मराठी विश्वकोश ; प्रतिभावंतांनी रेखाटलेला विश्वासार्ह ज्ञानालेख

    दिनांक  08-Sep-2019 17:59:17मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हायला हवी, असे अनेकांना वाटते. विश्वकोश यात महत्त्वाची भूमिका निभावतो. मराठीमध्ये विश्वकोश निर्मितीचे काम १९६०च्या दशकापासून सुरु करण्यात आले असून आता आधुनिक युगानुसार त्यात बदलही होत आहेत. इंटरनेट, मोबाईल व अ‍ॅपच्या माध्यमातून आता विश्वकोश एका क्लिकवर आला आहे. जाणून घेऊया विश्वकोशाचा आजपर्यंतचा प्रवास आणि त्याची नव्या काळातली पावले...


कोशीय लेखन हे भाषेच्या अस्तित्वाचा प्रधान आणि मूलभूत पाया असते
. भाषेला मातृभाषा, लोकभाषा आणि व्यवहारभाषा म्हणून जे एक अस्तित्व असतं, ते अस्तित्व ज्ञानभाषा म्हणून परिवर्तित व्हायला कोशीय लेखनाचाच पाया लागतो. याच मुख्य प्रेरणेने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची उभारणी केली. मराठी विश्वकोश हा त्यातील एक बृहद् प्रकल्प होय. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या प्रकल्पांचे सारथ्य केले. मराठी माणसाला सर्वस्तरीय ज्ञान आणि माहिती मराठी भाषेतून मिळावी आणि त्यायोगे मराठी भाषा समृद्ध व्हावी, हा त्यामागे महत्त्वाचा उद्देश होता. १९६० च्या दशकापासून सुरू असणार्‍या या प्रकल्पाचे २० संहिता खंड प्रकाशित झाले आहेत. कोश वाङ्मयात अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सूचिखंडही प्रकाशित झाला आहे. या २० संहिता खंडांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानव्यविद्या या दोन विद्याशाखांमधील सर्व विषयांतील घटकांची माहिती देणारे १८ हजार ४२० लेख प्रकाशित झालेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच मानव्यविद्येतील अर्थशास्त्र, भूगोल, तत्त्वज्ञान, पाश्चिमात्त्य साहित्य या विषयांवरील लेखन लक्षात घेता हे मराठी भाषेच्या दृष्टीने झालेले अभूतपूर्व कार्य आहे. भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये ज्या २२ भाषांचा उल्लेख आहे, त्या भाषांत मराठी विश्वकोशासारखे सर्वसमावेशक, सर्वविषयक संग्राहक आणि परिभाषायुक्त कार्य झालेले नाही.

 

शब्दकोश आणि विश्वकोश हे कोशाचे दोन प्रकार. शब्दकोशात शब्दाचे अर्थनिर्णयन केले जाते, तर विश्वकोश घटकांची, स्थलांची, संकल्पनेची, व्यक्तींची, सिद्धांतांची माहिती पुरवितो. मराठी भाषेला शब्दकोशाची एक मोठी परंपरा आहे. प्राचीन संतवाङ्मयातील शब्दांचे अर्थनिर्णयन करणारे अनेक कोश उपलब्ध आहेत. शिवाय, श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशासारखा प्रकल्प मराठीचा मानबिंदू म्हणून विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच प्रकाशित केला आहे. मराठीतील कोशीय लेखनाची ही परंपरा लक्षात घेता ज्ञान-विज्ञानाच्या वैश्विक परिप्रेक्ष्यातून सर्वविषयक संग्राहक कोशनिर्मितीची गरज होती. तर्कतीर्थांनी ही बाब लक्षात घेऊन, वैश्विक स्तरावर मान्यताप्राप्त असणार्‍या ‘इनसायक्लोपीडिया ब्रिटानिका’ या कोशग्रंथाच्या धर्तीवर मराठी विश्वकोशाची निर्मिती केली आहे.

