पाकड्यांची भारताविरोधात मोठ्या षडयंत्राची तयारी : मसूद अजहरची तुरुंगातून सुटका

    दिनांक  09-Sep-2019 11:14:33नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रात 'आंतरराष्ट्रीय दहशतवादी' म्हणून घोषित केलेल्या मसूद अझहरची पाकिस्तानने कैदेतून सुटका केली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थाननजीक सीमावर्ती भागातील सैनिकांना दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. भारताविरोधात एका मोठ्या षड्यंत्राची तयारी पाकिस्तान करत असून यासाठीच मसूद अझहरची सुटका करण्यात आल्याचे म्हटले आहे. ही माहिती उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान सियालकोट-जम्मू आणि राजस्थान आदी भागांत येत्या काळात मोठ्या हल्ल्याची तयारी करत आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून या ना त्या मार्गाने कुरापती सुरूच आहेत. त्यासाठी राजस्थाननजीक भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

या भागातील सैनिकी तुकड्यांना पाकिस्तानच्या दिशेने होणाऱ्या कोणत्याही हालचालींकडे बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय जवानांनाही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान यांनी जम्मू- काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्द्ल चिथावणीखोर वक्तव्य केले होते. भारताला याचे उत्तर देऊ, अशी धमकीही त्यांनी दिली होती. पाकिस्तानला युद्ध नको आहे मात्र, आम्ही शत्रूला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहोत, असे वक्तव्य त्याने केले होते. त्यापूर्वी पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल कमर बाजवा यांनी पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो, अशी धमकी दिली होती.

 

मसूदची सुटका केल्यानंतर 'जैश-ए-मोहम्मद' ही दहशतवादी संघटना उजळ माथ्याने भारताविरोधात षड्यंत्र रचत आहे. भारताविरोधात पुन्हा एकदा भ्याड हल्ल्याच्या तयारीत आहे. जम्मू- काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर मसूदला पाकिस्तानने अटक केली होती. मात्र, त्याच्या सुटकेने पुन्हा एकदा 'जैश' सक्रिय होणार असल्याचा अलर्ट गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.