इंधननिर्मितीचा ‘हरित’ मंत्र

    दिनांक  13-Jan-2020 17:23:58
|


saf_1  H x W: 0


देशाचे अर्थकारण बऱ्याच प्रमाणात जागतिक बाजारातल्या कच्च्या तेलाच्या दरांवर अवलंबून असते. त्याचबरोबर या तेलाच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणातली वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर जैव इंधनाच्या वापराचे महत्त्व प्रकर्षाने पुढे येते. त्या दृष्टीने या कृषिप्रधान देशात जैवइंधन निर्मिती, वापराला चालना दिल्यास वाढते प्रदूषण रोखण्यासोबत देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीचे अर्थकारण दोन्हींवरही सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत.


जागतिकीकरणानंतर जगभर आधुनिकीकरणाचे वारे वेगाने वाहू लागले. उद्योगांचा व्याप वाढू लागला, त्यांच्या विस्ताराला चालना मिळू लागली. त्याचबरोबर कारकिर्दीच्याही व्यापक संधी उपलब्ध होत गेल्या. आयटी उद्योगाने तरुणाईला मोठ्या प्रमाणात आकर्षित केले. या साऱ्यात उत्पन्नामध्येही वाढ होत गेली. आयटी उद्योग, बड्या कंपन्या तसेच सरकारी खात्यात वाढत्या वेतनामुळे आर्थिक जीवनस्तर उंचावण्यास मदत झाली. अशा स्थितीत आधुनिक जीवनशैलीकडील ओढा न वाढला तरच नवल! पूर्वी लोकांच्या गरजा मर्यादित होत्या तशाच आहे. त्या स्थितीत समाधानाने राहण्याची मानसिकता होती. आता तसे चित्र राहिलेले नाही. माणसाच्या गरजा वाढत आहेत, त्याचबरोबर आधुनिकतेचा हव्यासही वाढत चालला आहे. मात्र, हाच हव्यास निसर्गाच्या असंतुलनाला, वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. उदाहरण द्यायचे तर आजकाल वातानुकूलित यंत्रणेचा वापर बराच वाढला आहे. परंतु, यातून बाहेर पडणारा वायू ओझोनला धोका पोहोचवणारा ठरत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणेचा वापर कमी करावा, अशा सूचना दिल्या जात आहेत. मात्र, त्यांचे पालन कितपत होते, हा संशोधनाचा विषय ठरावा, अशी परिस्थिती आहे.

 

अशाच पद्धतीने वाहनांचा वाढता वापरही वाढत्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात कामाचा वेग वाढवणे गरजेचे ठरत आहे. एकाच वेळी अधिक कामे कशी पार पाडली जातील, याकडे लक्ष दिले जात आहे. त्या दृष्टीने वाहनांच्या वापराकडील ओढा वाढला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील त्रुटींमुळे स्वत:च्या वाहनांचा प्रवास सोयीस्कर वाटत असल्यामुळे त्यावर भर दिला जात आहे. दुसरीकडे, पूर्वीपेक्षा वाहनांच्या आवाक्यात आलेल्या किंमती, कर्जाच्या सुलभ सुविधा यामुळे वाहनांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही सर्व वाहने रस्त्यांवर आल्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी ही नवी डोकेदुखी ठरत आहे. त्याचबरोबर वाहनांच्या धुरामुळे प्रदूषणात होणारी वाढ चिंताजनक आहे. दुचाकी वा चारचाकी वाहनांसाठी इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणारा धूर प्रदूषण वाढवणारा ठरत आहे. त्याचबरोबर दुसरीकडे तेलाची गरजही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या मानाने आपल्या देशात तेलाचे अत्यल्प उत्पादन होत असल्याने त्याची मोठ्या प्रमाणावर आयात करावी लागते. त्यासाठी परकीय चलन मोठ्या प्रमाणावर खर्च होतेच, शिवाय आयात-निर्यातीतील तूटही वाढते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती देशाच्या अर्थकारणावर परिणाम करत असतात. तेलाच्या वाढत्या वापरामुळे प्रदूषणात होणाऱ्या वाढीसोबत हे मुद्देही विचारात घेण्यासारखे आहेत.

