खांदा मोदींचा होता म्हणून...

    दिनांक  08-Sep-2019 21:42:22


 

 
‘विक्रम लँडर’शी संपर्क तुटल्याने निराश झालेल्या के. सिवन यांची अवस्था पाहून नरेंद्र मोदींनी त्यांना धीर दिला व सिवन यांनीही मोदींच्या खांद्याचा आधार घेतला. परंतु, मोदीद्वेषाचा वसा घेतलेल्यांनी यावरुनही गळे काढायला सुरुवात केली. के. सिवन यांचे माणूसपण, त्यांच्या मानवी संवेदना नाकारण्याचा उद्दामपणाही त्यांनी केला.

 

सुमारे ११ वर्षांपासून दिवस-रात्र ‘चांद्रयान-२’ च्या यशस्वितेसाठी कष्ट उपसणार्‍या ‘इस्रो’साठी, वैज्ञानिकांसाठी आणि समस्त भारतीयांसाठी शुक्रवारची मध्यरात्र हृदयाचा ठोका चुकवणारी ठरली. भारताचे ‘चांद्रयान-२’ किंवा ‘विक्रम लँडर’ व ‘प्रज्ञान रोव्हर’ याच दिवशी चंद्राला स्पर्श करणार होते-चंद्राच्या पृष्ठभागावर उतरून अभ्यासाला सुरुवात करणार होते. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील इस्रोची ध्येयपूर्ती अनुभवण्यासाठी, वैज्ञानिकांचे कौतुक करण्यासाठी ‘इस्रो’ मुख्यालयात उपस्थित होते. तत्पूर्वी जुलैच्या २२ तारखेला ‘चांद्रयान-२’ पहिल्यांदा चंद्राच्या दिशेने झेपावले व नंतर एक एक टप्पा पार करत चंद्राजवळ पोहोचले. ‘चांद्रयान-२’च्या ‘ऑर्बिटर’, ‘विक्रम लँडर’ आणि ‘प्रज्ञान रोव्हर’पैकी ‘विक्रम लँडर’ परवाच्या रात्री चंद्राच्या आतापर्यंत ज्या पृष्ठभागावर कोणीही गेले नाही, त्या दक्षिण ध्रुवावर उतरणार होते. तिथून पुढे त्यापासून ‘प्रज्ञान रोव्हर’ वेगळे होऊन चंद्रावर चालणार, फिरणार होते. परंतु, चंद्रापासून केवळ २.१ किमी अंतरावर येताच ‘विक्रम लँडर’चा ‘इस्रो’च्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. तद्नंतर ‘इस्रो’च्या अभूतपूर्व यशाचे साक्षीदार होण्याची आतुरतेने वाट पाहणार्‍या तमाम भारतीयांच्या चेहर्‍यावर एक निराशेची उदासवाणी छाया दाटली. भारताच्या-‘विक्रम लँडर’ आणि ‘प्रज्ञान रोव्हर’च्या चंद्रावरील पहिले ठसे पाहण्याचा क्षण न् क्षण डोळ्यांत साठवण्यासाठी मोठ्या औत्सुक्याने रात्रभर जागलेल्या कोट्यवधी देशवासीयांसाठी हा धक्का होता. “प्रज्ञान रोव्हर ज्यावेळी चंद्रावर दुडूदुडू धावण्यासाठी-फेरफटका मारण्यासाठी उतरले त्यावेळी आम्ही त्या अद्भुत क्षणाला प्रत्यक्षात पाहिले,” असे भावी पिढ्यांना सांगण्यासाठी आसुसलेल्यांना दुःख, वेदना, पीडा देणारी ती वेळ होती. मात्र, ‘विक्रम लँडर’ शी संपर्क तुटल्याचे ‘इस्रो’ प्रमुख के. सिवन यांनी जाहीर केले, तेव्हा भारतीयांच्या चेहर्‍यावर जसे निरुत्साहाचे भाव पाहायला मिळाले तसेच ‘इस्रो’च्या अथक परिश्रम, प्रतिभेचा संपूर्ण देशाला अभिमानही वाटला. परिणामी, सर्वांनीच तत्काळ ‘इस्रो’चे अभिनंदन करत-शुभेच्छा देत ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत’ची ग्वाही द्यायलाही सुरुवात केली. समाजमाध्यमांवर ‘इस्रो’च्या समर्थनासाठी प्रत्येकजण अभिव्यक्त होऊ लागला, सकारात्मक पाठिंबा देऊ लागला. तसेच ‘विक्रम लँडर’शी लवकरात लवकर संपर्क व्हावा, अशा प्रार्थनाही अनेकांनी केल्या.

