बदललेलं आपलं सिव्हिल

    दिनांक  07-Sep-2019 10:11:21   जिल्हा रुग्णालयात असणारी सुविधांची वानवा, अस्वच्छता, कर्मचारीवर्गात स्नेहभावाचा असणारा अभाव या सर्वांमुळे सिव्हिलबाबत एक नकारात्मक भावना नाशिक जिल्ह्यात सर्रास पाहावयास मिळत असे. मात्र, आता जिल्ह्यातील गोरगरीब जनतेचे हक्काचे आरोग्यसंकुल असणारे सिव्हिल बदलले असून ते आता रुग्णांना आपलेसे वाटू लागले आहे. सिव्हिलच्या कार्यशैली आणि रुग्णसेवेसंबंधी कार्यात अनेक बदल झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी दिली.


नाशिक जिल्हा रुग्णालय हे राज्यातील सर्वात मोठे रुग्णालय म्हणून गणले जाते. येथे ६०० खाटांची सुविधा असली तरी, येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आणि वैद्यकीय महाविद्यालय अशा दोन्ही स्तरांवरील रुग्णांची शुश्रूषा करण्याचे दायित्व सिव्हिलमधील कर्मचारी निभावत आहेत. नाशिकमधील सिव्हिलच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देताना प्रतिबंधात्मक लसीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेपर्यंत लसीकरण पोहोचविण्यात येत असून त्यात गोवर, धनुर्वात, पोलिओ, डांग्या खोकला, कावीळ आदी आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सिव्हिलमार्फत करण्यात येत आहे. नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्यत्वे ग्रामीण, वनवासी आणि महापालिका क्षेत्रातील नागरिक शुश्रूषेसाठी दाखल होत असतात. त्यामुळे या रुग्णांना योग्य वेळेत सुयोग्य उपचार देण्यास सिव्हिलमध्ये प्राधान्य देण्यात येते. सिव्हिलमध्ये दाखल होणारे रुग्ण हे येथे आपल्याला जिल्ह्यातील सर्वोत्तम उपचार प्राप्त होतील, या विश्वासाने दाखल होताना दिसतात. रुग्णांच्या मनात हा विश्वास निर्माण व्हावा आणि वेळप्रसंगी त्यांचे समुपदेशन करण्याकामी सिव्हिलचा संपूर्ण कर्मचारीवर्ग नोकरी न समजता सेवा म्हणून आपले कार्य बजावण्यास प्राधान्य देत असल्याचे येथे प्रवेश करताच जाणवते. रुग्णसेवा अधिक प्रभावीपणे करता यावी, यासाठी येथील कर्मचारीवर्गाची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. सिव्हिलमध्ये जवळपास सर्वच आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टर्सची फौज तैनात असून त्यात मुख्यत्वे स्त्रीरोग, बालरोग, अस्थीरोग, शल्यचिकित्सक, फिजिशियन, त्वचारोग, नाक-कान-घसा तज्ज्ञ, सोनोग्राफी, आयुष विभाग यांचा उल्लेख करावा लागेल आणि हेच तज्ज्ञ आणि त्यांचे साहाय्यकारी कर्मचारी सिव्हिलचे मुख्य आधारस्तंभ आहेत. महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयातील सर्वात उत्तम डॉक्टर्सचा चमू नाशिक सिव्हिलमध्ये असल्याचे डॉ. जगदाळे यांनी यावेळी सांगितले.

 

रुग्णसेवा अबधित राहावी आणि ती देखील उत्तमोत्तम देता यावी, यासाठी जिल्हा रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या वैद्यकिय २०१५ सालापासून अग्रस्थान देण्यात आले आहे. त्यानुसार सिव्हिलमध्ये सिटीस्कॅन, सोनोग्राफी यांचे आधुनिक यंत्र, आणि तपासणी करणारे अत्यंत अनुभवी डॉक्टर येथे कार्यरत आहेत. सिव्हिलची खासियत म्हणजे येथील डॉक्टर हे अनुभवसंपन्न आहेत. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याने त्यांची तपासणी करताना येथील डॉक्टर अधिक अनुभवसंपन्न होत असतात. सिव्हिलमध्ये ७० ते ८० सोनोग्राफी दररोज केल्या जातात. अनुभवसंपन्न डॉक्टर्स असल्याने त्यांना समस्येचे लवकर निदान होते. त्यामुळे वेळेची बचत होण्याबरोबरच रुग्णाला आवश्यक ते उपचार तातडीने उपलब्ध करून देण्यास साहाय्य मिळते. खाजगी इस्पितळातील अस्थिरोग तज्ज्ञांपेक्षा सिव्हिलमधील अस्थिरोग तज्ज्ञ जास्त सेवा देत असल्याचे यावेळी डॉ. जगदाळे यांनी आवर्जून नमूद केले. नाशिक सिव्हिलची आणखी एक खासियत म्हणजे हा दवाखाना चिठ्ठी मुक्त (प्रिस्क्रिप्शन फ्री) करण्यात आला आहे. सिव्हिलमध्ये पूर्वी औषधे लिहून दिली जात होती, मात्र, रुग्णांना आवश्यक असणाऱ्या औषधांचा पुरवठा आता सिव्हिलमार्फत मोफत करण्यात येतो. त्यामुळे मोफत मिळणारी औषधे आणि अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता आणि त्या जोडीला स्नेहभाव जोपासणारा कर्मचारीवर्ग यांचा एकत्रित प्रभाव म्हणून जिल्ह्यातील नागरिक सिव्हिलमधून उपचार घेण्यास प्राधान्य देतात. सिव्हिलमधून दररोज १५० अॅडमिट झालेले आणि बाह्यरुग्ण विभागातील १५०० रुग्ण उपचार घेऊन आणि ठणठणीत बरे होऊन घरी जात आहेत.

