यंत्रमाग व्यवसायासाठी सौरऊर्जा संजीवनी : खासदार कपिल पाटील

    दिनांक  08-Sep-2019 20:41:45
भिवंडी : भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायाला संजीवनी देण्यासाठी सोलार ऊर्जेचा वापर गरजेचा आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार अक्षय ऊर्जा सेवा कंपनी स्थापन केल्यास, यंत्रमाग व्यावसायिकांना सध्याच्या वीजदरापेक्षा स्वस्त वीज उपलब्ध होईल, अशी माहिती भाजपचे खासदार कपिल पाटील यांना देण्यात आली आहे.

 

भिवंडी शहरातील यंत्रमाग व्यावसायिकांना विजेचा वाढता खर्च भेडसावत असल्यामुळे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या गरजेसंदर्भात खा. कपिल पाटील यांनी लोकसभेत नियम ३७७ अनुसार चर्चा उपस्थित केली होती. त्या अनुषंगाने केंद्रीय ऊर्जा, नवीन व नवीकरणीय खात्याचे राज्यमंत्री आर. के. सिंह यांनी खा. कपिल पाटील यांना पत्र पाठविले. त्यात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यात आली.

 

इमारतीच्या छतावरील (रुफटॉप) सौर योजनेनुसार, व्यापार्‍यांना अक्षय ऊर्जा सेवा कंपनी (रैस्को) स्थापन करता येईल. त्यातून सौर ऊर्जा प्रकल्प उभारता येणार असून, त्यासाठी स्टेट बँक व पंजाब नॅशनल बँकेने कर्जसुविधा उपलब्ध केली आहे. या कंपनीद्वारे व्यापार्‍यांना सौरऊर्जा उपलब्ध होऊ शकेल. विशेषतः या कंपनीद्वारे प्रकल्पाचा खर्च उभारण्यात येणार असल्यामुळे यंत्रमाग व्यावसायिकांची गुंतवणुकीपासून सुटका होईल. त्याचबरोबर सध्याच्या वीज दरापेक्षा स्वस्त वीज उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी खा. कपिल पाटील यांना दिली आहे.

संपूर्ण सहकार्याची ग्वाही

सध्याच्या परिस्थितीत यंत्रमागावरील विजेचा वाढता खर्च व्यावसायिकांना परवडणारा नाही. त्यामुळे भिवंडीतील व्यापार्‍यांनी एकत्र येऊन सहकार तत्त्वावर अक्षय ऊर्जा सेवा कंपनी स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी केंद्र सरकारबरोबरच माझ्याकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल,” असे आवाहन खा. कपिल पाटील यांनी यंत्रमाग व्यावसायिकांना केले आहे. भिवंडीप्रमाणेच महाराष्ट्रातील मालेगाव, इचलकरंजी येथील यंत्रमाग व्यावसायिकांनाही या योजनेचा लाभ होणार असून, त्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन खा. पाटील यांनी केले.