येथे ओशाळले अभिव्यक्तिस्वातंत्र्य...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2020
Total Views |

ag_1  H x W: 0


सोमेश कोलगे यांच्या अटकेचे प्रयत्न आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे सुमार भाषण याव्यतिरिक्त या साहित्य संमेलनात काय घडले, हा मोठा प्रश्नच आहे.


धाराशिव येथे ९३वे साहित्य संमेलन सुरू झाले. साहित्य संमेलन म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांपैकी एक महत्त्वाचा असा शारदीय उत्सव. निरनिराळ्या भाषाप्रभूंनी, साहित्यिकांनी या ठिकाणी आपल्या विचारांचा ठसा उमटविला व पैसा व सत्ता हेच केवळ समाज संचालनाचे महत्त्वाचे घटक नसून साहित्यिकालाही सृजनाचा निर्माता म्हणून महत्त्व आहे, हे सांगणारा हा महोत्सव. साहित्य संमेलनाच्या आयोजनावर गेली अनेक वर्षे कोणत्या ना कोणत्या वादाचे सावट राहिले आहे. यावर्षी हा वाद वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि त्याचा थेट संबंध दै. ‘मुंबई तरुण भारत’शी आहे. दै. ‘मुंबई तरुण भारत’ची टीम साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वार्तांकनासाठी गेली होती. दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. उपस्थितांनी हा प्रयत्न हाणून पाडला व पोलिसांना अटकेचे कारणही विचारायचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी त्याचे योग्य उत्तर दिले नाही. हा सगळा प्रकार छायाचित्रित केला जात असल्याने एरव्ही वापरल्या जाणार्‍या बळाचा वापर पोलिसांना करता आला नाही. विचारांच्या लढाईत उतरलेल्या व्यक्ती व संघटनांसाठी असे प्रसंग नवे नाहीत. हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद यांसारख्या विचारांची कास धरलेल्या मंडळींच्या अभिव्यक्तीची कदर आजही केली जात नाही. आज कष्टाने उभी केलेली आपली डिजिटल माध्यमे हातात असल्याने झाला प्रकार डिजिटल माध्यमांवर टाकून सर्वदूर पोहोचविता आला. कारण, अभिव्यक्ती, उदारमतवाद अशा प्रकारच्या शब्दांची रेलचेल करणार्‍या मंडळींकडून अशा प्रकारच्या अपेक्षा ठेवणे सर्वथा चुकीचेच. सकाळी हा घटनाक्रम होऊनही अद्याप माध्यमांच्या जगतातल्या कुणीही त्यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ख्रिस्ती धर्मगुरू फादर दिब्रिटो यांनी आपले जे भाषण केले
, ते त्यांच्या प्रकृतीला साजेसेच होते. गेल्या वर्षीची डॉ. अरुणा ढेरेंची निवड सोडली, तर यापूर्वी जे संमेलनाध्यक्ष झाले, त्यांच्याच वकूबाला साजेसे भाषण त्यांनी केले. आम्हाला अभिव्यक्तीची ऐश उपलब्ध नसली तरी त्यांना ती आहे, त्यामुळे त्यांनी जे भाषण केले, त्याचे स्वातंत्र्य त्यांना असलेच पाहिजे.


मात्र
, त्यांनी केलेल्या भाषणातल्या विसंगती पत्रकार म्हणून दुर्लक्षिता येत नाहीत. देशभरात चाललेल्या विविध घटनांचा ऊहापोह एका विशिष्ट दृष्टिकोनातून त्यांनी केला. जेएनयुच्या घटनेचा उल्लेख त्यांनी ‘निर्घृण’ असा केला. “आमच्या मुलांच्या डोक्यात काठ्या घातल्या जात असताना आम्ही गप्प कसे बसायचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरं तर कुठल्याही ख्रिस्ती धर्मप्रसारकाने हा शब्दही उच्चारायला संकोचावे, असे या धर्माचे या देशातच नव्हे, तर सर्वत्र काम आहे. ख्रिस्ती धर्माच्या लोकांनी ख्रिस्ती होण्यास नकार दिलेल्या लोकांचे काय केले, याची साक्ष देणारा ‘इन्क्विझिशन पोल’ आजही गोव्यात उभा आहे. आपल्यापर्यंत येणार्‍या आक्रमकांची वर्णने टाळणार्‍या मंडळींवर टीका करताना त्यांनी मूलतत्त्वज्ञांना इशारा देण्याचा आव आणला. मुळात ज्या ज्यूंची उदाहरणे त्यांनी दिली, त्या ज्यूंवर अत्याचार करण्याचे उद्योग जगभर कोणी केले? या साहित्य संमेलनातच त्यांनी त्यांची माहिती दिली असती तर बरे झाले असते. ख्रिस्त्यांनी ज्यूंना कसे छळले, याची मोठी यादीच तयार होऊ शकते आणि ती ख्रिस्ती धर्म व राजसत्ता पुरस्कृतच होती, हे ध्यानात घेतले पाहिजे. रात्री तोडल्या गेलेल्या आरेतील झाडांचा दाखला त्यांनी दिला. हे कसे अमानुष आहे, हेदेखील त्यांनी सांगितले. यावर फादरनी बोलणे अपेक्षितच होते, कारण या सार्‍या आंदोलनाच्या मागे दडलेला त्यांचा ख्रिस्ती चेहरा समोर आला. एरव्ही या देशातल्या कुठल्याही प्रश्नावर भाष्य न करणार्‍या चर्चने यावेळी आपल्या प्रार्थना संदेशांच्या फलकांवर ‘सेव्ह आरे’चे फलक झळकावले होते. आंदोलनाच्या माध्यमातून लढाई चालविणारी मंडळी कुठल्या धर्माची होती? गोव्यापासून, वसईपर्यंत पर्यावरणाची लढाई कोणत्या बुरख्याखाली लढली जाते? फादर दिब्रिटो या प्रश्नांची उत्तरे देणार आहेत का?


