सुमारांचे साहित्य संमेलन

    दिनांक  12-Jan-2020 21:02:22
|


agralekh _1  H


संमेलनाध्यक्षांचे सुमार भाषण व डॉ. अरूणा ढेरे, प्रतिभा रानडे यांनी घेतलेल्या रोखठोक भूमिका यामुळे हे संमेलन स्मरणात राहील.९३वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन धाराशिव येथे पार पडले
. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड झाल्यापासूनच खरं तर वादाला सुरुवात झाली होती. ख्रिस्ती धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी करण्यात आली. गेल्या वर्षी डॉ. अरुणा ढेरे यांनी या पदाची शोभा वाढवली होती. त्यांनी कुठल्याही निवडणुकीत भाग घ्यायला नकार दिला होता, मात्र सर्वानुमते त्यांची निवड करण्यात आली होती. या सर्वानुमते झालेल्या निवडीला किमान चार-पाच वर्षांची एक विशिष्ट पार्श्वभूमी आहे. निवडणुकीच्या माध्यमातून या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवडले जात होते. यात मोठे राजकारण घडत असे. वरवर पाहाता, ही प्रक्रिया लोकशाहीला धरून वाटत असली, तरी कंपूशाहीच्या आधारावरच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडी झाल्या होत्या. याची मते त्याला, त्याची मते याला अशी ही फिरवाफिरवी होती.या प्रकियेतून जे नग निवडून आले
, ते एकाला झाकावा आणि दुसर्‍याला काढावा असेच होते. श्रीपाल सबनीस नावाचे महाशय त्यांच्या कसदार साहित्यापेक्षा त्यांनी केलेल्या चित्रविचित्र राजकीय विधानांमुळेच गाजले. अधेमधे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठांवरही महाशय झळकत होते. त्यामुळे साहित्य संमेलनाची ही गाय कोणत्या राजकीय पक्षाच्या गोठ्यात नेऊन बांधण्यात आली होती, हे अगदी स्पष्ट होते. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा उपयोग राजकीय कारणांसाठी केला जातोय, याची पुरेपुर चुणूक येत होती. खर्‍या साहित्य रसिकांनी या संमेलनाकडे फिरविलेली पाठ ही त्यातली अजून एक चिंतेची बाब. यामुळेच साहित्य संमेलनाला गेल्या वर्षी डॉ. अरुणा ढेरेंच्या निमित्ताने नवसंजीवनी मिळाली. त्यांच्या या निवडीचे वर्णन करताना आम्ही ‘नवनवोन्मेषशालिनी’ नावाचा अग्रलेखही लिहिला होता.आणि यावर्षी एकदम फादरच अवतरले
! फादर दिब्रिटो यांचे मराठी साहित्यातले योगदान नाकारता येण्यासारखे नाही. ‘सामाजिक कार्यकर्ता’ म्हणूनही ते काही लोकांना भावतात. पर्यावरणाच्या कामाचा वसईतला चेहरा म्हणूनही ते ओळखले जातात. मात्र, त्याचा अर्थ त्यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष करून साहित्य रसिकांच्या माथी मारावे, असे मुळीच नाही. मुळात फादरची साहित्यसंपदा ही ख्रिस्ती धर्मासंबंधीची आहे. काही ललित लेखनही त्यांनी केले आहे. साहित्यिकांकडून मूल्यांची निर्मिती होत असते. ती मूल्ये समाजाला दिशा दाखविण्याचे काम करतात. तटस्थपणे ही मूल्ये मांडण्याचा प्रयत्न फादरनी केला का? या प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला, तर त्याचे उत्तर ठामपणे देता येणार नाही. ते एका विशिष्ट धर्माचे अधिकृत प्रतिनिधी आहेत, धर्माचे काम ते करतात. फादर तोंडाने मानवतेचे प्रवचन झोडत राहतात. मात्र, केरळमध्ये नन्सच्या बाबतीत जे काही अत्याचार झाले, त्यावर त्यांनी चकार शब्द काढलेला नाही. निसर्गाबाबतचे आविष्कार त्यांनी मांडले, पण जगभरातल्या निसर्गपूजक जमातींचे चर्चने काय केले, ते त्यांनी सांगितले नाही. साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे विवेकाचे व्यासपीठ. या व्यासपीठावर व्हीलचेअरवर बसून त्यांनी जे प्रवचन झोडले, ते कुठलाही नवा पाद्री आपल्या धर्मातले ज्ञान, निरनिराळे प्रसंग सांगत करतो तसेच होते. चमत्कारांवर ख्रिश्चनांचा ‘धर्म’ म्हणून अधिकृत विश्वास आहे. तसे केल्याने इथे संतपदही मिळते.फादरनी असाच चमत्कार करून दाखवायचा प्रयत्न केला