 

सर्वविषयक संग्राहक कोश तयार करण्यासाठी काही भाषिक आणि संदर्भ सामग्रीचे मोठे आव्हान त्या काळात होते. त्यामध्ये सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा प्रत्येक घटक अंतर्भूत करायचा होता. स्थापत्य अभियांत्रिकी, मानवी वैद्यक, रसायन, भौतिकशास्त्र, तत्त्वज्ञान, कायदा यांसारख्या विषयांवर मराठीतून लेखन करायचे, हे कार्य त्या काळाच्या दृष्टीने कठीण होते. सामान्यत: पाश्चिमात्त्य देशांमध्ये विशेषत: जर्मनी, ब्रिटन येथे या विषयांचे अध्ययन, अध्यापन आणि संशोधन मध्य काळापासून सुरू होते. ज्या विद्यापीठाला किमान आठशे वर्षांचा इतिहास आहे, त्या विद्यापीठात कायदा, तत्त्वज्ञान आणि मानवी वैद्यक या विषयांवरच प्राधान्याने अध्ययन होत असे. त्यामुळे माहिती मांडण्यासाठीची परिभाषा पाश्चिमात्त्य कोशकारांना उपलब्ध होती. मराठी विश्वकोश निर्मितीसाठी तुलनेने परिभाषा ही बाब अवघड होती. यासाठी तर्कतीर्थ आणि संपादक मंडळाने आधी परिभाषा निर्मितीचे कार्य केले. इंग्रजी विश्वकोशाचे वाचन, त्यातील महत्त्वाच्या शब्दांचे संकलन, त्याचे भारतीय आणि मराठीच्या संदर्भात भाषांतर या पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असा परिभाषा कोश मराठी विश्वकोशाने प्रारंभीच निर्माण केला आणि त्या आधारावर लेखनाचे कार्य आरंभिले.

 

सर्व विषयांच्या मांडणीसाठी अधिकृत अशा संदर्भग्रंथाची गरज होतीच. त्यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात आले. त्या त्या देशातील दूतावासांकडून संबंधित देशातील अधिकृत संदर्भ ग्रंथ मिळविण्यात आले. जागतिक दर्जाची नियतकालिके विश्वकोशात नियमितपणे मिळण्याची सोय केली गेली. प्रत्यक्ष लेखनकार्य करण्याअगोदर जागतिक दर्जाच्या सर्व विश्वकोशाचे मूल्यमापन करण्यात आले. कोणत्या कोशाने कोणत्या घटकाला महत्त्व दिले, किती महत्त्व दिले, किती शब्दमर्यादा दिली, त्यानुसार मराठी विश्वकोशात घ्यावयाच्या घटकांची निश्चिती करण्यात आली, शब्दमर्यादा ठरविण्यात आली. मराठी संस्कृती, भारतीय संस्कृती आणि वैश्विक परिप्रेक्ष्य हा घटकमांडणीचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. लेखन-समीक्षण आणि संपादन या अत्यंत महत्त्वाच्या बाबीसाठी तर्कतीर्थांसह संपादक मंडळाने विशेष प्रयत्न केले. तो तो विषय, त्या त्या विषयतज्ज्ञांकडूनच लिहिला जाईल, याचे व्यवस्थापन करण्यात आले. या सर्व प्रयत्नांतून विश्वकोशाचे सर्व संहिताखंड निर्माण झाले. तर्कतीर्थानंतर मे. पु. रेगे, रा. ग. जाधव, श्रीकांत जिचकार, विजया वाड यांनी मराठी विश्वकोशाच्या निर्मितीमध्ये विशेष योगदान दिले. विजया वाड यांनी शेवटच्या ३ खंडांचे कार्य मोठ्या गतीने करवून घेतले. वाड यांच्याच प्रयत्नातून माहिती-तंत्रज्ञानाच्या बाबतीत विश्वकोश अधिक लोकाभिमुख झाला.

 

