विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्रोला यश

08 Sep 2019 17:23:00




श्रीहरीकोटा
: चांद्रयान २ मोहिमेदरम्यान संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्रोला यश आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री चंद्राच्या पृष्ठापासून केवळ २.१ किमी अंतरावर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला होता. त्यानंतर आज त्याचे ठिकाण शोधण्यात इस्रोला यश आल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ.सिवन यांनी दिली. "विक्रम लँडरची ऑप्टिकल इमेज मिळवण्यात चांद्रयान २ ला यश आले आहे. लँडरशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न करत असून, त्यात आम्हाला लवकरच यश येईल असा विश्वास वाटतो." असे डॉ. के. सिवन म्हणाले.


विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठावर उतरविणे हा चांद्रयान २ मोहिमेतील महत्वाचा टप्पा होता. ७ तारखेला विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठावर उतरणे अपेक्षित होते परंतु चंद्रापासून अवघ्या २.१ किलोमीटर अंतरावर असताना विक्रम लँडरशी संपर्क तुटला. यामुळे शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशवासीय निराश झाले. परंतु एक दोन दिवसात इस्रो विक्रम लँडरचे ठिकाण शोधून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल असेही डॉ. सिवन यांनी सांगितले होते. ऑर्बिटरने विक्रम लँडरच्या थर्मल इमेज देखील पाठवल्या आहेत. ऑप्टिकल इमेजमधून विक्रम लँडरची कोणत्याही प्रकारची मोडतोड झाली नसल्याचेही दिसून आले आहे
, त्यामुळे आता जर पुन्हा त्याच्याशी संपर्क झाल्यास विक्रम लँडरला चंद्राच्या पृष्ठावर उतरविण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असेही डॉ. सिवन यांनी सांगितले. त्यामुळे भारतीय शास्त्रज्ञांसह देशवासीयांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

Powered By Sangraha 9.0