 

विज्ञानाचे सर्वांत मोठे सौंदर्य म्हणजे पराभव मान्य न करता ते यशस्वी होण्यापर्यंतचे प्रयत्न निरंतर करत राहते. अपयश वा पराजयासमोर विज्ञान कधीही गुडघे टेकत नाही, ना त्याची उद्दिष्टाप्रतिची आसक्ती कमी होते. एका न पाहिलेल्या, माहिती नसलेल्या अज्ञात लक्ष्याकडे पुढे जाणारे विज्ञान हेच शिकवते. सतत प्रवास करणे आणि झटणे, हीच विज्ञानाची परिभाषा आहे. इथली जनता विज्ञानवादी किंवा विज्ञाननिष्ठ नाही, असे म्हणणार्‍यांना ‘इस्रो’साठी लिहिलेल्या संदेशांतून, चारोळ्यांतून भारतीयांनी विज्ञानाचा हा महत्त्वाचा नियमच सांगितला. इतकेच नव्हे तर जगानेही ‘इस्रो’च्या चांद्रमोहिमेवर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या. अमेरिकेच्या ‘नासा’ने ‘इस्रो’ची प्रशंसा करत परस्पर सहयोगाने पुढे काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. संयुक्त अरब अमिराती व ऑस्ट्रेलियाच्या अवकाश संस्थेने, भूतानचे पंतप्रधान डॉ. लोत्ये त्शेरिंग, इस्रायलचे भारतातील राजदूत, मालदीवचे अध्यक्ष इब्राहिम सोलीह, श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपक्षे, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुग्नौथ व आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांनीही ‘इस्रो’च्या कामगिरीची वाहव्वा केली. परंतु, ‘विक्रम लँडर’च्या संपर्क तुटण्याने पाकिस्तान्यांसह देशातल्या विशिष्ट गोटातल्यांना आनंदही झाला. बहुसंख्यांनी ‘चांद्रयान-२’च्या आधी ‘इस्रो’ने केलेल्या पूजा-अर्चनेला दोष दिला (पण मोहीम यशस्वी झाली असती तर त्यांनी पूजा-अर्चनेला श्रेय दिले असते का?) तर द्वेषाचाच वसा घेतलेल्यांनी नरेंद्र मोदींच्या ‘इस्रो’ मुख्यालयातील उपस्थितीमुळेच ‘विक्रम लँडर’शी संपर्क तुटल्याचे तारे तोडले. अर्थात तर्कहीन गोष्टींतच बागडणारे निर्बुद्धजन असला बेतालपणा करणारच, यात कसलीही शंका नाही. हे एका बाजूला तर दुसर्‍या बाजूला एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनाच चढ्या आवाजात जाब विचारण्याचा उद्योग केला. ‘इस्रो’प्रमुख के. सिवन पत्रकार परिषदेला का सामोरे येत नाही?, कनिष्ठ वैज्ञानिकांना का पाठवले?, असा सवाल त्याने माईक नाचवत केला. आपल्याकडे माध्यम आहे म्हणून वैज्ञानिकांशीही बेमुर्वतपणे वागणार्‍या या प्रतिनिधीवर नंतर टीकेचा भडिमारही झाला. आपण केलेल्या उठाठेवी अडचणीच्या ठरू लागल्याचे पाहून नंतर त्याने माफीही मागितली. परंतु, ज्यांनी ‘चांद्रयान-२’ मोहिमेची जबाबदारी प्रारंभापासून आजपर्यंत वाहिली, त्यांच्याबद्दल अरेरावीची भाषा वापरणे, हा अशोभनीय मुजोरपणाच होता. म्हणूनच माफी मागितली तरी संबंधितांची वृत्ती तीच राहणार, त्यात बदल होण्याची शक्यता नाही. कारण त्यांच्या व त्यांच्या मालकांनी नंतर दिलेल्या स्पष्टीकरणावरून तरी हेच अधोरेखित होते.

 