१९६० च्या दशकातून गेली सहा शतके विश्वकोश निर्मिती मंडळाचे हे कार्य सुरू आहे. कालखंड मोठा आहे, तरीही मराठी भाषेच्या भाषिक अभिसरणाच्या दृष्टीने याकडे पाहणे गरजेचे आहे. कोशनिर्मिती करत असताना बदलत्या काळाचे प्रतिबिंब त्यात आवश्यक असते. मराठी विश्वकोशाने ही बाब अगत्याने जपली आहे. भाषा-परिभाषा निर्मिती, नवीन विषयांची दखल, त्यांचा अंतर्भाव या सर्व बाबींवर विश्वकोशाने कार्य केले आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशात ज्ञान आणि माहितीच्या संदर्भात एक कालसुसंगतता दिसून येते. ज्ञानाची उपलब्धता ही आजच्या काळातील प्रक्रिया वरकरणी सोपी वाटते आणि आहेही. परंतु, ज्ञानाची अधिग्राह्यता आणि विश्वासार्हता याबाबतीत मात्र आपण आजही हतबल आहोत. एका क्लिकवर आपल्याला सगळं मिळतंय. पण जे मिळतंय, त्याच्या संदर्भतेबद्दल साशंकता आहेच. अशाही अवस्थेत ज्ञानाचे अधिग्राह्य आणि विश्वासार्ह संदर्भमूल्य मराठी विश्वकोशाने जपले आहे. हे संदर्भमूल्य त्या त्या काळात मराठी विश्वकोशात लेखन-समीक्षण आणि संपादनासाठी योगदान देणार्‍या तज्ज्ञ लेखकांच्या कष्टसाध्य प्रतिभेनेही साध्य झालेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विभागात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. बाळ फोंडके यासारख्या मातब्बरांनी योगदान दिले आहे, तर मानव्यविद्या विभागात खुद्द लक्ष्मणशास्त्री जोशी, वि. भि. कोलते, ना. गो. कालेलकर, सरोजिनी बाबर, पु. ल. देशपांडे, कुमार केतकर, आ. ह. साळुंखे, राम शेवाळकर, म. वा. धोंड, दत्ता भगत, यु. म. पठाण, मे. पु. रेगे यांसारख्या प्रतिभावंतांनी योगदान दिले आहे. त्यामुळे मराठी विश्वकोश हे महाराष्ट्रातील या प्रतिभावंतांच्या अस्तित्वाचे एक ज्ञानचित्र म्हणून समोर आले आहे.

 

२०१५ साली मराठी विश्वकोशाच्या २० व्या खंडाचे प्रकाशन झाले. दिलीप करंबेळकर यांनी त्यानंतर मंडळाची सूत्रे हाती घेतली. झालेल्या एकूण सर्व खंडांचे अद्ययावतीकरण यासंदर्भात विद्यमान संपादक मंडळाने कार्यारंभ केला. मराठी विश्वकोशाच्या संपादकीय कार्याचा व्याप हा खूप मोठा आहे. सर्वच विषयांची माहिती त्यात अंतर्भूत करायची असल्याने एका मोठ्या तज्ज्ञ मनुष्यबळाची या कार्यासाठी आवश्यकता आहे. ही बाब विद्यमान अध्यक्ष आणि मंडळाने लक्षात घेऊन ज्ञानमंडळ या योजनेची उभारणी केली. मराठी विश्वकोशातल्या एकूण सर्व विषयांतील ६० विषयांची ज्ञानमंडळे स्थापन करणे प्रस्तावित केले. महाराष्ट्रातील सर्व संशोधन संस्था, विद्यापीठे यांना एकेका विषयाचे पालकत्व द्यावे आणि तेथील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विषयाचे लेखन, संपादन आणि प्रकाशन करावे, या पद्धतीने ज्ञानमंडळाची ही संकल्पना राबविण्यात आली. आजतागायत ४६ ज्ञानमंडळे कार्यान्वित झाली आहेत.ज्ञानमंडळ ही संकल्पना खर्‍या अर्थाने अभिनव संकल्पना आहे. ज्ञाननिर्मितीचे हे मूलभूत कार्य करीत असताना या क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सर्व संस्थांचे, व्यक्तींचे विकेंद्रीकरणाच्या पद्धतीने सहकार्य घेणे, त्यांना या प्रक्रियेत अंतर्भूत करणे हे ज्ञानमंडळ या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. मराठी विश्वकोशाच्या प्रथमावृत्तीत त्या त्या विषयाची माहिती त्याच विषयतज्ज्ञाकडून लिहून घेणे, ही बाब कष्टसाध्य आणि वेळखाऊ ठरली आहे. आजच्या काळात ज्ञानाची गतिमानता लक्षात घेता काळ ही बाब प्राथमिक ठरली आहे. ज्ञाननिर्मितीची असंख्य केंद्रे आणि त्या ज्ञानाचा वाचक यांच्यामधले काळाचे, माध्यमाचे आणि तंत्रज्ञानांचे सर्व स्तर आजच्या काळात अस्तित्वहीन झाले आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन ज्ञानमंडळाची वाटचाल सुरू झाली.