सांस्कृतिक खात्याने साहित्य संमेलनाच्या भाषणांचे पुस्तक प्रकाशित करावे
, असे आवाहन त्यांनी व्यासपीठावरून केले. गेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी या राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. तेच पुन्हा येईल याची खात्री दिसत होती. त्यामुळे यापुढे राजकीय पक्षाच्या मंडळींना आपल्या व्यासपीठावर बसू न देण्याचा निर्णय साहित्य परिषदेने घेतला. वर्षानुवर्षे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर शरद पवार विराजमान होत आले आहेत. त्यावेळी ही ‘बिगर राजकीय’ भूमिका कुणालाच आठवली नाही. मूळ मुद्दा हा साहित्य संमेलनाच्या स्वायत्ततेचा आहे. परिषदेने राजकारणी नाकारले, मात्र सरकार बदलण्याआधी संमेलनाच्या खर्चाचे पैसे मात्र स्वीकारले होते. हा शुद्ध दांभिकपणा आहे. आपल्या भाषणात फादर दिब्रिटो यांनी भरपूर उसनवारी केली. नव्या लेखकांची होणारी फसवणूक हा मुद्दा त्यांनी हजर केला. आता या साहित्य संमेलनाची शिखर संस्था असलेल्या साहित्य परिषदेने कोणत्या प्रकारच्या नव्या साहित्यिकांना जागा मोकळी करून दिली आहे, ते सांगावे. ठाले पाटलांचे ‘कौतिक’ इतकी वर्षे चालू आहे की, एखाद्या संस्थेत एखादा माणूस कसा काय, इतकी वर्षे सर्व सूत्रे स्वत:च्या ताब्यात ठेवू शकतो, असा प्रश्न कुणालाही पडावा. विंदा करंदीकरांच्या ‘तेच ते नी तेच ते’ या कवितेनुसार ‘तेच ठाले पाटील आणि त्यांच्यामागून कुजबुजणारे तेच ते सुमार साहित्यिक’ असे या साहित्य संमेलनाचे स्वरूप होऊन बसले आहे. मात्र, यावर चकार शब्द काढण्याची कुणाचीही इच्छा नाही. पुन्हा यातले आतले-बाहेरचे असे राजकारण निराळेच आहे. त्यावर कुठल्याच साहित्यिकाने चकार शब्द काढलेला नाही.


साहित्याने मूल्ये प्रसवावीत आणि साहित्यिकांनी ती समाजात रूजवावीत
, असा हा साधा सोपा मामला आहे. मात्र, इथे चाललेले मानापमान पाहिले की कसले काय, असाच प्रश्न पडावा. एकंदरीतच काय तर साहित्य संमेलनाचे सूप वाजेपर्यंत आता दोन दिवस हे सगळे गोंधळ सुरू राहणार. व्हीलचेअरवर आलेले हे अध्यक्ष पूर्णवेळ साहित्य संमेलनाला थांबतील, अशी काही चिन्हे त्यांच्या भाषणातून तरी दिसलेली नाहीत. त्यामुळे दरवर्षी येणार्‍या पावसाळ्याप्रमाणेच हे साहित्य संमेलनही पार पडेल, असे म्हणावे लागेल.

@@AUTHORINFO_V1@@