‘चांद्रयान-२’च्या संबंधाने जो जो घटनाक्रम समोर आला, त्यात विरोधकांच्या जळकटपणाला अधिक ठळक करणारा प्रसंग ठरला तो मोदी-सिवन गळाभेटीचा! अतिशय कमी खर्चात साकारलेल्या ‘चांद्रयान-२’ मोहिमेकडे सर्वच भारतीय आशेने पाहत होते. कधीकाळी जगातल्या विकसित देशांनी तंत्रज्ञान देण्याचे नाकारलेल्या आणि एकेकाळी सायकलवरून, बैलगाडीतून उपग्रह प्रक्षेपणस्थळी घेऊन जाणार्‍या ‘इस्रो’ने चंद्राला गवसणी घालण्याचा पराक्रम ऐतिहासिकच होता. परंतु, ‘विक्रम लँडर’च्या असंपर्कामुळे ‘चांद्रयान-२’ मोहीम डागाळल्याची भावना ‘इस्रो’प्रमुखांच्या मनी जागली व ती अश्रूरूपाने वाहूही लागली. त्यात आतापर्यंत सच्च्या दिलाने, वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीला इच्छित फळ न मिळाल्याची आणि देशाच्या अपेक्षांवर खरे न उतरल्याची रुखरुखही होती. पुढे अपयशाने निराश झालेल्या के. सिवन यांची अवस्था पाहून नरेंद्र मोदींनी त्यांना धीर दिला व सिवन यांनीही मोदींच्या खांद्याचा आधार घेतला. कोणत्याही संवेदनशील माणसाचे हृदय हेलावून टाकणारा भावोत्कट असा हा क्षण होता. भारतासह जगभरातील कोणीही मौन अभिव्यक्तीचे हे चित्र कधी पाहिले नसेल व ही गळाभेट घनघोर अंधारछायेत फसलेल्या कोणालाही संजीवनीसारखीच ठरली. मात्र, बुद्धीच्या वाळवीने मेंदू पोखरलेल्या महाभागांनी सिवन यांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह लावले तसेच आपला मोदीविरोधाचा कंडही भागवला. मोदीद्वेषाने पिसाळलेल्यांनी के. सिवन वैज्ञानिक असल्याने त्यांचे माणूसपण नाकारण्याचा उद्दामपणाही करून पाहिला. शेकडो निरपराधांचे बळी घेणार्‍या दहशतवाद्यांच्या मानवी हक्कांवरून गळे काढणार्‍यांना मोदी-सिवन यांच्या मानवी संवेदनाही असह्य झाल्या. आपले वय, शिक्षण, पात्रता विसरून ‘इस्रो’प्रमुखांना ज्ञान पाजळण्याचे औद्धत्यही या मंडळींनी केले. अर्थात डोक्यावर विविधरंगी टोप्या चढवून विरोधासाठी विरोध करणार्‍यांना एखाद्या कर्तबगाराची तळमळ आणि तपस्या ती कशी कळणार? पेल्यावर पेले रिचवून मंदाडपणे बडबडणार्‍यांना तास न् तास पाहिलेल्या स्वप्नांचा भंग झाल्याच्या यातना काय समजणार? डेटा-नेट मोफत मिळते म्हणून समाजमाध्यमांवर काहीबाही खरडणार्‍या फुकटेश्वरांना कार्यमग्नतेचे मूल्य कसे लक्षात येणार? दुसरीकडे ज्यावेळी राजकीय नेतेमंडळी यशाचे श्रेय घेऊ इच्छितात, त्यावेळी मोदींनी केवळ यशच नव्हे तर अपयशाच्या मागेही उभे राहण्याचे धाडस दाखवले. आपण ‘इस्रो’च्या यशाचा उत्सव करू शकतो तर अपयशाचे वाटेकरी होण्याचे दायित्वही घेऊ शकतो, ते निभाऊ शकतो, हे मोदींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आणि अशा बिकटसमयी राष्ट्रप्रमुखाचेही हेच कर्तव्य असते-होते.

 

गेले दोन दिवस या विषयावरून धुरळा उडालेला असतानाच रविवारी मात्र एक आनंदवार्ताही ‘इस्रो’ने देशवासीयांना दिली. संपर्क तुटलेल्या ‘विक्रम लँडर’चा पत्ता लावण्यात यश आल्याचे आणि चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणार्‍या ‘ऑर्बिटर’ने त्याची थर्मल छायाचित्रे टिपल्याचे के. सिवन यांनी सांगितले. सोबतच ‘विक्रम लँडर’शी संपर्क साधण्याचे प्रयत्न कसोशीने सुरू असल्याचेही ते म्हणाले. आतापर्यंत आपल्या डोक्यातली घाण शब्दरूपाने-वक्तृत्वरूपाने बाहेर काढणार्‍या भुक्तांच्या भुंकण्यावर मर्यादा घालणारीच ही घटना म्हटली पाहिजे. येत्या दोन-तीन दिवसांत ‘इस्रो’ला ‘विक्रम लँडर’शी संपर्क साधण्यात यश येईल, अशी अपेक्षा मात्र आपण यातून करू शकतो. तसे झाले तर ‘चांद्रयान-२’, मोदी-सिवान गळाभेट, पूजा-अर्चना, आस्तिक-नास्तिक आदी विषयांवरून टकळी चालविणार्‍यांचा मूळव्याध उठला तर नक्कीच कोणाला नवल वाटणार नाही!