. “देश हिटलशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे,” असे विधान त्यांनी केले. आता कोण हिटलर? कुठला उंबरठा? फादर काय बरळून गेले, त्यांचे त्यांनाच माहीत! असे विधान करून ढोंगी पुरोगाम्यांचे ‘संतपद’ त्यांनी नक्कीच मिळविले. मात्र, खर्‍या साहित्यप्रेमींची मात्र घोर निराशा केली. डॉ. अरुणा ढेरे यांनी या सार्‍या विधानाबद्दल रोखठोक भूमिका घेतली. वस्तुत: फादरना ‘ख्रिस्ती’ म्हणूनही या संमेलनात मांडण्यासारखे बरेच होते. धर्मांतरित होऊनही मराठीत साहित्याचे योगदान देणार्‍यांचे प्रमाण खूप मोठे आहे. तिथेही ‘प्रोटेस्टंट विरुद्ध कॅथलिक’ हा वाद आहेच. पण, त्यांचे मराठी भाषाविषयक साहित्यिक योगदान नाकारता येत नाही. फादरनी त्यांच्या साहित्यातला गोडवा जरी मांडला असता, तरी त्यांचे अध्यक्षपद फलद्रूप झाले असते. मात्र, कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे कुठल्या तरी इशार्‍यावर ते बोलत राहिले.दोन
-चार माजी साहित्य संमेलनाध्यक्षांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल काही निषेधाचे ठराव वगैरे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, संमेलनाचा स्वत:चा गोंधळच इतका होता की, हा गोंधळ त्यांना घालताच आला नाही. ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांनी या कायद्याच्या समर्थनार्थ जी चोख भूमिका घेतली, त्याबाबत त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. अशा खुज्या लोकांच्या गर्दीतही स्वत:चे आत्मभान जपणे खूप जिकिरीचे असते. त्यांच्या खुजेपणात आपले मोठेपणही झाकोळले जाते. डॉ. अरुणा ढेरे व प्रतिभा रानडे यांनी आपल्या विवेकाचा आवाज जागा ठेवला व बुलंद केला, यासाठी त्या सदैव स्मरणात राहतील. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाने गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनात मोठे गळे काढले गेले होते.यावर्षी काय झाले
? दै. ‘मुंबई तरुण भारत’चे पत्रकार सोमेश कोलगे व ‘झी’चे पत्रकार मुस्तान मिर्झा यांना धक्काबुक्की झाली. धाराशिवच्या एका गावगन्ना पुढार्‍याने संतसाहित्याच्या परिसंवादाच्या वेळी खाजगी बाऊन्सर आणले होते. दारू पिऊन झिंगलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी या बाऊन्सरचा उपयोग होतो. आता परिसंवादात कुणी वेगळा सूर लावला, तर त्याचे हे लोक काय करणार होते, त्याचीच ही प्रचिती होती. दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्याबाबत आवाज उठवला. इतके होऊनही ‘अभिव्यक्ती’च्या नावाने गळे काढणार्‍या कुणीही याबाबत अद्याप तरी चकार शब्द काढलेला नाही. पत्रकार डावा असला आणि त्याच्यावर हल्ला करणारा सोईचा असला की, पत्रकारांच्या डाव्या संघटना लगेचच रस्त्यावर उतरतात. मात्र, इथे असे काहीही घडले नाही. त्यामुळे सगळे चिडीचूप आहे.साहित्य संमेलनाच्या आम्ही विरोधात नाही
. फादर दिब्रिटोंची नियुक्ती झाली, तेव्हा काही अपेक्षा व्यक्त करीत आम्ही त्यांचे अभिनंदनच केले होते. विवेकाचा आवाज बुलंद राहावा, एवढीच आमची माफक अपेक्षा होती. मात्र, फादर त्या अपेक्षांवरही खरे उतरू शकले नाहीत. ग्रंथदिंडीला दांडी मारून त्यांनी या परंपरेचा उपमर्द केलाच. आता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते वर्षभर ठिकठिकाणी प्रवचने झोडत फिरणार आहेत. त्यात तरी त्यांनी केरळमधील नन्सवर झालेले अन्याय आदी विषयांना वाचा फोडावी.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.