'खारी बिस्कीट' चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित

    दिनांक  09-Sep-2019 15:23:20


 

'दुनियादारी' सारखा एक मास्टरपीस प्रेक्षकांसमोर सादर करणारा प्रसिद्ध दिग्दर्शक म्हणून संजय जाधव सर्वांना परिचित आहे. 'खारी बिस्कीट' या त्याच्या आगामी चित्रपटाबरोबरच त्याची ५० वी कलाकृती प्रेक्षकांसमोर येत आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाने भारावलेली आणि उत्साहात, आनंदाने नाचणारी चिमुकल्यांची गॅंग दिसत आहे. त्यांच्यामागे मुंबईतील उंच इमारती आणि गजबजलेले शहर देखील दिसत आहे. मात्र, ही लहान मुले भान हरपून पावसात भिजत बाप्पाच्या स्वागतात मग्न आहेत, असे दिसत आहे.

मुंबई हे स्वप्नपूर्तीचे शहर आहे आणि याच शहरात बऱ्याच ठिकाणाहून लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात. अशाच या भव्य दिव्य शहरात फुटपाथवर आयुष्य काढणाऱ्या बहीणभावाची ही गोष्ट आहे. भाऊ बिस्कीट आपली बहीण खारी हिची स्वप्न कशी पूर्ण करतो, त्यांच्यातले भावनिक नाते याची गोष्ट या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळेल.

त्यामुळे या चित्रपटामध्ये काहीतरी खास असणार हे नक्कीच. विशेष म्हणजे या चित्रपटात नवीन बालकलाकार काम करणार आहेत. त्यापैकी वेदश्री खाडिलकर आणि आदर्श कदम या चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. आता त्यांचा या पुढील प्रवास कसा असेल, हे पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरेल.