मोठा प्रश्न : ती सुंदर नाही...

    दिनांक  07-Sep-2019 11:05:51   ‍ॅमेझॉनच्या जंगलाला आग लागली, हा विषय मागे राहिला. त्याचे कारण, राजकारण मागे राहिले. किंबहुना हा विषय मागे टाकण्यासाठी आता विषय चघळला जात आहे की, ब्राझिलच्या प्रथम महिला सुंदर आहेत आणि फ्रान्सच्या प्रथम महिला कुरूप आहेत. फुग्याची गोष्ट नेहमीच विचार करायला लावणारी आहे.


जगभरात बाह्य रूपाचे निकष ठरलेले आहेत. त्यापलीकडे जर काही रूप-स्वरूप दिसले तर मग त्याला कुरूप म्हणून हिणवणे, ही एक सामान्य बाबच झाली आहे. यातही स्त्री शरीराने कसे दिसावे, कसे असावे याचे नियम तर भारीच काटेकोर. जणू त्या चौकटीच्या बाहेरच्या स्त्रीचे जन्मणे म्हणजे काहीतरी चूकच. उदाहरणार्थ, भारतात स्त्रियांचे केस काळेभोर, लांबसडक असावेत, अशी सर्वमान्यता तर पाश्चिमात्त्य देशात लाल-सोनेरी केस असलेली स्त्रीच खरी सौंदर्यवान. चीनमध्ये बारीक पावले असलेली स्त्री खरी सुंदर. तर, आफ्रिकेमध्ये मोठ्या जाड ओठांची स्त्री सौंदर्याची पुतळी. जगभरात त्या त्या भौतिकतेनुसार, संस्कृतीनुसार स्त्रियांच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सौंदर्याचे मापदंड आखलेले. या मापदंडाच्या पाठी तिच्या मनाचा, तिच्या भावनांचा विचार केला जात असेल का? आता कुणी म्हणेल, जग बदलले. स्त्रियांना कुणीही तुच्छ लेखत नाही की, त्यांची ओळख देहाच्या ठेवणीवरून केली जात नाही. 'जमाना बदल गया है...' पण आजही काही घटना पाहून वाटते की, जमाना अभीभी वही हैं. एखाद्याला कमीपणा वाटण्यासाठी काही करायचे असेल तर त्याच्या किंवा तिच्या संबंधातल्या स्त्रीला हिणवले की झाले किंवा त्या व्यक्तीला स्त्रीसंदर्भातील उपमा दिली की झाले. आपल्याकडे नाही का कुणी काही वाईट केले की, लगेच त्या व्यक्तीला बांगड्या भेट देण्याची भाषा केली जाते. असे का? तर स्त्रिया हातात बांगड्या भरतात आणि अपवाद वगळून बहुतेकांचे हे आवडते गृहितक असते की स्त्रिया काय कर्तृत्व करणार? त्यांना कुठे आली आहे बुद्धिमत्ता आणि शौर्य?

 

असो, विषयांतर झाले असेल, असे वाटत असेल. पण तसे नाही, मुद्दा हाच आहे की, स्त्रीने परिधान केलेली कोणतीही वस्तू आणि त्या वस्तूचा संदर्भ कर्तृत्वशून्यतेशी जोडण्याचा कल जगभरात आहे. पाश्चात्त्यही याबाबतीत मागे नाहीत. अर्ध्या शतकापूर्वी इंग्लंड आणि इतर पाश्चात्त्य देशांमध्ये तर स्त्री जर पाश्चिमात्त्य संकल्पनेनुसार पांढऱ्या त्वचेची नसेल तर तिला सर्रास चेटकीण ठरवले जायचे. चेटकीण ठरवून तिला हालहाल करून मारले जायचे. मागेही पाकिस्तानच्या तत्कालीन पंतप्रधानांनी त्यावेळच्या भारतीय पंतप्रधानांना डॉ. मनमोहन सिंग यांना 'देहाती औरत' म्हटले होते. पाकिस्तानला आपली द्वेषमूलक टीका करण्यासाठी देहाती का होईना पण औरतचीच उपमा द्यावीशी वाटली आणि ती आपल्या वर्मीही लागली. ही घटना जुनी, पण तिचे ताजेपण आजही वाटते. नुकतेच फ्रान्स आणि ब्राझीलमध्ये जे घडले त्यामुळे तर अगदी खात्रीलायक वाटते की, स्त्रियांच्या शारीरिक ठेवणीवरून टीकाटिप्पणी आजही केली जाते. ब्राझील आणि फ्रान्सचे अ‍ॅमेझॉनच्या जंगलावरून चांगलेच वाजले. त्यातच ब्राझीलच्या एका नागरिकाने फेसबुकवर पोस्ट टाकली की, "ब्राझीलच्या प्रथम महिला मिशेल बोल्सोनारो जितक्या आकर्षक आहेत, तितक्या फ्रान्सच्या प्रथम महिला ब्रिगिट मैक्रानो सुंदर आणि आकर्षक नाहीत." यावर ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षाने जैर बोल्सोनारो यांनी विधान केले, "फ्रान्सच्या प्रथम महिला सुंदर नाहीत, असे बोलून तुम्ही त्या पुरुषाचा अपमान करत आहात." थोडक्यात फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी जी फ्रान्सची प्रथम महिला आहे, ती पुरुषासारखी दिसते, असे त्यांना म्हणायचे होते. आता फ्रान्सच्या प्रथम महिला पुरुष दिसतील नाही तर स्त्री दिसतील किंवा दोन्हीही दिसतील. त्यांच्या दिसण्याची खिल्ली उडवणे तेही राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने, हे तर अतिच झाले. यावरून ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना जगभरातून टीकेचे धनीही व्हावे लागले. पण आता ब्राझीलच्या वित्त मंत्र्यांनीही म्हटले की, "होय, खरेच आहे फ्रान्सच्या प्रथम महिला कुरूपच आहेत."

 

थोडक्यात अ‍ॅमेझॉनच्या जंगलाला आग लागली, हा विषय मागे राहिला. त्याचे कारण, राजकारण मागे राहिले. किंबहुना हा विषय मागे टाकण्यासाठी आता विषय चघळला जात आहे की, ब्राझिलच्या प्रथम महिला सुंदर आहेत आणि फ्रान्सच्या प्रथम महिला कुरूप आहेत. फुग्याची गोष्ट नेहमीच विचार करायला लावणारी आहे. रंगीत सुंदर फुगा आकाशात उंच उडतो. त्यावेळी त्याच्या बाहेरच्या रंगरंगोटीमुळे नाही तर त्याच्या आत जी काही शक्ती असते, त्याने तो भरारी घेत असतो. जे बाहेर आहे ते नाही, तर जे आत आहे, तेच त्याचे खरे स्वरूप आहे. जितकी बाह्य स्वरूपाची किंमत केली जाते, तितकी किंमत जे आत आहे, त्याची केली जाते का?