 

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता जैवइंधनाच्या वापरावर भर देणे ही काळाची गरज ठरत आहे. त्या दृष्टीने जैवइंधन निर्मितीला प्रोत्साहन दिले पाहिजे. मुख्यत्वे जैवइंधन हे वनस्पतिजन्य तेलापासून तयार केले जाते. त्यासाठी खाद्य अथवा अखाद्य तेलाच्या वनस्पतींचा वापर करता येतो. परंतु, आपल्या देशात खाद्यतेलाच्या वाढत्या वापरामुळेत्याची अधूनमधून टंचाई जाणवत असते. अशा परिस्थितीत जैवइंधनासाठी अखाद्य तेलाच्या वनस्पतींचा वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरणार आहे. त्या दृष्टीने जॅट्रोफा, कडुनिंब, करंज, एरंड, जोजोबा आदी वृक्षापासून जैवइंधनाच्या निर्मितीला चालना देता येऊ शकते. त्यासाठी या वृक्षांच्या लागवडीला प्रोत्साहन देणे गरजेचे ठरणार आहे. विशेषत: अखाद्य तेलाच्या वनस्पतींची लागवड कोरडवाहू क्षेत्रात वा पडिक जमिनीवरहीकरता येण्यासारखी आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना आर्थिक लाभाचा नवा पर्याय उपलब्ध होऊ शकेल. मुख्यत्वे जैवइंधन अथवा बायोडिझेल तयार करण्याची पद्धत साधी-सोपी असते. त्यामुळे त्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता राहत नाही. बायोडिझेल हे हाताळण्यास आणि वापरण्यास अत्यंत सोप्पे आहे. केवळ 10 ते 11 टक्के प्राणवायू असल्यामुळे बायोडिझेलची ज्वलनक्षमता अधिक असते. शिवाय बायोडिझेल हे दुर्गंधविरहीत असते. बायोडिझेलच्या ज्वलनानंतर अत्यंत कमी आणि पांढरा धूर निघतो. या धुरामध्ये कार्बन डायॉक्साईड आणि गंधकाचे प्रमाण नगण्य असते. त्यामुळे प्रदूषणवाढीचा प्रश्न निर्माण होत नाही. हे मुख्य फायदे लक्षात घेता बायोडिझेलचे महत्त्व प्रकर्षाने जाणवल्याशिवाय राहत नाही.

 

आजवर जैवइंधनावर विमानभरारी ही केवळ बड्या देशांची मक्तेदारी मानली जात होती. ती मोडून काढण्यात आता भारताला यश आले. जैवइंधनाचा वापर करून विमान वाहतूक करणाऱ्या अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासोबत भारतानेही स्थान मिळवले आहे. आणखी एक लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे भारताने वापरलेल्या जैवइंधनाचे उत्पादन एरंडाच्या झाडापासून करण्यात आले. या जैवइंधनाची निर्मिती विज्ञान आणि उद्योग संशोधन परिषद (सीएसआरआय) तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम यांनी संयुक्तपणे केली. पेट्रोल आणि डिझेलचे साठे पृथ्वीतलावर काही ठराविक देशातच उपलब्ध आहेत. त्यामुळे त्या साठ्यांचा मालकी हक्क मर्यादित स्वरूपात त्या देशांकडे आहे. यातलेही काही देश अतिरेक्यांच्या अधिपत्याखाली आहेत. त्यात विशेषत: इराकसारख्या देशांचा समावेश होतो. त्यामुळे तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा कोणत्याही प्रकारची आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर संपूर्ण जगाला परिणाम भोगावे लागतात. कारण, या इंधनाची मक्तेदारी ठराविक देशांकडेच आहे. दुसरीकडे, जागतिक अर्थशास्त्र आणि जागतिक आर्थिक परिस्थिती या इंधनावर अवलंबून आहे. अलीकडील काळात इंधनाची गरज वाढत आहे. वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. औद्योगिकीकरण वेगाने वाढत चालले आहे. या दोन्हींसाठी या इंधनाची गरज आहे. त्यामुळे या इंधनाची मागणी दर वर्षी वाढत आहे. असं असले तरी या इंधनाचे साठे झपाट्याने कमी होत चालले आहेत. एक दिवस पृथ्वीतलावरील हे सर्व जीवाष्म इंधनाचे साठे संपणार आहेत. याची जाणीव, गांभीर्य सर्व देशांना आहे. त्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून जगभरच इंधनाला पर्याय शोधले जात आहेत. त्यात जैवइंधनाचा पर्याय अधिक ठरणार आहे.

