अनंत आमुची ध्येयासक्ती...

    दिनांक  08-Sep-2019 22:16:49   
 


केवळ 'चांद्रयान-२' नव्हे तर अशा अनेक मोहिमा लिलया पेलणार्‍या के. सिवन यांनी खचून न जाता पुन्हा जोमाने काम करण्याची ऊर्जा सहकार्‍यांना दिली. लाखो भारतीयांची मने जिंकणार्‍या या 'रॉकेट मॅन ऑफ इंडिया'विषयी...

 

'चांद्रयान-२'चे 'विक्रम लॅण्डिंग' पाहण्यासाठी अवघा देश टीव्हीसमोर बसून या घटनेचा साक्षीदार होणार होता. प्रत्येकजण हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवण्यासाठी उत्सुक होता. मात्र, शेवटच्या क्षणी 'विक्रम लँडर'चा संपर्क तुटला. प्रत्येकजण स्तब्ध झाला. 'इस्रो'च्या मुख्यालयातील एका व्यक्तीला याची उद्घोषणा करताना हुंदका अनावर झाला. ती व्यक्ती म्हणजे डॉ. कैलासवदीवू सीवन पिल्लई अर्थात 'रॉकेट मॅन ऑफ इंडिया' के. सीवन. अत्यंत साधी राहणी मात्र, अफाट कर्तृत्व असलेल्या माणसाला अवघ्या देशाने आपल्या हृदयात स्थान दिले. २०१८ मध्ये त्यांची नियुक्ती 'इस्रो'च्या अध्यक्षपदी झाली. दि. २२ जुलैपासून सुरू असलेली 'इस्रो'ची 'चांद्रयान-२' मोहीम आता आणखी १४ दिवस 'विक्रम लँडर'शी संपर्क करण्याचा प्रयत्न करणार आहे.

 

याशिवाय अन्य मोहिमांवरही 'इस्रो'चे काम सुरू आहे. पुढील वर्षी 'इस्रो' सूर्याकडेही झेप घेणार असून त्यासाठी 'आदित्य-एल-१' ही मोहीम आखण्यात आली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेबद्दल जे झाले त्यात भल्याभल्यांचा धीर सुटला असता. मात्र, के. सीवन यांनी याच दिवशी पुढील 'इस्रो'च्या मोहिमाही सांगितल्या. आपल्या या कृतीतून कोलंबसच्या गर्वगीतातील 'अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला' या ओळींची आठवण सार्‍यांना करून दिली. चांद्रयान मोहीम हा केवळ एक प्रकल्प आहे आणि तो ९५ टक्के यशस्वीही झाल्याचा दावा 'इस्रो'ने केला आहे. या यशाचे आणि अशा अनेक मोहिमांचे शिल्पकार म्हणून के. सीवन ओळखले जातात.

के. सीवन यांचा जन्म १४ एप्रिल, १९५७ रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यात सारकलविलई गावातला. आई-वडील शेतकरी असल्याने घरातील आर्थिक परिस्थितीही तशी बेताची त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबात पदवीधर होणारेही ते पहिलेच. त्यांचे वडील कैलासा वाडिवू हे आंबे विकण्याचा व्यवसाय करत. सीवन आणि वडील दोघेही सायकलवरून आंबे विकत. यातून आणि शेतीतून मिळालेल्या पैशातून त्यांचा उदरनिर्वाह चालत असे. शाळेचे शिक्षणही होते गेले. गावातील सरकारी शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात हुशार असणार्‍या सीवन यांना त्याकाळी मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांच्या भावंडांना शिक्षण पूर्ण करता आले नाही.

 

मात्र, सीवन यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना कसती जमीनही विकावी लागली. शाळेत असताना ना त्यांच्या पायात चप्पल असायचे, ना बूट, महाविद्यालयात जातानाही ते धोतर नेसून जात. 'एमआयटी'ला गेल्यावर त्यांनी पहिल्यांदा शर्ट आणि पॅण्ट वापरण्यास सुरुवात केल्याचे त्यांचे नातेवाईक सांगतात. अत्यंत हुशार असा हा विद्यार्थी ना कधी कोचिंग क्लासेसला गेला ना कोणत्याही खासगी शिकवणीला. त्यांचे संपूर्ण शिक्षण तामिळ माध्यमातून झाले. गणित विषयातून त्यांनी बी.एस्सीची पदवी पूर्ण केली. गणितात त्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले होते, असे त्यांचे नातेवाईक सांगतात. याच कारणामुळे घराजवळील महाविद्यालय निवडण्याचा विचार त्यांनी बदलला आणि १९८० मध्ये त्यांनी 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'तून 'एरोनॉटिकल इंजिनिअरिंग'ची पदवी घेतली.

 

त्यानंतर १९८२ मध्ये विषयातून 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स'मधून इंजिनिअरिंगचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. २००६ मध्ये 'मुंबई आयआयटी'तून 'एरोस्पेस इंजिनिअरिंग'ची पदवी मिळवली. २००६ मध्ये 'एरोस्पेस इंजिनिअरिंग' विषयातून पी.एचडी पूर्ण केली. त्यांच्या नावे अनेक संशोधनपत्रिका प्रसिद्ध आहेत. यापूर्वी १९८२ मध्ये 'पीएसएलव्ही' प्रकल्पातून आपली कारकिर्द सुरू केली होती. आज भारत अनेक देशांचे उपग्रह अंतराळात सोडत असल्याच्या यशाचे श्रेय त्यांनाही जाते. ते रॉकेट प्रक्षेपण आणि त्याचा मार्गनिरीक्षणाचे मानले जातात. 'पीएसएलव्ही'मध्ये त्यांनी नियोजन, रचना, एकात्मिकीकरण आणि निरीक्षण प्रक्रियेवर भर दिला.

 

सीवन यांच्या कार्याची दखल अनेक संस्था आणि व्यक्तींनी घेतली आहे. भारतासाठीच्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. १९९९ मध्ये 'हरि ओम आश्रम' प्रेरित 'डॉ. विक्रम साराभाई संशोधन पुरस्कार' २००७ मध्ये 'इस्रो मेरिट पुरस्कार' २०१४ मध्ये चेन्नईतील सत्यभामा विद्यापीठाकडून 'डॉक्टर ऑफ सायन्स' ही उपाधीही देण्यात आली. तसेच २०१५ मध्ये 'विक्रम साराभाई अंतराळ केंद्रा'चे संचालक म्हणून निवड झाली, तर २०१८ मध्ये 'इस्रो'च्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. 'क्रायोजेनिक इंजिन'च्या विकासातील त्यांचे योगदान मोठे मानले जाते. यामुळेच त्यांना 'रॉकेट मॅन ऑफ इंडिया' अशी ओळख मिळाली. त्यानंतर 'इस्रो'च्या 'जीएसएलव्ही' मोहिमेची धुराही त्यांच्यावर सोपवण्यात आली. चांद्रयानानंतर पुढे काय असे कुणी त्यांना विचारेल तर आम्ही आमची ध्येय आधीच ठरवली आहेत. ती पूर्ण करायची आहेत, भविष्यात समाजाच्या भल्यासाठी उपयोगी पडेल, असा उपग्रह भारतातर्फे सोडायचा आहे असेच ते नेहमी सांगतात. भारतीय संशोधन क्षेत्राला वेगळ्या उंचीवर ठेवणार्‍या या माणसाला दै. 'मुंबई तरुण भारत'तर्फे पुढील वाटचालीसाठी सदिच्छा...!