 

काळाच्या मर्यादा लक्षात घ्यावयाच्या असतील तर तेवढेच मनुष्यबळ या प्रकल्पासाठी जोडून घेणे गरजेचे होते. महाराष्ट्रामध्ये अनेक संस्था या त्या त्या विवक्षित विषयांचे अध्यापन, अध्ययन आणि संशोधन करतात. मराठी विज्ञान परिषद-मुंबई, गोखले अर्थशास्त्र-राज्यशास्त्र संस्था-पुणे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय-पुणे, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था-पुणे, डेक्कन अभिमत विद्यापीठ-पुणे यासोबतच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे या काही त्या संस्था होत. या सर्व संस्थांकडे त्या त्या विषयातील ज्ञानमंडळाचे पालकत्व देण्यात आले, संबंधित विषयातील अनुभवी ज्येष्ठ सदस्याला त्या त्या विषयाचे पालकपद देण्यात आले. निवडलेल्या संस्थेतील अनुभवी प्राध्यापकास समन्वयक संपादकपद देण्यात येऊन त्यासोबत पाच ते सात तज्ज्ञ सदस्यांच्या नियुक्तीची सोय करण्यात आली. याप्रकारे मराठी विश्वकोशाच्या एका कार्यालयात चालणारे संपादनाचे कार्य विकेंद्रित करण्यात आले, ज्यायोगे अधिग्राह्य आणि विश्वसनीय असे ज्ञान आणि माहिती वाचकांना पुरविण्याच्या अपार शक्यता निर्माण झाल्या. उदाहरण द्यायचे झाल्यास, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे विद्यापीठ मराठी साहित्य, राज्यशास्त्र आणि जागतिक इतिहास या तीन ज्ञानमंडळांची पालकसंस्था आहे. मराठी साहित्य या विषयाचे विषयपालक म्हणून मराठीतील ख्यातनाम साहित्यिक डॉ. राजन गवस कार्य पाहत आहेत. समन्वयक संपादक म्हणून समीक्षक डॉ. रणधीर शिंदे कार्य पाहताहेत. शिवाय महाराष्ट्रातील काही तज्ज्ञ सदस्य आणि शेकडो लेखक या ज्ञानमंडळाशी जोडलेले आहेत.

 

त्यामुळे जी माहिती वाचकांसमोर मराठी विश्वकोशाकडून जाणार आहे, त्या माहितीच्या निर्मितीमध्ये याप्रकारे अनेक संपादकीय स्तर उपस्थित आहेत. लेखकाने लिहिल्यानंतर समन्वयक ती नोंद संपादित करतील, विषयपालकांच्या संमतीनंतर ती विश्वकोशाकडे पाठविण्यात येईल. विश्वकोशात या नोंदीचे समीक्षण झाल्यावर ती मुख्य संपादकांकडे प्रकाशनासाठी सादर केली जाईल. या प्रक्रियेमुळे हजारो तज्ज्ञ आणि लेखक मराठी विश्वकोशाच्या या प्रकल्पात कार्य करीत आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये २५०० नोंदी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ११०० नोंदी अंतिम करून त्या विश्वकोशाच्या संकेतस्थळावर प्रकाशनासाठी सज्ज आहेत. मोठ्या गतीने निर्माण होणारी ही सर्व विश्वकोशीय सामग्री वाचकांसमोर योग्य प्रारूपात आणि गतीने जाणे हेही एक आव्हान होते. त्यासाठी marathivishwakosh.org हे संकेतस्थळ तयार केले. सोबत हीच सामग्री प्रदर्शित करणार्‍या अ‍ॅपचे (उपयोजक) लोकार्पण केले आहे. गुगल स्टोअरला हे उपयोजक वाचकांसाठी उपलब्ध आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या आकर्षक काळात मराठी विश्वकोशाचे हे संकेतस्थळ आणि उपयोजक वाचकस्नेही आहे. वाचकाला अधिकाधिक माहिती विनासायास मिळावी तसेच त्याची ज्ञानजिज्ञासा अधिक जागृत व्हावी, यादृष्टीने अनेक फीचर्स त्यामध्ये आहेत. शिवाय प्रत्येक नोंदीला समर्पक छायाचित्र आणि दृक्श्राव्य माध्यमाची जोड देण्यात आली आहे. वाचक हा जसा येथील महत्त्वाचा घटक आहे, त्याच पद्धतीने नोंद लेखकालाही येथे उचित प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. मराठी विश्वकोशाच्या पहिल्या आवृत्तीतील सर्व नोंदी या दोन्ही माध्यमांवर वाचकांसाठी उपलब्ध आहेतविकेंद्रित पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व तज्ज्ञ वर्ग मराठी विश्वकोशाच्या ज्ञाननिर्मितीच्या या कार्यात गुंतला आहे, ही अत्यंत कष्टसाध्य बाब मंडळाने राबविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. विश्वकोशाचे विद्यमान अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या मार्गदर्शनात चालणारे हे भव्य कार्य येणार्‍या काळात मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी मानबिंदू ठरेल, यात शंका नाही.
 

- डॉ.जगतानंद भटकर
सहायक संपादक

(महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)