चिदंबरम यांची गहन चिंता

    दिनांक  08-Sep-2019 19:48:15   मला केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता आहे. किती चिंता आहे काही सांगूच शकत नाही. ती चिंता करत चिंतन करण्यासाठी मला वेगळी स्वतंत्र खोली हवी आहे, त्या खोलीत टीव्ही आहे, टीव्ही पाहायला चष्मा हवा आहे. टीव्हीवर दाखवणार्‍या बातम्या पाहून माझ्याबाबत देशभर काय चिंतन केले जाते, हे पाहून माझा बीपी हाय किंवा लो होणारच. त्यामुळे मग मला औषधेही हवीत. तर देशाच्या अर्थव्यवस्थेचे चिंतन करण्यासाठी मला हे सगळे हवेच. पण हे सगळे असून फायदा काय? देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चिंतनासाठी झोपायला मऊशार बेड हवाच आणि शौचासाठी कमोड हवाच. तर माझे लयी मागणे नाही. इतकेच आहे. हे सगळे तिहार जेलमध्ये मिळाले आहेच, त्यामुळे आता मी देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता करणार आहे. त्याचे काय आहे की, ईडीनेे माझी चौकशी केली, ईडीला घाबरून मी २२ ऑगस्टला समस्त देशवासीयांना सीबीआयसोबतच ‘लपाछपी, पळा पळा, कोण पुढे पळे तो’चा खेळही केला, पण हे सगळे करताना मला देशाच्या अर्थव्यवस्थेचीच चिंता होती. चिंता हा माझा स्थायीभावच आहे. २०१८ साली पण मला अशीच चिंता सतावत होती. ती चिंता मी संसदेत बोलूनही दाखवली, पण त्यावर कमळवाल्यांनी मला अक्षरशः सळो की पळो केले. हं, तर मला त्यावेळी जी चिंता सतावत होती, ती अशी की, मी म्हणालो, अफजल गुरूवर जी न्यायिक कारवाई झाली ती ठीक झाली नसावी आणि अफजल गुरू संसदेवर हल्ला करण्याच्या गंभीर गुन्ह्यामध्ये असावा की नसावा याबाबत माझ्या मनात संशय आहे. खरे तर त्यावेळी महाराष्ट्रात भीमा-कोरेगाव ड्रामा चांगला रंगला होता, त्याआधी कन्हैया वगैरेंच्या अनुषंगाने अफजल गुरू कबरीतून पुन्हा उकरला गेला होता, त्यामुळे मी असे म्हणालो. छे, मला किती चिंता असतात. पण माझ्या चिंतांची कुणाला चिंताच नाही. आता तिहार जेलमध्ये वेस्टर्न टॉयलेटवर बसून किंवा मुद्दाम मागून घेतलेल्या बेडवर झोपून अर्थव्यवस्थेवर चिंता करण्याचेच हातात आहे. मी कट्टर काँग्रेसवाला आहे. देशाला मी परके मानत नाही. देश म्हणजे मी आणि मी म्हणजे देश. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची चिंता वाटते, असे मी म्हणालो. म्हणजे ईडीने खोदून खोदून काढलेल्या माझ्या संपत्तीची मला चिंता वाटते, असाच अर्थ आहे. समझनेवाले को इशारा काफी है.

 

शशी थयथयाट

 

देशाबाबत काही चांगले झाले तर लोकांचा ऊर अभिमानाने भरून येतो. वाईट झाले तर लोक हळहळतात, अगदी भावनावेगाने रडतात, संतापतातही. पण चुकून म्हणून कुणाच्या तोंडात देश आणि त्यासंबंधी नकारात्मक उद्गार येणार नाहीत. पण एक व्यक्ती अतिशय आनंदाने म्हणाली की, “शायनिंग इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि आता शटअप इंडिया झाले आहे.” भारताला शटअप म्हणणार्‍या या व्यक्तीचे चरित्र आणि विचार ज्यांना म्हणून माहिती आहेत, ते या माणसाला म्हणतील, ‘यू जस्ट शटअप.’ तर भारताला शटअप बिरूदावली लावणार्‍या या व्यक्तीचे नाव आहे शशी थरूर. (कधी कधी वाटते, त्यांचे नाव शशी थरूरपेक्षा शशी थयथयाट असायला हवे.) शशी म्हणतात, “आता देशातील आर्थिक, सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक संकटाबद्दल बोलले पाहिजे.” बरं शशी यांच्यामते आर्थिक, सामाजिक, वैचारिक, सांस्कृतिक संकट कोणते? तर ते म्हणतात, “मोदींनी सर्वांच्या मनावर हिंदुत्वाचा पगडा बसवला आहे. हिंदी राष्ट्रवादापेक्षा हिंदू राष्ट्रवाद प्रबळ होत चालला आहे.” सत्तासंपादनासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेल्या रंगेल शशी यांचे म्हणणे गंभीरपणे घ्यावे की नाही घ्यावे, असे वाटते. तरीसुद्धा हिंदुत्वाचा पगडा हा शब्द जेव्हा येतो, तेव्हा वाटते की, ‘व्हाय आय एम हिंदू?’, लिहिणार्‍या शशी यांना हिंदुत्वाचा पगडा वगैरेबद्दल तिरस्कार वाटणे साहजिकच आहे. कारण सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूच्या घृणास्पद काळिम्याची दाट काळोखी शशी थरूर यांच्यावर आहे. त्यामुळे दया, करुणा, स्त्री-सन्मान वगैरे वगैरे मानवी मूल्य जपणार्‍या हिंदुत्वाबद्दल त्यांना आपुलकी असणे शक्यच नाही. तसेच मोदींनी सर्वांवर हिंदुत्वाचा पगडा बसवला, असे जेव्हा शशी थरूर म्हणतात, त्यावेळी त्यांना हिंदुत्वाबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आकस आहे, ही गोष्ट तर स्पष्टच होते. देशाने हिंदू समाजपद्धतीवर विश्वास असणार्‍या राजकीय पक्षाला निवडून दिले म्हणून शशी यांचा हा अवैचारिक थयथयाट आहे. असो, शशी थरूर यांनी भाष्य केलेल्या हिंदी राष्ट्रवाद हवा की, हिंदू राष्ट्रवाद हवा याबद्दल कुणालाही काहीही घेणेदेणे नाही. कारण शशी यांचा राष्ट्रवाद स्वार्थ, सत्ता, धर्म आणि समाजद्वेषावर आधारित आणि सोईने बदलणारा आहे. शशी यांचा हा राष्ट्रवाद म्हणजे हिंदी राष्ट्रवाद असेल तर मग तो शशी यांनाच लखलाभ. बाकी हिंदू की हिंदी राष्ट्रवाद? या शब्दांच्या चक्रव्यूहात न पडता आपले हिंदुत्व अबाधित राखण्यास देश सक्षम आहे.