प्रेरणा : राष्ट्र सेविका समितीची

    01-Jan-2020
Total Views |

dd_1  H x W: 0राष्ट्र सेविका समितीची रत्नागिरीची मी कार्यकर्ती आहे. त्यामुळेच होय! त्यामुळेच कोणताही सामाजिक प्रश्न मला ‘माझा’च वाटतो. तो कसा सोडवावा, यासाठी प्रयत्न करायचेच, हे आपसूक ठरते. रत्नागिरीमध्ये राष्ट्र सेविका समितीच्या विचारांचे आणि आदर्शांचे जागरण करताना अनेक सामाजिक उपक्रम सुरू केले. त्याविषयी थोडक्यात...


आधी सांगितल्याप्रमाणे मी रत्नागिरीला राहते. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरीला होते आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. कथा, कविता, लेख वगैरे लिहिण्यात मन रमते. कथा, कविता, साहित्य यात जरी जीव गुंतला असला तरीसुद्धा जगणे समृद्ध केले ते राष्ट्र सेविका समितीने. माणूस म्हणून जगताना मानवी आयुष्यात अनेक प्रश्न निर्माण होतात. समाजातही अनेक प्रश्न उभे राहत असतातच. या सगळ्या प्रश्नांना पुरून उरण्याचे सामर्थ्य दिले, ते ‘राष्ट्र सेविका समिती’ने. ‘राष्ट्र सेविका समिती’ ही वंदनीय मावशी केळकर यांनी १९३६ मध्ये वर्धा येथे स्थापित केली. त्यांचे ध्येय अखिल हिंदू महिलांचे संघटन करून तेजस्वी राष्ट्र निर्माण करणे. तसेच राष्ट्रमाता जिजाबाई या मातृत्वासाठी, झाशीची राणी या नेतृत्वासाठी आणि अहिल्याबाई होळकर या कर्तृत्वासाठी आदर्श होत्या आणि आजही आहेत. या आदर्शांचे लख्ख जागरण समाजात व्हायलाच हवे. या आदर्शानुसार, समाजात महिलांचे एकत्रिकीकरण व्हायलाच हवे म्हणून मग रत्नकोंदण कार्यक्रम सुरू केला. रत्न हे अमूल्य असते. पण कोंदणाने त्याची शोभा आणि सुरक्षा कितीतरी पटीने वाढते. आम्हा स्त्रियांचेही तसेच आहे नाही का? आम्ही अद्भूत शक्तीच्या रत्न आहोत, पण समाज कोंदणाने, कुटुंब कोंदणाने, संस्कार कोंदणाने आमची शक्ती, आमचे अस्तित्त्व आणखीन देदीप्यमान होते.


dd_1  H x W: 0


तर मी गेले काही वर्षे ‘रत्नकोंदण’ हा कार्यक्रम करते. या अंतर्गत महिला एकत्रिकीकरण करणे हाच उद्देश आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांच्या विविध प्रश्नांवर जागरण केले जाते. मागे एका कार्यक्रमामध्ये देशसेवा आणि सुरक्षा करणार्‍या लष्करी आणि सैनिकी अधिकार्‍यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. देशरक्षण, त्यामध्ये आपले कर्तव्य, तसेच देशरक्षणासाठी समाजात राहून आपण काय करू शकतो? कुणा भगिनीला लष्कर किंवा नौदलात जायचे असेल तर त्यासाठी काय प्रक्रिया आहे, यावर मार्गदर्शन केले गेले. ‘विवेक-विचार’अंतर्गत स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे महत्त्व महिलांना सांगितले जाते. स्वामी विवेकांनदांचे धर्म, संस्कृती, समाज देश यावरचे विचार म्हणजे भारतीय समाजासाठीचे विचार अमृत आहे. ते विचार महिलाशक्तींनीही जाणून घ्यावेत हा यामागील उद्देश. स्वामी विवेकानंदांचे विचार बंधू आणि भगिनींनी जाणून घेतले.

 


dd_1  H x W: 0


‘त्रिधारा’अंतर्गत दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती रुपातील स्त्रियांचा सत्कार आणि त्यांची माहिती जाणून घेतली. दुर्गारुपात महिला पोलीस इन्स्पेक्टर तसेच नौदलातील महिला ऑफिसर यांना तर सरस्वती रुपातल्या संस्कृत भाषेतील सुवर्णपदक मिळवणारी विद्यार्थिनी, तसेच लक्ष्मीरुपात उद्योजिका अशा महिलांचा सत्कार केला गेला. महिलांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून महिलांच्या समस्यांवर चर्चा घडवून आणली. त्यात वकील डॉक्टर आणि ऑफिसर अशा विविध क्षेत्रातील महिलांचा समावेश होता. आता लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने अनेक कार्यक्रम सुरू आहेत. दि. ५ फेब्रुवारीला शोभायात्रा आहे. शिवाय येथील रिमांड होममधल्या मुलांना दर रविवारी भेटायला जाणे, त्यांच्या वर उत्तम संस्कार होण्यासाठी त्यांना गोष्टी, गाणी, श्लोक शिकवणे आणि त्यांना अभ्यासात मदत करणे वगैरे करत असतो. तिथे जाऊन खाणे बनवून आम्ही तिथल्या मुलांना मातृहस्तेन भोजनाचा आनंद दिला. अर्थात, या कार्यात सगळ्या सेविका सहभागी असतात. त्यांच्या ग्रंथालयासाठी विविध उपयोगी पुस्तके मी भेट म्हणून दिली. दिवाळीच्या वेळी खाऊ आणि भेट देणे वगैरे... अनेक उपक्रम चालू असतात. रक्षाबंधनाच्या वेळी तिथे जाऊन मुलांना राखी बांधतो. अशी अनेक कामे सुरू असतात. मला आनंद आणि अभिमान आहे की, मी राष्ट्र सेविका समितीमधील एक सेविका आहे.

- सुनेत्रा जोशी