 

जैवइंधन हे मुख्यत्वे जैविक घटकांपासून तयार केले जाते. त्यामुळे हा पर्याय सर्वात महत्त्वाचा आणि उपयुक्त वाटू लागला आहे. यामुळेच जागतिक पातळीवर याबाबत चर्चा आणि प्रयत्न सुरू झाले आहेत. आपल्या देशातही गेल्या काही वर्षांपासून हे प्रयत्न सुरू आहेत. उदाहरण द्यायचं तर ‘मोगली एरंड.’ ज्याला इंग्रजीत ‘जट्रोफा क्युरकस’ म्हणतात, यापासून जैवइंधन निर्मिती करता येते. दुसरी वनस्पती म्हणजे ‘उंडी.’ ती कोकणात आढळते. याला इंग्रजीत ‘कॅलोफायलम इनोफायलम’ म्हणतात. विशेष म्हणजे, या वनस्पतींच्या बियांच्या तेलापासून बायोडिझेलची निर्मिती केली जात होती, आजही करतात. जैवइंधन म्हणून पर्याय समोर येतो तो इथेनॉलचा. इथेनॉलचा डिझेल आणि पेट्रोलमध्ये मिसळून वापर हा उत्तम पर्याय ठरणार आहे. यामुळे इंधनांची, वाहनांची आणि यंत्रांची कार्यक्षमता वाढते असं स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर या इंधनाच्या वापराने प्रदूषणाचे प्रमाण कमी होते हेही सिद्ध झाले आहे. फक्त पेट्रोल वापरल्यावर होणारे प्रदूषण आणि इथेनॉल मिसळून वापरल्यानंतरचे प्रदूषण याची तुलना केली, तर दुसऱ्या प्रकारात तुलनेने प्रदूषण कमी होत असल्याने हाच पर्याय सर्वत्र मान्य होत आहे. इथेनॉल शेतमालापासून तयार होते. भारतासारख्या कृषिप्रधान देशात शेती हा प्रमुख व्यवसाय राहिला आहे. त्यामुळे आपल्याला इथेनॉल निर्मितीच्या दृष्टीने शेतमालासाठी दुसऱ्या देशावर अवलंबून राहण्याची फारशी गरज नाही. मुख्यत्वे इथेनॉल हे पेट्रोल अथवा डिझेलमध्ये मिसळून वापरल्यामुळे भारताची कच्च्या तेलाची आयात कमी होईल. पर्यायाने परकीय चलनात बचत होईल. देशाची आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होईल. मुख्यत्वे इथेनॉलच्या वापराने हवेचे प्रदूषण तुलनेने कमी होईल. साधारणपणे उसापासून इथेनॉल तयार करतात. हे पूर्वी उसाची मळी, मोलॅसिस, काकवी यापासून तयार केले जायचे. परंतु, आता अनेक राज्यात इथेनॉल प्रकल्प सुरू झाले आहेत. पेट्रोलमध्ये पाच टक्के मिसळून त्याचा वापरही सुरू झाला आहे. तरीसुद्धा इथेनॉल वापराला आणखी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

 

आपल्याकडे उसाची मळी, उसाचा रस आणि साखरेपासून इथेनॉलची निमिर्र्ती करतात. देशात काही ठिकाणी मक्यापासून, ज्वारीपासून, गव्हापासून आणि सडलेल्या धान्यापासूनसुद्धा इथेनॉलची निर्मिती करतात. हिमालयाच्या पायथ्याशी, विशेषत: ईशान्य भारतात अरूणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर आणि आसाम या आठ राज्यांमधील काही भाग दलदलीचा आहे. तिथे मोठ्या प्रमाणात बांबूचे उत्पन्न मिळते. या सर्व राज्यांमध्ये बांबूचे गाळप करून इथेनॉल तयार करण्याचा २०० दशलक्ष डॉलर्सचा प्रकल्प आसाममध्ये अलीकडेच सुरू करण्यात आला आहे. दरवर्षी या प्रकल्पातून ६० दशलक्ष लिटर इथेनॉलची निर्मिती होणार आहे. अशा रितीने जैवइंधन वापरावर भर देतानाच दुसरीकडे त्याच्या उत्पादनासाठीही प्रयत्न सुरू आहेत. ते लक्षात घेता येत्या काळात भारताची कच्च्या तेलाची आयात दहा टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. म्हणजे या मार्गाने वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासोबत देशाच्या अर्थव्यवस्थेला दिलासा देण्याचा उद्देशही सफल होणार आहे.

- अभय देशपांडे

 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.