सलामीची संधी कुणाला?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jan-2020
Total Views |
VEDH_1  H x W:
 


भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात उद्या मंगळवारी होणार्‍या पहिल्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणून नक्की कुणाला संधी मिळणार, याची उत्कंठा सध्या शिगेला पोहोचली आहे. २०१९च्या विश्वचषकात पाच शतक ठोकण्याचा आणि वर्षभरात सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम करणार्‍या रोहित शर्माचे स्थान यात निश्चित मानले जात आहे. मात्र, रोहितच्या अंगठ्याला सरावादरम्यान दुखापत झाल्याने पहिल्या सामन्यातील त्याच्या खेळण्याबाबत विविध तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. रोहित खेळू न शकल्यास त्याजागी पर्याय म्हणून लोकेश राहुल याला संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अलीकडे झालेल्या मालिकांमध्ये सलामीवीर फलंदाज शिखर धवनच्या अनुपस्थितीत मिळालेल्या संधीचे सोने करत लोकेश राहुलने उत्तम प्रदर्शन केले. राहुलने २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४२.३३च्या सरासरीने ८८९ धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतके आणि तीन शतकांचा समावेश आहे. तर टी-२० सामन्यांमध्ये तो ४४.१७च्या सरासरीने खेळत असून २ शतके आणि ९ अर्धशतकांची खेळी करत त्याने उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे राहुल याला अनेकदा पर्यायी सलामीवीर फलंदाज म्हणून संधी देण्यात येते. मात्र, दुखापतीनंतर पुनरागमन करणारा शिखर धवनही सध्या फॉर्मात असून त्यानेही नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान उत्तम प्रदर्शन करत सलामीवीर फलंदाजाच्या जागेसाठी आपणच योग्य असल्याचे सिद्ध केले आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारच्या सामन्यांमध्ये धवनच्या धावांची आकडेवारी तो फॉर्मात असल्याचेच सांगते. त्यामुळे उद्यापासून होणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून नक्की कुणाला संधी मिळणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. भारतीय संघाची निवड समिती आणि प्रशिक्षकांसह अनेकांपुढे हाच पेच उभा राहिला आहे. हे तिन्ही फलंदाज फॉर्मात असल्याने नेमक्या कोणत्या दोन फलंदाजांना सलामीला संधी द्यावी, हा निर्णय अद्याप निवड समितीला घेता आलेला नाही.

परतफेड होणार?

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात उद्या मंगळवार दि. १४ जानेवारीपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन्ही संघ तुल्यबळ असून यांच्यात होणारे सामने हे रंगतदार असणार, यात काही शंकाच नाही. मात्र, या मालिकेत भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य असणार आहे, ते म्हणजे पाहुण्या ऑस्ट्रेलिया संघाला पराभवाची परतफेड करून देण्याची. गतवर्षी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात दोन वेळा एकदिवसीय संघाच्या मालिका झाल्या. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर झालेल्या मालिकेमध्ये भारताने उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्याच घरी पराभवाची धूळ चारली होती. भारतीय संघाने केलेल्या या प्रदर्शनानंतर भारतच विश्वचषकाचा मुख्य दावेदार मानण्यात येत होता. मात्र त्यानंतर भारतीय धरतीवर झालेल्या एकदिवसीय मालिकेत तोच पराभव भारताच्या पदरी आला. स्वगृही मालिका पराभवाचा झटका बसल्यानंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता जवळपास वर्षभराच्या अवधीनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पुन्हा एकदा भारताच्या दौर्‍यावर आला आहे. या दौर्‍यात जुन्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताला आहे. भारतीय संघ सध्या मजबूत स्थितीत असून सलग मालिका जिंकत आल्याने भारताचा आत्मविश्वास कमालीचा बळावला आहे. त्यामुळे या मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड देणार, असा विश्वास संपूर्ण देशभरातील क्रिकेटप्रेमींना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारत स्वगृही धर्तीवरच मालिका खेळत आहे. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, बांगलादेश या संघाविरुद्ध झालेल्या मालिकांवर भारताचे एकतर्फी वर्चस्व राहिल्याचे आपण सर्वांनी पाहिले. त्यामुळे मालिका विजयाचा भारतीय संघाचा हा सिलसिला सुरूच ठेवण्याचा विश्वास क्रिकेटरसिकांना आहे. याआधी इंग्लंडच्या धर्तीवर झालेल्या विश्वचषकाच्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभवाचा मोठा झटका दिला होता. त्यामुळे पाहुणा ऑस्ट्रेलियाही बदला घेण्याच्या मानसिकतेनेच मैदानावर उतरणार आहे. दोन्ही संघ पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरणार असल्याने हे सामने रंगतदार होणारच. मात्र, आगामी टी-२० विश्वचषकामध्येही कोणत्या संघाचे पारडे जड राहील, हेदेखील या मालिकेवरून स्पष्ट होणार आहे.


- रामचंद्र नाईक 

@@AUTHORINFO_V1@@