण्याची आशा व्यक्त केली. यावेळी संमेलनाचे मावळते अध्यक्ष किशोर रिठे यांनी संमेलनाच्या आयोजनामध्ये वन विभागाचा वन्यजीव विभाग आणि महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेमध्ये समन्वय असणे आवश्यक असल्याचे सांगितले. संमेलनाचे उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशींनी रायगड जिल्ह्यातील पक्ष्यांवर आधारित कॉफी टेबल बुक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. संमेलनाच्या दोन्ही दिवशी पक्षीशास्त्र, संवर्धन आणि जनजागृतीवर आधारित विविध मार्गदर्शन सत्रे पार पडली. पहिल्या दिवशी पार पडलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये वन अधिकारी सुनील लिमये यांची मुलाखत विशेष लक्षवेधी ठरली. यावेळी त्यांनी भविष्यातील पक्षीसंवर्धनाच्या विविध बाबींवर भाष्य केले. दुसऱ्या दिवशी पक्ष्यांचे आवाज व त्यांचा अभ्यास, हे आवाज ध्वनिमुद्रित करण्याचे साहित्य, सारस पक्षी संवर्धन व संरक्षण, वृक्ष आणि पक्षी संवाद या विषयांवर आधारित सत्रे पार पडली.

 

पक्षी संमेलनाला मदत

 

पक्षीमित्र संमेलनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर यांनी मुलाखतकाराची भूमिका बजावली. 'राज्यातील धडाडीचे वनाधिकारी' म्हणून लिमये ओळखले जातात. या मुलाखतीच्या वेळीही त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. केवळ 'पक्षीसंवर्धन' या विषयाला केंद्रस्थानी न ठेवता, राज्यातील वन्यजीव व्यवस्थापनासंबंधीच्या विविध प्रश्नांचाही त्यांनी मनमोकळेपणे उत्तरे दिली.एकीकडे समाजाचा सरकारी यंत्रणेवरील विश्वास उडत चालल्याचे दिसते. मात्र, याच समाजातील कित्येकांना आपल्या मुलांना सरकारी नोकरी मिळण्याची अपेक्षाही असते. त्यामुळे सरकारी यंत्रणेविषयीचा असा दुटप्पीपणा बाळगणे चुकीचे असल्याचे परखड मत लिमये यांनी मांडले. 'अवनी' वाघिणीच्या वेळीही याच मानसिकतेनुसार आमची बाजू ऐकून न घेता वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर दोषारोप करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे, यावेळी समाजातील काही लोकांनी माध्यमांचा गैरवापर करून या प्रकरणाला वेगळा रंग दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढील वर्षापासून वन विभागाचा वन्यजीव विभाग हा पक्षीमित्र संघटनेसोबत समन्वय साधून पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्याची ग्वाही यावेळी लिमयेंनी दिली. महाराष्ट्रातील 'रामसर स्थळा'विषयी बोलताना ते म्हणाले की, “राज्यातील नांदूरमधमेश्वर आणि लोणार सरोवर अभयारण्याची निवड 'रामसर स्थळा'साठी करण्यात आली आहे. वन विभागाने रामसर समितीपर्यंत त्याच्या पाठपुरावा केला असून ही प्रक्रिया अंतिम पातळीवर आहे. येत्या काही महिन्यांमध्ये या स्थळांना 'रामसर'चा दर्जा मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

झाडा-पक्ष्यांची मैत्री

 

संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी स्व. प्रकाश गोळे स्मृती व्याख्यानांतर्गत संमेलनाध्यक्ष डॉ. राजू कसंबे यांचे व्याख्यान झाले. झाड आणि पक्ष्यांची असलेली मैत्री यावेळी डॉ. कसंबे यांनी उलगडली. झाडांचे बीजांकुरण करण्यासाठी पक्षी कशा पद्धतीने त्यांना सहकार्य करतात, याविषयीची रंजक माहिती त्यांनी पक्षीमित्रांना दिली. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत झाडांनी पक्ष्यांच्या मदतीने स्वत:चे बीजांकुरण आकाराप्रमाणे पक्षी त्यावर आकर्षित होतात. काही पक्षी केवळ फुलांमधील मध पितात. त्यामुळे झाडांनीदेखील त्यांना येणाऱ्या फुलांच्या मधाची नळी पक्ष्यांच्या चोचीप्रमाणे विकसित केली आहे.

 

कर्नाळा स्मरण वस्तू केंद्र

 

३३व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनामध्ये विविध खासगी आणि सरकारी संस्थांकडून निसर्ग साहित्य वस्तू केंद्र उभारण्यात आली होती. यामध्ये पक्ष्यांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या केंद्राचा समावेश होता. विशेष म्हणजे, या केंद्रामध्ये रानसई गावातील 'ग्राम परिस्थितीकीय विकास समिती'चे सदस्य सहभागी झाले होते. या केंद्राचे उद्घाटन संमेलनाच्या पहिल्या दिवशी पार पडले. यावेळी वन अधिकारी सुनील लिमये, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. राजू कसंबे आणि मावळते अध्यक्ष किशोर रिठे, संमेलनाच्या आयोजिका रुपाली मढवी, संघटनेचे अध्यक्ष जयंत वडतकर, कर्नाळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी भोसले उपस्थित होते. या केंद्रामधील साहित्य विक्रीतून निर्माण झालेला निधी रामसई समितीच्या विकासाकरिता देण्यात आला. कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या परिक्षेत्रात असलेल्या गावांच्या सर्वांगीण विकासासाठी वन विभागाने ग्रामस्थांच्या विकास समिती गठीत केल्या आहेत. या समितीमधील ग्रामस्थांना विविध मार्गाने रोजगार निर्माण करून देण्याचे काम कर्नाळा प्रशासनाकडून करण्यात येते.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.