 

रुग्णांचे नातेवाईक आणि दवाखाना हा संघर्ष नेहमीच आपणास पाहावयास मिळतो. मात्र, सिव्हिल प्रशासनाने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात संवाद साधणे सुरू केले आहे. तसेच, सिव्हिल रुग्णाकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून अभिप्राय घेत असल्याने उणिवा भरून काढण्यास आणि उत्तरोत्तर अधिक उत्तम होण्याच्या दिशेने सिव्हिलचा प्रवास सुरू आहे. रुग्णाच्या सर्वात जवळ असणारा आणि त्याची अहोरात्र शुश्रूषा करणारा परिचारिका वर्ग आपली सेवाभावी वृत्ती जोपासताना येथे सहज दिसून येतो. परिचारिकांना प्रशिक्षण देऊन त्यांचे समुपदेशन करून, समन्वयाची बैठक घेत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यात समन्वय साधण्यात आला आहे. ४० परिचारिकांसह एकूण ३०० पेक्षा जास्त परिचारिका आज सिव्हिलमध्ये कार्यरत आहेत. स्वच्छता आणि जिल्हा रुग्णालय यांचे दूरपर्यंत संबंध यापूर्वी नव्हते. मात्र, स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्याचे महत्त्व आणि त्यांचे असणारे महत्तम योगदान यांची माहिती करून देण्यात आली आहे. परिणामी, सिव्हिलमधील स्वच्छता आजमितीस वाखाणण्याजोगी असल्याचे दिसून येते. निर्जंतुकीकरण राखण्यासाठी येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सर्वांच्या परिणामस्वरूप कायाकल्पमध्ये स्वच्छता, दर्जेदार गुणवत्ता सेवा, कर्मचारी आदी गुणांकन ठरविण्यात आले होते. त्यात ३०० पेक्षा जास्त गुण प्राप्त करत होते. ४ पैकी २ वेळा नाशिक सिव्हिल प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 

पूर्वी सिव्हिलमध्ये साधी बेडशीटदेखील बदलले जात नसे, त्यावर उपाय म्हणून दिवसानुसार बेडशीटचे रंग ठरविण्यात आले असून त्यामुळे स्वच्छता झाली किंवा नाही हे लगेच निदर्शनास येत आहे. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत घर ते रुग्णालय आणि रुग्णालय ते घर आणि रुग्णालयातील उपचार, जेवण, औषधे सर्व काही मोफत दिले जात असून ४५०० मातांना प्रतिवार्षिक सुविधा दिल्या जातात, वर्षाला ३००० मोफत सिझर सिव्हिलमध्ये केले जात आहेत. विशेष म्हणजे नाशिकमधील न्यायाधीशांनी आपल्यावरील दंतोपचार सिव्हिलमध्ये केले असून त्यांना आजवर बाहेर कुठेही न प्राप्त झालेले उपचार नाशिक सिव्हिलमध्ये प्राप्त झाले आहेत. तसेच, त्यांनी मी राज्यात कुठेही असलो तरी यापुढे केवळ नाशिक सिव्हिलमध्येच उपचार करेल आणि माझ्या कर्मचाऱ्यांनादेखील येथून उपचार घेण्याबाबत सांगेल, अशी प्रतिक्रिया दिली असल्याचे डॉ. जगदाळे सांगतात. याशिवाय नाशिकमधील प्राध्यापक, उद्योजक, वकील असे अनेक शिक्षित नागरिक सिव्हिलमधून उपचार घेण्यास प्राधान्य देत आहेत. कर्मचारी संवाद आणि नवनिर्मितीस चालना देण्याकरिता डॉ. जगदाळे यांनी केलेल्या कामाचा अभिमान सिव्हिलमधील कर्मचारी व्यक्त करतात. कामाच्या विकेंद्रीकरणामुळे उणिवा दिसून आल्याचे येथील कर्मचारी आणि डॉक्टर आवर्जून नमूद करतात.