राज्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही : विखेपाटील

08 Sep 2019 20:03:39


गृहनिर्माण मंत्र्यांचे सुतोवाच


अहमदनगर :लोकसभेच्या निकालातून जनतेने भाजप-शिवसेना युतीलाच पाठबळ दिले. आता राज्यातही चित्र बदलत चालले असून काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारी संख्या दिवसागणिक वाढत आहेत. त्यामुळे उद्या प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना,” असा सवाल करत राज्यात काँग्रेसचा एकही आमदार निवडून येणार नाही, असे सूतोवाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी केले.

अहमदनगर येथील संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे २ कोटी ७६ लाख २३ हजार रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत नळपाणी पुरवठा योजनांसह ३६ लाखाच्या विविध विकास कामाच्या शुभारंभ आणि आंभोरे येथे युती सरकारने मंजूर केलेल्या सुमारे २ कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, “निळवंडेच्या पाण्यासाठी तालुक्याला पंचवीस वर्षे वाट पहावी लागली. टॅकरद्वारे पाणी देण्यताच त्यांना पंचवीस वर्षे भूषण वाटले. दुषाकाळाचे मॉडेल अशी तालुक्याची प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी धन्यता मानली. आता तुम्हाला २५ वर्षे कोणत्याही प्रश्नासाठी वाट पाहावी लागणार नाही. आलेली संधी दवडू नका, राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे. त्यामुळे काँग्रेसचा आमदार निवडून देवून काय उपयोग? ’तालुक्यात तुम्ही परिवर्तन करा, मी दीड वर्षात पाणी देतो’ अशी ग्वाही राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राज्यात पुन्हा युतीचे सरकार

राज्यात पुन्हा युतीचे सरकार येणार आहे. सामान्य माणसासाठी घेतलेल्या निर्णयामुळे जनतेचे भक्कम पाठबळ सरकारला आहे. राज्यात काँग्रेसचा आमदारच निवडून येणार नाहीत अशी परिस्थिती असेल, तर या तालुक्यातून काँग्रेसचा आमदार निवडून देवून उपयोग तरी काय? युतीचा आमदार निवडून गेला तरच पंचवीस वर्षे प्रलंबित राहीलेली काम मार्गी लागू शकतील. त्यामुळे युतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा प्रश्न सोडविण्याची हमी मी घेतो असे आश्वासन विखे यांनी दिले

Powered By Sangraha 9.0